रविवार, २ ऑगस्ट, २०१५

पेक्टिनः आंब्याशी निगडीत उद्योगांना हा जोड व्यवसाय आता व्यवहार्य? / Pectin from waste mango peels

भारतीय संस्कृतीत आंब्याचं महत्व फार मोठं. याची पानं, मोहोर व फळं धार्मिक कार्यात पवित्र आणि आवश्यक समजली जातात. त्याच्या फळांचा गर अतिशय मधुर असतो. भारत आंब्याचं सर्वाधिक उत्पादन करणारा देश आणि त्यातही महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. भारतातल्या आंब्याच्या एकूण २३ लाख हेक्टर लागवडीपैकी सुमारे ५ लाख हेक्टर लागवड महाराष्ट्रात होते. आंब्याच्या फळातला गर काढून त्याची निर्यात केली जाते. २०१३-१४ सालीं सुमारे १.७५ लाख मेट्रिक टन गराची निर्यात भारतानं केली आणि ७७३ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं यावरुन हा किती मोठा उद्योग आहे हे लक्षात येईल. आंब्याच्या जातीनुसार त्याच्या वजनाच्या सुमारे ४५ ते ६५% गर मिळतो. त्यानंतर १५-२०% भाग सालींचा आणि १०-२०% कोयींचा (बाठीचा) भाग टाकाऊ समजला जातो. त्यातून इतर उत्पादनं मिळवणं तसं व्यवहार्य समजलं जात नाही. बऱ्याच ठिकाणी हा टाकाऊ भाग जमिनीत भरावासाठी वापरला जातो पण मग तो तेथील जमिनीचा कस घालवतो, आसपासचा प्रदेश प्रदूषित करतो. अर्थात काही ठिकाणी त्यातून गांडूळखत निर्मितीही आजकाल केली जाते. पण त्या टाकाऊ पदार्थातून जोड-उत्पादनंही घेतली तर त्यातून या उद्योगात रोजगार निर्मिती होऊ शकतेच शिवाय प्रदूषणापासून मुक्ती. उदाहरणार्थ, कोयींची पावडर बनवून ती गुरान्नात, स्टार्च बनवण्यासाठी आणि त्यापासून तेलं काढून साबण वगैरे उद्योगातही त्याचा वापर करता येणं शक्य आहे तर सालींतून इथेनॉल, विकर (एंझाइम्स), वगैरेही मिळवता येतात. आजकाल सालींवर संस्कार करुन पेक्टिन काढता येणं कितपत व्यवहार्य आहे त्यावर संशोधन होत आहे आणि त्या संशोधनाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.

पेक्टिन हा एक बहुशर्करा असलेला पदार्थ. त्याची ३० हजार टन इतकी बाजारपेठ उपलब्ध आहे आणि त्यात दरसाल ४-५% वाढ होत आहे.  मुख्यत्वेकरुन व्यापारीतत्वावर हा पदार्थ लिंबूवर्गीय फळांच्या सालींमधून, सूर्यफुलाच्या बिया तेलासाठी काढल्यानंतर त्याच्या गाभ्यामधून आणि सफरचंदाचा रस काढल्यावर उरलेल्या चोथ्यामधून मिळवला जातो. याव्यतिरिक्त इतरही वनस्पतींमध्ये ते असतंच. आलुबुखार, द्राक्षवर्गीय फळांमध्येही ते कमी-अधिक प्रमाणात असतं. फळ कच्चं असतं तेव्हा पेशींना घट्ट बांधून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. फळ परिपक्व होतं तसं त्याचं (पेक्टिनचं) विकरांमुळं रुपांतर होतं आणि ते फळ मग मृदु व्हायला लागतं. पेक्टिन वेगळं करण्याच्या मुख्यत्वेकरुन दोन पध्दती आहेत. आम्लाचं आधिक्य असलेल्या पाण्यामध्ये सालींना उकळवून ते वेगळं करता येतं तर दुसऱ्या पध्दतीत ते मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये प्रक्रिया करुन. पहिल्या पध्दतीला सुमारे दोन तास लागतात तर दुसऱ्या पध्दतीत तेच काम १५ मिनिटांत होऊ शकतं. पण म्हणून सगळ्याच उद्योगात मायक्रोवेव्ह प्रक्रिया वापरली जात नाही. काही फळांसाठी पाण्यात उकळण्याची पध्दतच जास्त उत्पादन देते तर काहींसाठी दुसरी पध्दत योग्य.

पेक्टिनचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात होत आहे. मुख्यत्वेकरुन जेलीकरणासाठी त्याचा वापर होत असला तरी ते पदार्थाला दाटपणा आणण्यासाठी, एखाद्या पदार्थातलं पाणी आटवण्यासाठी आणि एखाद्या पदार्थातल्या रासायनिक क्रियांना विराम देण्यासाठीही (stabilizer) केला जातो. जॅम आणि मुरंब्याला जेलीसारखा घट्टपणा पेक्टिनमुळे आणला जातो. त्याच्या वापराविना त्याची केवळ काकवीच होऊन बसेल. त्याच्या या गुणधर्मांमुळे गोड दही (योगर्ट्) बनवण्यासाठी किंवा बेकरी उद्योगात स्निग्ध पदार्थाला पर्याय म्हणूनही ते वापरतात.

वैद्यकात ते चिकटपणा वाढवत असण्याच्या गुणधर्मामुळे बध्दकोष्ठता आणि अतिसार अशा परस्पर विरुध्द रोगांना आळा घालण्यासाठी वापरतात. घसा खवखवत असेल तर त्यात स्निग्धता येण्याकरताही याचा वापर होतो. माणसाच्या मोठ्या आतड्यात पोहोचल्यानंतर ते आतड्याला आतल्या बाजूनी घट्ट चिकटून राहातं आणि त्यामुळं अन्न पुढे सरकायला अटकाव होतो परिणामी अन्नशोषण क्रिया मंदावते. तसंच पाणी आटवण्याच्या गुणधर्मामुळे पोट भरल्याची जाणीव होत राहते आणि त्यामुळे खादाडांच्या भुकेवर उत्तम 'औषध' म्हणूनही ते वापरतात. मोठ्या आतड्यातल्या त्याच्या अशा उपस्थितीमुळे कोलेस्टेरॉलची पातळीही मर्यादेत ठेवली जात असल्याचं आढळून आलं आहे. पेक्टिनचा उपयोग आता औषधाच्या गोळ्या बनवण्यातही केला जातोय. त्याच्या बांधून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे गोळी पोटात गेल्यावर गोळीतील औषधी तत्व विशिष्ट मात्रेत मोकळं करायला याचा उपयोग होतोय. सौंदर्यप्रसाधनं, जखमा बऱ्या करणारी मलमं बनवण्यासाठीही ते वापरलं जातं. गुरान्नात ते मिसळलं तर ते गुरांची पचनक्षमता वाढवण्याच्या कामीही येत असल्याचं आढळून आलेलं आहे. ते पावडरच्या रूपातही मिळतं. तसंच प्रत्येक फळातल्या पेक्टिनचे गुणधर्म थोडे-थोडे वेगळे असतात त्यामुळे त्यांचे आणखीही उपयोग शोधून काढायला वाव आहे. 

तर हे असं पेक्टिन आता आंब्याच्या सालींपासून मोठ्या प्रमाणात मिळवता येणं शक्य आहे असं तामीळनाडूच्या कोन्गु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संशोधकांनी सिध्द करुन दाखवलंय. त्यांनी मायक्रोवेव्ह मध्ये आंब्याच्या सालींना भाजून पेक्टिन मिळवण्याची साधी आणि सोपी पध्दत शोधून काढली आहे. त्यांनी प्रथम सालींचे बारीक तुकडे करुन ते सेंद्रिय द्रावणात विरघळवले आणि नंतर तो अर्क मायक्रोवेव्ह मधे भाजून पावडरच्या रूपात पेक्टिन मिळवण्याची क्रिया सिध्द केली आहे. प्रयोगादरम्यान त्यांच्या असं लक्षात आलं की पेक्टिनच्या उत्पादनात मायक्रोवेव्हची विद्युतशक्ती, द्रावणाचा पीएच, पेक्टिन मिळवण्यासाठी लागणारा वेळ, द्रावण करताना सालींचं प्रमाण आणि द्रावण यांचं गुणोत्तर या बाबी महत्वाच्या आहेत.

वरील बाबींची वेगवेगळी समीकरणं वापरुन त्यांनी प्रयोग केले. विद्युतशक्ती १६० वॅट्स पासून ४२० वॅट्स पर्यंत वाढवत नेली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की पेक्टिनचं उत्पादन जस-जसं या दरम्यान विद्युतशक्ती वाढवावी तस-तसं ते वाढत जातं आणि नंतर मात्र ते घटतं. १ ते ४.५ च्या दरम्यान द्रावणाचा पीएच ठेऊन त्यांनी प्रयोग केले. पेक्टिनचं उत्पादन पीएच ३ पर्यंत वाढत गेलं पण त्यावर मात्र त्यात घट आल्याचं अनुभवलं. त्यांनी उत्सर्जन बिंदू (emission time) ठरवण्यासाठीही ३० ते २१० सेकंदांच्या दरम्यान प्रयोग केले. त्यातून असं दिसून आलं की १२० सेकंदांपर्यंत पेक्टिनच्या उत्पादनात वाढ होते मग मात्र त्याच्या दर्जात घसरण होते. द्रावण करताना सालीचं आणि द्रावणाच्या प्रमाणाचं गुणोत्तर किती असावं याबद्दलही ते वेगवेगळ्या प्रयोगांती निष्कर्षापर्यंत पोहोचले. १:५ ते १:३० ग्रॅम/मिलि लिटर या दरम्यान हे प्रयोग केले आणि १:२० ग्रॅम/मिलि लिटर हे आदर्श द्रावण असल्याचं त्यांच्या प्रयोगात दिसून आलं. यानंतर काही सांख्यिकी गणितं वापरुन सगळ्या बाबींचा एकत्र आढावा घेतला आणि ते खालील आदर्श अशा परिस्थितीत जास्तीत जास्त पेक्टिन मिळवता येईल या निष्कर्षाप्रत आले आहेत. मायक्रोवेव्हची विद्युतशक्ती ४१३ वॅट्स, २.७ पीएच, १३४ सेकंदांचा वेळ आणि घन-द्रावाचं प्रमाण १:१८ ग्रॅम/मिलि लिटर ठेवलं गेलं तर २८.८६% पेक्टिन मिळायला हवं असा निष्कर्ष त्यांनी काढला. या सांख्यिकी आधारावर त्यांनी हे प्रमाण वापरुन पुन्हा प्रयोग केले आणि त्यांना २८.६७% च्या आसपास पेक्टिनचं उत्पादन मिळवता आलं.

आतापावेतो आमरस उद्योगात या सालींचा वापर पेक्टिनसाठी केला जात नाही कारण ते व्यवहार्य समजलं जात नाही. लिंबूवर्गीय फळांच्या सालींमधून २० ते ३०% पेक्टिन मिळवणं जर व्यवहार्य असेल आणि सफरचंदाच्या चोथ्यातून १० ते १५% पेक्टिन मिळवण्याचे उद्योगही टिकून रहात असतील तर सुमारे २९% पेक्टिन मिळवून देणारी ही पध्दत नक्कीच व्यवहार्य ठरते की काय हे तपासून पहायला हवं. शिवाय, महाराष्ट्रात आंबा उत्पादन आणि त्यावर आधारित त्याचा रस काढण्याचा उद्योग मोठा असल्यानं महाराष्ट्रात कच्च्या मालाला तोटा नसावा. किमान प्रदूषण टाळण्यासाठी म्हणून याचा अवश्य वापर व्हावा.
-------------------------------------------
हा लेख 'गोवन वार्ता' च्या १३ जुलै २०१५ च्या अंकात प्रसिद्ध झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा