उष्ण_पाण्याचे_झरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उष्ण_पाण्याचे_झरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २७ जून, २०२१

उष्ण पाण्याचे झरे: उत्क्रांती आणि मूलद्रव्ये /Thermal springs: Evolution and elements

 उष्ण पाण्याचे झरे हा प्रकार तसा विरळा. पावसाचे आणि नदी-ओढ्यातले पाणी सगळीकडेच जमिनीत मुरते. पण काही ठिकाणी त्यातील भेगांतून, भ्रंशांतून (फॉल्ट्स) ते खोलवर जाते. पृथ्वीच्या भूभागाची उष्णता खोलीनुसार वाढत असल्यामुळे मुरणार्‍या पाण्याशी तिचा संयोग होऊन पाणीही तापते. या तापण्याच्या क्रियेमुळे पाण्यावरचा दाब वाढतो आणि ते उसळून भूभागावर येते. यालाच आपण उष्ण पाण्याचे झरे म्हणतो. पाणी मुरताना खडकांशी होणारा त्याचा संयोग पाण्याचे गुणधर्म बदलास कारणीभूत ठरतो कारण त्यातील घटक पाण्यामध्ये शोषले जातात. या गुणधर्मांनुसार कुठल्या प्रकारच्या खडकांशी त्याचा संयोग झाला हे ठरवता येते. 

आकृती १: उष्ण पाण्याचे झरे असलेली ठिकाणे आणि नमुने गोळा केलेल्या ठिकाणांचा नकाशा
आकृती १: उष्ण पाण्याचे झरे असलेली
ठिकाणे आणि नमुने गोळा केलेल्या
ठिकाणांचा नकाशा
भारतामध्ये उष्ण पाण्याचे झरे एकूण सात पट्ट्यांमध्ये - हिमालयाच्या उत्तर-पश्चिम रांगात, सोहाना (हरयाणा), तुवा (गुजरात) आणि सोन-नर्मदा-ताप्ती (सोनाटा) नद्यांचे क्षेत्र या गुजरात ते पश्चिम बंगालपर्यंतच्या पूर्व-पश्चिम पट्ट्यात, गोदावरीच्या खोर्‍यात (मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश), महानदीच्या खोर्‍यात (छत्तीसगढ) आणि महाराष्ट्रात पश्चिम किनार्‍यालगत - आढळतात. दक्षिणोत्तर पसरलेल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यालगत सुमारे ३५० कि.मी. लांबीच्या पट्ट्यात पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत एकूण १८ ठिकाणी (आकृती १) साठापेक्षा अधिक संख्येने उष्ण पाण्याचे झरे सापडतात. या झर्‍यांतील पाण्याची उष्णता ४० ते ७२ अंश सेल्सियस आहे. या प्रांताला भूशास्त्रीय भाषेत दक्खन ज्वालामुखीचा प्रांत (डेक्कन व्होल्कॅनिक प्रॉव्हिन्स) असे म्हणतात. सुमारे ५ लाख चौरस कि.मी. चा प्रशस्त भूभाग जगातल्या सर्वात मोठ्या बसाल्टच्या साठ्याने (ज्वालामुखीच्या लाव्हा रसामधून तयार झालेला खडक) व्यापलेला आहे. हा दक्षिणोत्तर पट्टा लांब पण अरुंद अशा चरांनी आणि भ्रंशांनी चिरफाळलेला आहे आणि या पट्ट्यात उष्ण पाण्याचे झरे सर्वसाधारणपणे भारताच्या पश्चिम किनार्‍याशी समांतर अशा पश्चिमोत्तर आणि पूर्व-दक्षिण दिशांमधील भ्रंशात सापडतात. या पट्ट्यात बसाल्टच्या थराची जाडी सुमारे ६०० ते २५०० मीटर इतकी आहे. ही जाडी उत्तरेकडून दक्षिण दिशेला कमी-कमी होत जाते. राजापूरजवळचा भूभाग तर त्रिस्तरीय आहे. तळचा थर पृथ्वीच्या निर्मितीच्या सुमारास (अतिपुरातन - प्रीकँब्रियन) तयार झालेल्या ग्रेनाईट, पट्टिताश्म आणि क्वार्ट्झाइटने बनलेला, मग त्यावर गाळाचा खडक आणि त्यावर बसाल्टच्या खडकाचे थोड्या-फार प्रमाणात अस्तित्व दिसते.

बोरॉन समस्थानिके (आयसोटोप) आणि दुर्मिळ मृदा मूलद्रव्ये वापरुन आयआयटी-मुंबईच्या संशोधकांनी महाराष्ट्रातल्या पश्चिम किनार्‍यावरील उष्ण पाण्यातील रासायनिक मूलद्रव्यांचा शोध घेतला त्याचा हा वृत्तांत. रासायनिक गुणधर्मांव्यतिरिक्त त्यांनी झर्‍यांच्या, पावसाच्या आणि समुद्राच्या पाण्याचे उच्च तापमान मोजले. शिवाय दाबाखाली जेव्हा बसाल्ट आणि ग्रॅनाइट खडकाशी संयोग होतो तेव्हा त्याचे पाण्यावर काय परिणाम होतात याचे अनुमान काढण्यासाठी प्रयोग करुन माहिती गोळा केली. याचा उपयोग त्यांना उष्ण पाण्याच्या झर्‍यांचे मूळ आणि उत्क्रांतीचा शोध घेणे सोयीचे झाले.

संशोधकांनी या परिसरातील १५ उष्ण पाण्याच्या झर्‍यांतून, ८ भूजल आणि २ नद्यांतून पाण्याचे नमुने गोळा केले. ते गोळा करताना पाण्याचे तापमान, पीएच (एक लिटर पाण्यातील हायड्रोजन आयनांची ग्रॅममध्ये संहति दर्शविणारी संक्षिप्त संज्ञा) आणि वाहकतेचीही (conductivity) नोंद घेतली. या प्रयोगाअंती त्यांना असे आढळले की तुलनेने उत्तरेकडील उष्ण झर्‍यांच्या आणि विहिरींच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार (सोडियम आणि कॅल्शियम क्लोराईड) आहेत आणि त्यामुळे त्याची वाहकताही वाढली आहे. अर्थात काही ठिकाणी सल्फेट्सचे प्रमाणही आढळले. याला अपवाद हा राजापूरच्या झर्‍यांचा. राजापूरच्या झर्‍यांमध्ये बायकार्बोनेट्सचे अधिक्य त्यांनी नोंदवले (आकृती २). समुद्राच्या पाण्याशी होणार्‍या संयोगामुळे उत्तरेकडील पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याचे ते नमूद करतात. विहिरी आणि नद्यांच्या पाण्यातही कॅल्शियम/ सोडियम क्लोराईड मोठ्या प्रमाणात आहे. उष्ण पाण्याच्या झर्‍यांत उच्च तापमानात बसाल्ट आणि समुद्राच्या पाण्याची रासायनिक क्रिया मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कार्बोनेट्सपेक्षा क्षारता वाढायला कारणीभूत आहे असे त्यांचे अनुमान आहे. राजापूरच्या झर्‍यांमध्ये ग्रेनाईटसारख्या खडकाशी पाण्याचा संयोग होत असल्याने बायकार्बोनेट्समध्ये वाढ आणि त्यातील मुख्य आणि लेश मूलद्रव्यांचे घटक त्या पाण्याचे ग्रेनाइटच्या खडकातून अभिसरण झाल्याचे स्पष्टपणे दर्शवितात. एकूण या सगळ्या झर्‍यांचे पाणी अल्कधर्मी ते उदासीन (ना अल्क ना आम्ल) अशा गुणधर्माचे असल्याचे ते नमूद करतात. त्यांचा बोरॉन समस्थानिकांचा अभ्यास प्रथमच गाळाच्या खडकाची (कडलगी आणि धारवाड) निर्मिती सागरी गाळातून झाल्याचे आणि त्याच दरम्यान उन्हावरे-फरारे आणि तुरल येथील झरे विकसित झाल्याचे सिद्ध करतो तर बेरियम आणि फ्लोरिन या मूलतत्वांची राजापूर येथील झर्‍यातील पाण्यातील घनता ग्रेनाईटच्या खडकातून विकसित झाल्याचे ते सिद्ध करतात. एका प्रतिमानानुसार त्यांनी असेही दाखवून दिले की सुमारे २००० मीटर खोलीवर असलेल्या पाण्याचे तापमान सुमारे ५५ अंश सेल्सियस असू शकते.

आकृती २: पश्चिम किनार्‍यावरील उष्ण पाण्याच्या झर्‍यांची उत्क्रांती दाखवणारे आरेखन
आकृती २: पश्चिम किनार्‍यावरील उष्ण पाण्याच्या झर्‍यांची उत्क्रांती
दाखवणारे आरेखन

या पट्ट्यातील झर्‍यांचे तीन भागात विभाजन करतातः १. उत्तरेकडील झरे (अधिकतम क्षारयुक्त पाण्याचे - समुद्राच्या पाण्याशी संयोग होत असल्यामुळे), २. मधल्या भागातले झरे (र्‍हायोलाईट - हा ही ज्वालामुखीतून निर्माण झालेला खडक - खडकाचे अधिक्य असलेला भाग) आणि ३. दक्षिणेच्या टोकाचे झरे (मठ आणि राजापूर; बेरियम आणि बोरॉन चे अधिक्य असलेल्या गाळाच्या खडकाची उपस्थिती आणि त्याखाली अतिपुरातन खडकाचा थर असलेला भाग).

उष्ण पाण्यात घन पदार्थ विरघळण्याची क्षमता थंड पाण्यापेक्षा नेहमीच जास्त असते. उष्ण पाण्याच्या झर्‍यात म्हणून वर नमूद केल्याप्रमाणे त्याचा विविध खडकांशी संयोग झाल्यामुळे त्यात अगदी साध्या कॅल्शियमपासून ते लिथियम-रेडियमपर्यंत सर्व प्रकारची खनिजे विरघळलेल्या रुपात आढळतात. उष्णता आणि अशा विविध घटकांनी श्रीमंत झालेले असे विरळ्या ठिकाणी उपलब्ध असलेले पाणी निसर्गोपचाराकरता उपयोगी असल्याचे म्हटले जाते. या झर्‍यातले स्नान आरोग्यास लाभदायक ठरते असा अनेकांचा विश्वास आहे. पण या विश्वासाला नवसंशोधनाची फारशी जोड मात्र सापडत नाही. अर्थात पाण्यात डुंबणे हा विरंगुळा असतो. तणाव कमी झाल्याने सकारात्मकता वाढीस लागते आणि मग एकूणच मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. उष्ण, विशेषत: बायकार्बोनेट्सनी युक्त पाण्यामुळे रक्ताभिसरण सुलभ होते आणि त्यामुळे रक्तदाबासारख्या विकारापासून मुक्तता मिळते, स्नायू शिथील होतात, सांधेदुखीसारख्या शारीरिक वेदना कमी होण्यास मदत होते. मज्जासंस्थांच्या विकारांपासून आराम मिळतो असे काही सांगतात. सल्फर आणि सल्फेटचे अधिक्य असलेले उष्ण पाण्याचे झरे त्वचाविकारावर, श्वसन विकारावर उपयोगी असल्याचा अनुभव काही जण सांगतात. एका अभ्यासानुसार पर्शियातील उष्ण झर्‍याच्या पाण्यामुळे सोरायसिसची लक्षणे कमी होत असल्याचे आढळले आहे. पुरळ वगैरेसारख्या त्वचाविकारांपासूनही आराम मिळतो,  यकृतरोग आणि पोटाच्या विकारावरही याचा गुण येतो असे म्हटले जाते. जवळ जवळ सगळ्याच उष्ण पाण्याच्या झर्‍यांत सोडियम/कॅल्शियम क्लोराईड असतेच. याचा उपयोग संधीवात, मज्जासंस्थांच्या विकारावर, अस्थिव्यंगोपचारादरम्यान आणि स्त्रीरोगविषयक आजारांवरही होतो असे म्हटले जाते. 

उष्ण पाण्याच्या झर्‍यात केलेले स्नान काहीवेळा अपायकारकही ठरु शकते. पाण्याचे तापमान सहन करता येण्यापलिकडे असेल तर अशा पाण्यात न उतरलेलेच बरे! एकट्याने पाण्यात उतरणे, डोके पाण्यात बुडवणे, पाणी गिळणे, खूप वेळ पाण्यात बसणे, वगैरे अवश्य टाळावे. ज्यांना हृदयरोगाची लक्षणं आहेत, गरोदर माता, शरीरावर फोड आले किंवा कापलेले असेल, घसरुन पडण्याची आणि चक्कर येण्याची भावना होत असेल त्यांनी अशा पाण्यात न उतरणेच श्रेयस्कर.

- संदर्भ : 

१. Chandrasekhar, T. et al. Understanding the evolution of thermal fluids along the western continental margin of India using geochemical and boron isotope signatures. Geothermics. 74; 2018; 197-209. https://doi.org/10.1016/j.geothermics.2018.03.007. 

२. Hot springs therapy: Mineral content. https://www.blueriverresort.com/hot-springs/mineral-content/

३. What is hot potting, and is it safe? https://www.healthline.com/health/hot-potting#safety-tips

- आकृती सौजन्यः Geothermics. 74; 2018; 197-209. https://doi.org/10.1016/j.geothermics.2018.03.007.
- या लेखाचा विषय समजावून घ्यायला माझे मित्र भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. अनिल वळसंगकर यांची मदत झाली. त्यांचे आभार.  

***