छायाचित्रः चतुर (आभारः विकिमिडीया) |
दरवर्षी लाखो कीटक हजारो किलोमीटर प्रवास करीत त्यांचे निवासस्थान ऋतूनुसार बदलत असतात. प्रजननासाठी अनुकूल ठिकाण आणि योग्य असे अन्न मिळवणे हा हेतू. हे स्थलांतर अगदी महासागर ओलांडूनही केले जाते. यामुळे ते दोन खंडांवरील परिसंस्थांना जोडणारे दुवे ठरतात. एका ठिकाणावरुन दुसरीकडे परागकणांची वाहतूक होते, दूरवर त्यांचा प्रसार होतो आणि अन्न साखळी निर्माण करायला हे स्थलांतर उपकारक ठरते. चतुरांसारख्या (त्यांना मराठीत 'पतंग' या नावानेही ओळखले जाते) लहान आकाराच्या कीटकाचाही अशा स्थलांतरितात समावेश आहे. आफ्रिकेतून हे चतुर पावसाळ्यापूर्वी भारतात येतात आणि पावसाळा संपला की त्यांचा परतीचा प्रवास सुरु होतो. ते असे स्थलांतर करतात याबाबतचा आणि त्यांच्या मार्गाचाही काहीसा अभ्यास यापूर्वीच झालेला आहे. पण एवढेसे कीटक हजारो किलोमीटर अंतर कसे काय पार करु शकतात, एवढी शक्ती त्यांच्यात कुठून येते, मधले थांबे ते कसे निवडतात, एका उड्डाणादरम्यान अधिकाधिक किती वेळ ते उडू शकतात वगैरे प्रश्न अनुत्तरीतच होते. आयआयटी, खरगपुरच्या संशोधकांनी नुकताच, चतुर एका उड्डाणादरम्यान किती लांब जाऊ शकतात, त्यांना उडताना कोणत्या बाह्य शक्तीची मदत होते, मार्गात येणारे थांबे कुठले आहेत वगैरे बाबींचा अभ्यास केला आहे त्याचा हा गोषवारा.
एकूण आठ-दहा हजार कि.मी. वार्षिक प्रवास करणार्या या अवघेच इंच लांब पंख असणार्या या चतुरांचा, त्यांच्यातील ऊर्जेचा, शक्तीचा अभ्यास केला. त्यांना असे दिसून आले की त्यांच्यात असलेल्या शक्तीच्या जोरावर ते सुमारे ९० तास कुठेही थांबा न घेता साधारण ४.५ मीटर प्रतिसेकंद या वेगाने अंतर पार करु शकतात कारण त्यावेळी साधारण १५ मीटर प्रति सेकंद वाहणार्या वार्याचा वेग त्यांना ढकलतो. म्हणजेच एका उड्डाणादरम्यान फक्त ४०० किलोमीटर ते उडू शकतात. अर्थात हे अंतरही चतुरांच्या आकाराकडे पाहिले तर आश्चर्यकारकच आहे. पण मग मात्र त्यांच्यातले 'इंधन' संपते. मग आफ्रिकेतील सोमालिया ते भारत हे २८०२ किलोमीटरचे अंतर मध्ये कुठेही थांबा नसताना ते मे-जून दरम्यान एकाच दमात पार करतात ते कसे? त्यांचा परतीचा प्रवास वेगळ्या मार्गाने होतो. पावसाळ्यानंतर ते मालदीव - सेशेल्स येथे थांबे घेत आफ्रिकेत दक्षिणेकडे मोझांबिकला पोहोचतात. भारत ते मालदीव हे अंतर ११३७ कि.मी.चे, तर मालदीव ते सेशेल्स २५६५ कि.मी.चे आणि शेवटचा टप्पा सेशेल्स ते मोझांबिक २०५६ कि.मी.चा. संशोधकांनी त्यांच्या एका उड्डाणादरम्यान त्यांना कापता येणारे अंतर जाणल्यानंतर, पुढचा प्रश्न होता की ते एवढे अंतर कसे पार करतात आणि येताना एक मार्ग तर जाताना थांबे घेत परतण्याचा दुसरा मार्ग का? याचा शोध घेताना त्यांना एक दुवा सापडला तो म्हणजे ते विशिष्ट काळातच स्थलांतर करतात. म्हणजे त्या दरम्यानची परिस्थिती त्यांना अनुकूल असायला हवी. मग त्याचा मागोवा घेण्याकरता त्यांनी ते किती उंचीवरुन उडतात, वार्याच्या लोटाचा परिणाम त्यांच्या उड्डाणशक्तीवर होतो का हे तपासले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की पावसाळ्यापूर्वी हिन्दी महासागरावरील वारे उत्तरेकडे सोमालियापर्यंत वाहात अरबी समुद्रात शिरतात आणि भारताच्या पश्चिम किनार्यावर येऊन थडकतात. हा वार्यांचा झोत चतुरांना सोमालियापासून भारतापर्यंत विनाथांबा प्रवास करायला मदत करतो. हेच वारे भारतीय उपखंडावर पाऊसही घेऊन येतात त्यामुळे त्यातील आर्द्रताही त्यांना या प्रवासादरम्यान मदत करते. हा सुमारे ३००० कि.मी.चा प्रवास आश्चर्यकारकरित्या केवळ ४५ तासातच ते पुरा करतात. पावसाळ्याअखेर वार्याची दिशा बदलते. सोमालियाकडून येणारा वार्याचा वेग मंदावतो आणि ते वारे उत्तरेकडून दक्षिण-पूर्व दिशेला वाहायला लागतात. या कीटकांचा परतीचा प्रवासही ऑक्टोबरपासून सुरु होतो ते त्यांना या वार्याचे ज्ञान असल्यानेच. डिसेंबर अखेर पावेतो ते पुन्हा आफ्रिकेत मोझांबिकमध्ये जाऊन पोहोचलेले असतात.
आकृती: चतुरांचा प्रस्तावित स्थलांतर मार्ग. पिवळे ठिपके चतुरांच्या अस्तित्वाची नोंद झाल्याचे ठिकाण दर्शवतात. |
आकृतीत दाखवलेला मार्ग हा सगळ्याच चतुरांचा असतो असे नाही. त्यांच्या उड्डाणादरम्यान ज्या दिशेने वारे अनुकूल असतील त्या दिशेने ते भरकटतात आणि म्हणूनच त्यांचे अस्तित्व अनेक ठिकाणी आफ्रिका आणि भारतीय उपखंडात दिसून येते. अगदी भारताच्या पश्चिम दिशेच्या विरुद्ध बाजूला उत्तर-पूर्व भागातल्या चेरापुंजी येथेही त्यांचे अस्तित्व आढळले आहे. असे जरी असले तरी त्यांचा परतीचा प्रवास त्यांना वारे अनुकूल झाल्यावरच सुरु होतो. परततानाही ते थोडेफार वार्याच्या अनुकूलतेनुसार भरकटतात असे लक्षात आले आहे. उदाहरणार्थ, चेरापुंजीतल्या चतुरांचा प्रवास सप्टेंबरअखेरीस सुरु होतो आणि तो भारताच्या पूर्व किनार्यालगत विसाखापट्टणच्या आसपास एखादा टप्पा घेत काही मंगळूरुला तर काही तिरुवनंतपुरमला तर काही विसाखापट्टण टाळून परस्पर श्रीलंकेला पोहोचतात. तेथून मग पुढे मालदीव - सेशेल्स - मोझांबिकला (आफ्रिका) जातात. संशोधकांनी परतीच्या प्रवासादरम्यान लागणार्या वेळाचाही अंदाज घेतला आहे. भारतातून मालदीवला पोहोचायला त्यांना सुमारे ४८ तास पुरतात. परतीच्या प्रवासात त्यांना वार्याची तितकी साथ नसते जितकी येताना ती मिळते. म्हणून प्रवासाचा वेळ आणि कापलेल्या अंतरात मोठाच फरक दिसून येतो. मालदीव - सेशेल्स आणि सेशेल्स - मोझांबिकचा प्रवास तर आणखी खडतर होतो. या दोन टप्प्यांना अनुक्रमे ९० आणि ८१ तास लागत असल्याचे अनुमान त्यांनी काढले आहे. म्हणजे अखेरीस ते आफ्रिकेत पोहोचतात तेव्हा त्यांच्यातल्या शक्तीचा संपूर्ण निचराच होतो म्हणा ना! पण मध्ये कुठेही थांब्याची सोयच नसल्याने त्यांना हे अंतर पार करायला लागतेच. पण म्हणजे त्याचा असा दुसरा अर्थ की या प्रवासादरम्यान ते कमीतकमी वेगाने उडताना जो काही वारा त्यांना साथ देतो त्याचा पुरेपूर उपयोग करुन घेत आपले ठिकाण गाठतातच.
स्थलांतराचा मार्ग अचूकपणे ओळखल्याने त्यांच्याबरोबर येणारे परागकण कुठले असतील तसेच त्यांच्याबरोबर येणार्या इतर किडींच्या संभाव्य परिणामाचा अदमासही करता येतो. स्थलांतरादरम्यान वापरल्या जाणार्या मार्गाच्या आणि लागणार्या वेळेच्या अभ्यासातून मग संभाव्य किडींचा परिणाम टाळण्यासाठी तयारी करता येते. त्यांच्या प्रवासातल्या थांब्यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या शरीरातील समस्थानिकांचा (आयसोटोप) अभ्यास केला गेला. त्यातून त्यांनी कुठले अन्न सेवन केले आहे याचा अंदाज बांधता येतो आणि अशा प्रकारचे अन्न कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानुसार थांब्यांचा किंवा मागील मुक्कामाचा माग काढता येतो.
एकूण वार्यावर स्वार होत अधिकाधिक अंतर कापण्याची चतुराई त्यांच्या चतुर या नावाला शोभून दिसते असेच म्हणावे लागेल. प्रवासादरम्यान त्यांचे भरकटणे याला वार्याची दिशा, आर्द्रता आणि अशी प्राकृतिक कारणेच कारणीभूत आहेत असे या अभ्यासाअंती म्हणावे लागते. प्रवासासाठी यांची अनुकूलता आहे, एवढ्या मोठ्या महासागरात असलेली ही इवलीशी बेटे कुठल्या दिशेला आहेत हे त्यांना कसे समजते हे मात्र अद्याप कोडेच आहे. त्यासाठी त्यांना निसर्गाने वेगळेच इंद्रिय दिले असल्याची अनुभूती येते. पण यातून संशोधकांना एक प्रश्न छळतोय की गेल्या काही वर्षांपासून आपण अनुभवत असलेल्या हवामान बदलांना ते कसे तोंड देतील? त्यांच्या स्थलांतराला आळा बसेल का? तसेच दरवर्षी समान उड्डाण मार्गाने त्यांचे हे येण्या-जाण्याचे ज्ञान ते एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे कसे देतात की तेही अनुवंशिकतेतून येते याचा उलगडा अद्याप झालेला नाही. कदाचित त्यांनाही 'केल्याने देशाटन, ... मनुजा येतसे चातुर्य फार॥' या श्लोकाची अनुभूती असावी आणि अशा चातुर्यासाठीही हे चतुर स्थलांतर करत असावेत एवढेच आपण संशोधनातून यावर अधिक प्रकाश पडेपर्यंत म्हणू शकतो!
संदर्भ: Ranjan, K.S., et al. Transoceanic migration of dragonflies and branched optimal route networks. https://arxiv.org/abs/2206.11226
---------------------
हा लेख दैनिक हेराल्डच्या १७ ऑगस्ट २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा