भारतातील नद्यांच्या विसर्गाचा विचार केला तर सुमारे अर्धा (~४०००० घन मीटर) विसर्ग हा एकट्या ब्रह्मपुत्रा या नदीतून होतो. मुख्यत्वेकरुन पाऊस आणि काही प्रमाणात हिमालयातील बर्फाच्या वितळण्यामुळे या नदीला एवढे पाणी असते. ब्रह्मपुत्रेच्या खोर्याचा विस्तार एवढा प्रचंड आहे की तिचा क्रमांक जगातल्या सर्वात मोठ्या नद्यांमध्ये तिसरा लागतो. तिचा विसर्ग, पात्र, ती करत असलेला प्रवास या सगळ्यातल्या विशालतेमुळे पूर्वोत्तर भारतातले नागरिक तर तिचा नदीऐवजी 'नद' आणि 'ब्रह्मपुत्र' असा पुल्लिंगी उच्चार करतात. बाकीच्या त्या नद्या पण हा मात्र नद! ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या बांगलादेश, ईशान्य भारत, भूतान, तिबेट आणि चीन या देशांमधील एकूण सहा कोटींहून अधिक लोकसंख्येचा आधार आहे. तेथील सामाजिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक जीवन आणि आर्थिक स्रोताचा मुख्य आधार म्हणजे ब्रह्मपुत्र असे म्हटले जाते. मासेमारी, विविध हंगामात केलेल्या भाताच्या शेताचे सिंचन त्या भागात सुबत्ता आणते. पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहात आलेला गाळ शेतीला तर उपकारक ठरतोच पण नदीतल्या अनेक बेटांना वाळूचा पुरवठा करत त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवतो आणि सुंदरबनातील काही सखल भागात बंगालच्या उपसागरातील खारे पाणी अडवत तिथली आर्थिक गणितं बसवतो. असे जरी असले तरी नदीला आलेले पूर त्या भागाची, विशेषतः आसाम आणि बांगलादेश, वाताहतही घडवून आणतात. जुलै ते सप्टेंबर दरम्यान दहा दिवसांपेक्षा अधिक पाऊस पडला तर पूर हा ठरलेलाच. १९९८ सालचा पूर सुमारे ७०% आसाम आणि बांगलादेश जलमय करुन गेला आणि सुमारे तीन कोटी नागरिकांवर आणीबाणीची परिस्थिती ओढवली हे मोठेच उदाहरण. १९८७, १९८८, २०१० आणि २०२० या वर्षांतील पूरही काही कमी हानी पोहोचवणारे नव्हते. अनेक नागरिकांची रोजीरोटी काढून घेणारे आणि ओला दुष्काळ आणणारे असे हे पूर होते.
आकृती: उपकरणाद्वारे बहादुराबाद (बांगलादेश) येथे जुलै ते सप्टेंबर (इ.स.१९५६ ते २०११) दरम्यान झालेल्या विसर्गाच्या घेतलेल्या नोंदी आणि त्याची सरासरी (४३,३५० घन मीटर प्रत्येक सेकंदाला) (आलेख निळ्या रंगात), ट्री रिंग्जमधून ७०० वर्षात (इ.स. १३०९ ते २००४ दरम्यान) झालेल्या पावसाचा अंदाज (सरासरी ४६,९९३± ८१२ घन मीटर प्रत्येक सेकंदाला), आणि इतर अंदाज यांची तुलना. हिरव्या आणि तपकिरी रंगातले आलेख सरासरी काढण्यासाठी वापरले आहेत. १७८७ ते २०१० दरम्यान ब्रह्मपुत्रेला आलेले पूर लाल त्रिकोणात दाखवले आहेत. मूळ लेखातील आकृती मजकूराशी निगडित आवश्यक फेरफार करुन सादर
मानवनिर्मित सल्फेटच्या वातावरणातील सूक्ष्मतुषारांमुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जरी एकूण पावसाच्या सरासरीत घट दिसत असली तरी एकविसाव्या शतकात सल्फेटमधील घट आणि कार्बन-डाय ऑक्साईडच्या वाढीव उत्सर्जनामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल असे अंदाज आहेत. हा वाढीव पाऊस आणि जागतिक तापमानवाढीमुळे हिमनगांचे वितळण्याचे प्रमाण याचा विचार करता ब्रह्मपुत्रेला पूर येऊन तेथील परिस्थिती वारंवार बिकट होण्याची शक्यता आहे. पण किती मोठ्या प्रमाणात पूर येतील याचा अंदाज कसा करायचा? भविष्यकाळात काय बदल घडू शकतात याचा अंदाज भूतकाळात काय घडले यावरुन बांधले जातात. बहादुराबाद (बांगलादेश) येथे पर्जन्यमापक उपकरणे वापरुन गोळा केलेली १९५६ ते २०११ च्या दरम्यानची माहिती उपलब्ध आहे. पण ही सुमारे साठ वर्षांची माहिती येत्या शतकाच्या वर्षांत काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज घेण्याकरता तोकडी ठरते. अशा वेळी निसर्गाने मागे ठेवलेल्या पाऊलखुणा वापरुन अशी माहिती गोळा करण्याची पध्दत आहे. याला पुराजीवशास्त्र असे म्हणतात. उदा. जुन्या वृक्षांच्या खोडांचा आडवा छेद गेल्या अनेक वर्षांच्या हवामानावर प्रकाश पाडतो. दरवर्षी खोडाची जाडी वाढते आणि त्या जाडीशी निगडित एका कड्याची (रिंग) भर पडते. कड्याची जाडी विशिष्ट वर्षातील हवामानाची माहिती पुरवते. म्हणजे असे की एखाद्या वर्षी उत्तम पाऊस पडला असेल तर कड्याची जाडी रुंद तर दुष्काळी परिस्थितीत ती अरुंद. यावरुन विशिष्ट वर्षी किती पाऊस पडला याचा अंदाज बांधता येतो. जगभरातून गोळा केलेल्या वृक्षांच्या खोडांच्या छेदांची जपणूक 'इंटरनॅशनल ट्री रिंग डेटा बँक' या अमेरिकेच्या संस्थेत केलेली आहे. एका भारतीय वंशाच्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या चमूने ब्रह्मपुत्रेच्या खोर्यातील २८ झाडांच्या खोडातील कड्यांचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांना इ.स. १३०९ ते २००४ पर्यंतच्या हवामानाचा अंदाज बांधता आला. ही सुमारे सातशे वर्षांची माहिती त्यांनी उपलब्ध असलेल्या उपकरणांद्वारे गोळा केलेल्या गेल्या साठ वर्षातील माहितीशी निगडीत केली आणि हवामानातील इतर बदलांचा मागोवा घेत त्यांनी ब्रह्मपुत्रेच्या खोर्यात एकविसाव्या शतकात दरवर्षी किती पाऊस पडेल, याचा अंदाज बांधला आहे. पर्जन्यमापक उपकरणांद्वारा गोळा केलेल्या गेल्या केवळ साठ वर्षाच्या माहितीवरुन अंदाज बांधण्याऐवजी सातशे वर्षाच्या माहितीवरुन दीर्घकालीन अंदाज बांधणे केव्हाही शहाणपणाचे. मुख्य म्हणजे गेल्या साठ वर्षाच्या माहितीवरुन बांधलेला अंदाज एकूण विसर्गात सरासरी वाढ जरी दाखवत असला तरी ती सरासरीपेक्षा फार मोठी नसल्याने आपण त्याचे नियोजन करायला काणाडोळाच करण्याची शक्यता अधिक. पण सातशे वर्षांच्या सरासरीवरुन बांधलेला अंदाज ही वाढ फार मोठी असल्याचे दाखवतो. दर वर्षी हा विसर्ग वाढत जाऊन २१०० साली दर सेकंदाला सुमारे ५५००० घनमीटर होईल असा हा अंदाज सांगतो (आकृती). त्यामुळे आपल्याला चालू शतकात इतकी वाढ होईल हे समजून नियोजन करावे लागेल. हे मनुष्यहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक आहे. वैज्ञानिक संशोधन भविष्यात असे डोकावून बघायला मदत करते. ते समजावून घेत यापुढची जबाबदारी असते ती धोरणकर्त्यांची.
संदर्भ: Rao, M. P. et al. (2020) Seven centuries of reconstructed Brahmaputra river discharge demonstrate underestimated high discharge and flood hazard frequency. Nature Communications. 11; Article ID: 6017. https://dx.doi.org/10.1038/s41467-020-19795-6
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा