रविवार, १७ जानेवारी, २०२१

प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण: निसर्ग आणि मानवजातीसाठी धोका / Microplastics: A threat to nature and mankind

प्लॅस्टिकचा पातळ थर असलेल्या १०० मि.लि. आकाराच्या कागदी कपातून आपण गरम पेय घेतो त्यावर आयआयटी खरगपूरच्या वैज्ञानिकांनी नुकताच एक संशोधन लेख प्रसिध्द केला आहे. ते पेय जर १५ मिनिटापेक्षा अधिक वेळ जर कपात राहिले तर कपातील प्लॅस्टिकचे विघटन होते आणि यादरम्यान सुमारे २५००० प्लॅस्टिकचे कण त्या पेयात मिसळतात आणि पेयाबरोबर आपल्या पोटात जातात. या लेखाबद्दलची माहिती वाचून मला भारतातल्या सगळ्या रेल्वेस्थानकांवर दिला जाणारा चहा मातीच्या कपातूनच (कुल्हड) देण्याचे नियोजन केले जात आहे या रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची आठवण झाली. स्थानिकांच्या हातांना काम आणि प्रदूषण निर्मूलनाला मोठाच हातभार असा दुहेरी हेतू यातून साध्य होईल. ही घोषणा हवेतच न विरावी. कारण बातमी पुढे म्हणते की सध्या ४०० रेल्वेस्थानकांवर कुल्हडमधून चहा दिला जातो. भारतात एकूण ७३४९ रेल्वेस्थानके आहेत. म्हणजे जेमतेम ६ टक्के स्थानकांवर सध्या ही सोय आहे यावरुन हे आव्हान किती मोठे आहे याची कल्पना यावी. शिवाय एका माहितीस्रोतावरुन असे कळते की २०१९ साली भारतात वर्षभरात सुमारे ८०० कोटी प्रवाशांनी प्रवास केला. यातले एक टक्का प्रवासी रेल्वेस्थानकावर चहा पीत असतील असे गृहीत धरले तरी सुमारे आठ कोटी कपांची सोय करावी लागेल. काहीही असो पण यामुळे प्रदूषण निर्मूलनात खारीचा वाटा उचलल्यासारखे होईल.

कचरा करणारा समाज 

तसे पाहिले तर माणसाची प्रत्येक क्रिया ही निसर्ग प्रदूषणाला कारणीभूत ठरते. शिवाय ऑल्विन टॉफ्लरने म्हटल्याप्रमाणे आजची पिढी ही निसर्ग संरक्षण, संवर्धनाचा फारसा विचार न करता 'वापरा आणि फेका' हे तत्त्व आचरणात आणणारी आहे. आपण फेकलेल्या कचऱ्याचे विघटन व्हायला किती अवधी लागतो याची माहिती तक्ता क्र. १ मध्ये दिली आहे ती उद्भोदक ठरावी. यात प्लॅस्टिकच्या वस्तूंचे विघटन व्हायला सर्वाधिक वेळ लागतो असे नमूद केले आहे. त्यामुळे प्लॅस्टिकपासून होणारे प्रदूषण ही समस्या किती गंभीर आहे हे लक्षात यावे. समस्या किती गंभीर आहे हे लक्षात यावे. प्रदूषणकारी प्लॅस्टिकचे त्यांच्या आकारानुसार तीन भाग केले जातात - मॅक्रोप्लॅस्टिक (आकाराने २५ मि.मि. पेक्षा अधिक असलेल्या वस्तू), मेसोप्लॅस्टिक (५ ते २५ मि.मि. आकाराच्या वस्तू) आणि मायक्रोप्लॅस्टिक (५ मि.मि. हून लहान तुकडे). मोठ्या आकाराच्या वस्तू परिसर ओंगळवाणे करतात. कालांतराने घर्षणासारख्या प्रक्रियेतून त्यांचे सूक्ष्मकणात (मायक्रोप्लॅस्टिक) रुपांतर होत राहते आणि ते कण जास्तच धोकादायक ठरतात. प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण कृत्रिम धाग्यांनी विणलेल्या कपड्यांमधून, कप आणि इतर खाद्यपदार्थ साठवण्यासाठी वापरलेल्या वेष्टनांतूनही वेगळे होत अखेरीस मातीत मिसळतात. याशिवाय डिटर्जंट साबण आणि प्रसाधने हे देखील याचे आणखी मोठे स्रोत कारण यातही प्लॅस्टिकचे अतिसूक्ष्म कण असतात. हे सगळे कण अखेरीस नदी-नाल्यातून वाहात जाऊन समुद्राला मिळतात. समुद्रात आढळणारे सुमारे ८०% प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण असे वाहात आलेले असतात. याशिवाय जहाजांद्वारे होणारे दळणवळण, बंदरांतील वाहतूक, मत्स्यव्यवसाय यांचाही हातभार याच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो. दरवर्षी सुमारे ९ टन प्लॅस्टिक समुद्रात पोहोचत असल्याचे अंदाज आहेत तर ३ लाख टन प्लॅस्टिक पाण्यावर तरंगत, वारा, लाटा आणि प्रवाहाबरोबर वाहात जात सगळीकडे पसरतंय आणि याच्या कितीतरी पटीने अधिक असे समुद्रतळाशी विसावले आहे. 


तक्ता क्र. १:‌ विविध कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी 

कचरा

विघटनासाठी लागणारा कालावधी

सुती कपडे

1-5 महिने

दोरे

3-4 महिने

दोरखंड

3-14 महिने

सिगारेट

1-12 वर्षे

टेट्रापॅक्स (दूध, रसाचे)

5 वर्षे

चामडी पादत्राणे

25-40 वर्षे

नायलॉनचे कपडे

30-40 वर्षे

पत्र्याचे डबे

50 वर्षे

अ‍ॅल्युमिनियमचे डबे

200 वर्षे

सॅनिटरी नॅपकिन आणि मुलांचे डायपर

500-800 वर्षे

मासेमारीसाठी वापरलेली जाळी

600 वर्षे

प्लॅस्टिक बाटल्या

70-450 वर्षे

प्लॅस्टिक पिशव्या

500-1000 वर्षे

संदर्भ: How long it takes for some everyday items to decompose.

https://www.down2earthmaterials.ie/2013/02/14/decompose/


पर्यावरणाचा र्‍हास आणि भारतातील परिस्थिती

अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेने (USEPA) तयार केलेल्या एका अहवालानुसार जगात १० लाखाहून अधिक समुद्र पक्षी, एक लाखाहून अधिक शार्क, कासव, डॉल्फिन्स आणि देवमासे प्लॅस्टिकचे सेवन करुन अकाली मृत्यु पावतात. २८ लाख मेट्रीक टन प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण भारतातल्या नद्यांतून समुद्रात वाहून जातात. भारतातील समुद्रकिनाऱ्यांवर झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासात (आकृती क्र. १) असे आढळून आले आहे की ओडिशाचे किनारे कमीतकमी तर लक्षद्विप बेटे सर्वाधिक प्रदूषित आहेत. 


 आकृती क्र. १: भारताच्या किनाऱ्यावर विविध अभ्यासाअंती प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण

आधार : NCSCM चे माहितीपत्रक


प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचे मानवावर होणारे परिणाम

समुद्राचे पाणी हा मिठाचा स्रोत. चीनमध्ये एका अभ्यासादरम्यान मीठ उत्पादन करणाऱ्या पंधरा कंपन्यांच्या मिठाचे पृथःक्करण केले गेले. त्यांना सगळ्याच कंपन्यांच्या मिठात प्रत्येक किलोग्राममध्ये सुमारे ६०० प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण आढळून आले. समुद्रात वाहात आलेले हे सूक्ष्मकण समुद्रातील प्राण्यांच्या अन्नसाखळीत शिरतात. या प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचा परिणाम समुद्रातील प्राण्यांवर होत असल्याचे लक्षात आले आहे कारण ते अन्न समजून त्याचे सेवन करतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या यकृतात विषारी रसायनांच्या संचयाकडे होतो. हे सूक्ष्मकण शेवटी मत्स्याहार घेणाऱ्याच्या पोटात विसावतात. विशेषतः शंख-शिंपले वर्गीय (मोलस्क्स) समुद्री अन्नात याचे प्रमाण अधिक असते. प्रत्येकी तीन ग्रॅम अन्नात किमान एक कण असल्याचे आढळून येते. हे कण पोटात गेले की त्याचा चयापचयावर परिणाम होत असल्याचे लक्षात आले आहे, आतड्यांमध्ये अन्न पुढे सरकण्याच्या सहज क्रियेला अडथळा निर्माण होतो आणि विषारी रसायनांच्या निर्मितीचा तो एक स्रोतच बनतो. यावर आणखी संशोधन चालू आहे. पण प्राथमिक संशोधनातून असे आढळून आले आहे की याचा परिणाम यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांवर होऊ शकतो. वातावरणात तरंगणारे असे सूक्ष्मकण श्वासावाटेही माणसाच्या शरीरात प्रवेश करतात आणि फुफ्फुसात जमा होऊन परिणाम करतात. प्लॅस्टिकचे डबे बनवायला बिस्फेनॉल या रसायनाचा वापर केला जातो. या डब्यांमध्ये अन्नपदार्थ साठवले की हे बिस्फेनॉल अन्नात काही प्रमाणात उतरते असा अंदाज आहे आणि याचा स्त्रियांच्या संप्रेरकांवर परिणाम होतो.


प्रदूषण कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न

देश आणि जागतिक पातळीवर प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न विविध प्रकारे चालू आहेत. त्यात समाजामध्ये याबाबत जागरुकता घडवून आणणे आणि त्याच्या संबंधी विविध माध्यमातून माहिती देण्याचे काम महत्त्वाचे समजले जाते. लोकशिक्षणातून याला आळा घालता येणे शक्य आहे. दरम्यान कुठल्या ठिकाणी किती प्रमाणात प्रदूषण होत आहे, त्याचे निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचे संशोधन, परिसंस्थेचा अभ्यास आणि त्यात होणारे बदल, प्रदूषणाची या बदलांशी सांगड घालत त्यांच्या परिणामांचा निरंतर अभ्यास केला जातो. कचऱ्याचे व्यवस्थापन हाही एक महत्त्वाचा विषय. त्यावर संशोधन आणि निघालेल्या निष्कर्षांची अंमलबजावणी करण्याचे काम संस्था पातळीवर चालते. वेगवेगळे नियम आणि कायदे करुन प्लॅस्टिकच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना त्याच्या पुनर्वापरासाठी उद्युक्त करणे, त्यासाठी साह्यभूत ठरणारी आर्थिक प्रोत्साहन योजना राबवणे हाही एक निरंतर प्रयत्नाचा मार्ग अवलंबला जातो. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्लॅस्टिकच्या वस्तूंचे उत्पादन आणि वापरावर काही वेळा बंदीही आणली जाते.


आपलाही खारीचा वाटा 

पण हे काम सरकारनेच करावे असा दृष्टिकोन बाळगणे आपल्या सर्वांकरता घातक ठरु शकते. म्हणून आपण प्रत्येकजण व्यक्तिगत पातळीवर यात आपला खारीचा वाटा उचलू शकतो. तो असा: (१) बाजारात जाताना कापडी पिशव्या घेऊन जा. केलेल्या खरेदीसाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा. हे काम ग्राहकानेच करणे आवश्यक आहे. कारण विक्रेता पिशवी दिली नाही तर गिर्‍हाईक दुसरीकडे जाईल या विवंचनेत असतो. (२) आपण प्लॅस्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर करण्यावर भर देणे आवश्यक आहे. एकदाच वापरलेला चमचा, थाळी वगैरे कचऱ्यात न टाकता पुनःपुन्हा वापरा. (३) भारतात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सुती कपडे वापरण्यावर भर द्या. त्यातून कायमचा भुकेला शेतकरी काही मिळवू शकेलच पण कृत्रिम धागा वापरुन बनवलेल्या वस्त्रप्रावरणातून धागे सुटे होत सूक्ष्मकणांच्या रूपात हवेत पसरतात त्याचे प्रमाण कमी होईल. (४) मुलांना शक्यतो लाकडी खेळणीच द्या. प्लॅस्टिकची खेळणी घातक कचऱ्यात भर घालतात. त्यातूनही स्थानिक सुतारांना काम मिळण्याची शक्यता वाढेल. (५) आजकाल शहरी मध्यमवर्गात पालक नोकरी, उद्योगात व्यस्त असल्याने आणि त्यांच्या हाती त्यातून भरपूर पैसा जमा होत असल्याने बाहेरुन तयार जेवण मागवण्याची पद्धत रूढ होत आहे. असे तयार खाद्यपदार्थ पुरवणारे उद्योगही वाढत आहेत. हे अन्न प्लॅस्टिकच्या डब्यातून, वेष्टनातून पुरवले जाते. प्रत्येक खाद्यपदार्थाला एक वेगळे वेष्टन! चार जणांचे अन्न बाहेरुन मागवले की मोठाच प्लॅस्टिकचा कचरा गोळा होतो जो प्रदूषणात भर घालतो. हे टाळणे सहज शक्य आहे. घरी स्वयंपाक अशक्य असेल तर रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवावे. त्यातून कमी कचरा निर्माण होतो. (६) अन्न घरपोच करण्याबरोबर इतर वस्तूही आजकाल खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ऑर्डर केल्या जातात. या वस्तूंची खरेदी बाजारभावापेक्षा स्वस्तातही होते. पण त्यांच्या वेष्टनातूनही खूप मोठा कचरा निर्माण होतो याची जाणीव असू द्या. (७) पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःची बाटली बाळगून त्याचा पुनर्वापर करा. शक्यतो ती प्लॅस्टिकची नसावी. वर नमूद केल्याप्रमाणे बिस्फेनॉलचे कण पाण्यात उतरण्याची शक्यता वाढते. विकतची दुखणी का घेता? (८) नगरपालिका आणि इतर स्थानिक संस्थांना कचरा गोळा करताना त्याच्या प्रकारानुसार त्याचे वर्गीकरण करायला भाग पाडा. जैविक कचरा शक्यतो घरीच कुंड्यात, परसदारी जिरवा. त्याचे छान खत तयार होते. फुलझाडे, भाज्या लावा आणि त्याचा आनंद लुटा. (९) स्वयंपाकघरात शक्यतो साठवणूक करायला प्लॅस्टिकच्या बाटल्या, डब्यांचा वापर टाळा. त्यापेक्षा काचेच्या, धातूच्या वस्तू श्रेयस्कर. (१०) घरात, वाढदिवसासारख्या कार्यक्रमात सजावट करायला प्लॅस्टिकच्या वस्तू संपूर्ण टाळा. फुगे आणि प्लॅस्टिकच्या इतर वस्तू प्रदूषणात भर घालतात. 


कुठल्याही चांगल्या उपक्रमाची सुरुवात स्वतःपासून करावी असे म्हणतात. प्लॅस्टिकमधून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्याकरता तुम्हीही मदत करु शकता आणि पुढच्या पिढ्यांच्या हाती स्वच्छ निसर्ग सोपवू शकता.


हा लेख 'शैक्षणिक संदर्भ' च्या फेब्रुवारी-मार्च २०२१ (अंक १२८) अंकात प्रसिद्ध झाला.


संदर्भ: 

१. Ranjan, V.P., et al. Microplastics and other harmful substances released from disposable paper cups into hot water. J. Hazard. Mater. 404, 124118 (2020)

२. ‘Kulhads’ to replace plastic tea cups at Indian Railway stations. (https://timesofindia.indiatimes.com/life-style/food-news/plastic-free-india-kulhads-to-replace-plastic-tea-cups-at-indian-railway-stations/articleshow/79487620.cms)


1 टिप्पणी: