शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

कच्छच्या रणात नौकानयन / Navigation in the Rann of Kachchh

कच्छ हा गुजरातमधील भारताच्या पश्चिम टोकाला असलेला एक जिल्हा. भारतातील जिल्ह्यांमध्ये आकाराने सर्वात मोठा - ४६ हजार चौरस कि.मी. व्यापणारा पण सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक. भारताची पूर्वोत्तर राज्ये, जम्मू-काश्मीर आणि जैसलमेरनंतर कमी लोकसंख्येची घनता असलेल्या प्रदेशांमध्ये याचाच क्रमांक लागतो - दर चौ.कि.मी. मागे केवळ ४६ लोकसंख्या असलेला. गुजरातेतील सुरतमध्ये ही लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. मागे १४४० तर मुंबईत ४८ हजार आहे यावरुन कच्छमध्ये किती किरकोळ आहे याची कल्पना यावी. 'कच्छचं रण' या नावानं ओळखल्या जाणार्‍या या जिल्ह्यातला भाग म्हणजे एक मोठं कोडंच आहे म्हणाना!  'कच्छ' ह्या शब्दाचा अर्थ आलटून-पालटून दलदलीचा आणि कोरडा होणारा भूभाग असं विकिपिडीयात म्हणलंय (http://en.wikipedia.org/wiki/Kutch_District). तर 'रण' या शब्दाचा उगम संस्कृत शब्द 'ईरिण' यातून झाला असावा ज्याचा अर्थ ओसाड प्रदेश, नापीक जमीन असा होतो. ३०० कि.मी. पूर्व-पश्चिम आणि काही ठिकाणी १५० कि.मी. दक्षिणोत्तर पसरलेला हा भूभाग समुद्रसपाटीपासून म्हणण्यापुरत्याच उंचीवर आहे. यातल्या मधल्या उंच भूभागामुळे याचे दोन भाग झाले आहेतः उत्तरेचं 'थोरलं रण' (Great Rann) - सुमारे १८००० चौ.कि.मी. आणि आग्नेय (दपू) दिशेला 'धाकटं रण' (Little Rann) - सुमारे ५००० चौ.कि.मी.  कच्छ जिल्ह्याचा बराचसा भाग हे रण व्यापतात. थोरलं रण अरबी समुद्राला कोरी खाडीनं जोडलं आहे तर धाकटं रण कच्छच्या आखाताला. पावसाळ्यात रणाचा बराचसा भाग पाण्याखाली रहातो तर इतर ऋतुत (नोव्हेंबर ते मे) मात्र ते बहुधा कोरडेच असते.


पर्यटनानिमित्त या प्रदेशाला भेट देणारे बरेच असले तरी तेथे मुक्काम ठोकून रोजीरोटीची सोय करण्यासारखे या भागात विशेष काही नाहीये असं तेथील लोकसंख्येवरून वाटावं. तरी, २०११ च्या जनगणनेत या भागाची लोकसंख्या २० लाखांवर पोहोचली आहे. सोयी होत आहेत, मीठाची निर्मिती, रासायनिक उद्योग, सिमेंट, जहाज बांधणी, विद्युत निर्मिती, कांडला आणि मुंद्र्यासारखी दोन मोठी बंदरं असे उद्योग वाढताहेत तशी लोकसंख्येत भर पडतेय. पण सिंधू संस्कृतीच्या वेळी इथं काय असावं? हडप्पन वसाहत येथे बहरली होती असं त्या भागात झालेल्या उत्खननावरून समजतं. त्यावेळच्या एकूण ६१ वसाहतींचा शोध या भागात लागला आहे. यातील बर्‍याच वसाहती सुरुवातीच्या काळातल्या तर काही नंतरच्या काळातल्या आहेत. हडप्पन लोक प्रथम पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतात वसले. नंतर ते कच्छ आणि सौराष्ट्रात पसरले. त्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय समजला जात असे. सिंध प्रांतातले हडप्पन लोकही शेतीच करून उदरनिर्वाह करीत असे दृष्टोत्पत्तीस आलं आहे. पण मग त्यांना इथे दलदलीच्या, नापीक जमिनीवर वस्ती का कराविशी वाटली? इथे त्यांचा उदरनिर्वाह कसा होत होता? नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखात (करंट सायन्स, खंड १०५(११); २०१३; १४८५) यावर बर्‍याच वर्षांपासून वेगवेगळी मतं-मतांतरं नोंदली जात असल्याचं नमूद केलं आहे. हे लोक समुद्र मार्गे सौराष्ट्रातून इथं येऊन पोहोचले तर काहींच्या मते ते खुष्कीच्या मार्गानेच (म्हणजे जमिनीवरून) इथं आले अशा नोंदी असल्याचं दिसतं. अर्थात खुष्कीच्या मार्गाने ते इथं पोहोचल्याचं सांगणार्‍यात तेथील परिसर त्यावेळी आजच्या सारखाच होता अशा अनुमानावर असावा. परंतु यानंतर इथल्या पुराणकाळातल्या पराग कणांवरच्या संशोधनाच्या आधारानं या ठिकाणी त्यावेळी आतापेक्षा वेगळंच म्हणजे खार्‍या पाण्याचं पर्यावरण अस्तित्वात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सिंधू खोर्‍यातले लोक कच्छ येथे जलमार्गानेच येऊन पोहोचले असण्याची शक्यता असल्याचं मत पुढे रुजलं. कच्छमध्ये त्या काळी अतिशय पुढारलेली संस्कृती बहरली होती असं पुरातत्वशास्त्रीय संशोधन नमूद करतं. जरी हडप्पा येथील संस्कृती शेती उद्योगावर अवलंबून होती असं दिसत असलं तरी कच्छमधील हडप्पन मात्र उत्तम शेत जमिनी अभावी शेतीवर अवलंबून नसणार. एका दस्तऐवजानुसार यांना हुल्लर येथून, गुजरातच्या इतर भागातून, मलबार आणि सिंधमधूनही धान्यपुरवठा होत होता. या आधारानुसार हे लोक मग इथं शेती करण्यासाठी येऊन वसले नसून नौकानयनात प्राविण्य मिळवलेले आणि व्यापारी वृत्तीचे असावेत असं अनुमान काढलं गेलं. व्यापारउदीम हाच त्यांचा व्यवसाय असावा असा अंदाज बांधला गेला. गुजरात आणि विशेषतः कच्छ हा भाग चुनखडी, अगेट, शिसं या दगड आणि धातूंच्या खाणींसाठी तेव्हापासूनच प्रसिध्द होता. सिंधमधील हडप्पाच्या वसाहतींमधल्या आणि इतरत्र सापडलेल्या चुनखडीच्या कमानी येथूनच पाठवल्या गेल्या असाव्यात असा निष्कर्ष निघतो. या कमानीचं वजन प्रत्येकी शंभर किलोच्या आसपास भरतं. अशा वजनदार वस्तू इथून जलमार्गेच वाहून नेणं त्यांना सोयीचं होत असणार असा निष्कर्ष निघतो आणि त्यांचा उदरनिर्वाह असल्या व्यापारावर होत असणार असं अनुमान काढता येतं.

आकृती १: (a) कच्छच्या रणाची सद्यस्थिती
(b) ५००० वर्षांपूर्वीच्या स्थितीची स्थलाकृती
धाकट्या रणातल्या एका अभ्यासानुसार असं लक्षात आलं आहे की सुमारे १३ हजार वर्षांपूर्वी तेथील मातीचं अवसादन (sedimentation) होत होतं. त्याचं प्रमाण दर वर्षाला वेगवेगळ्या ठिकाणी १.५ ते ३ मिलीमीटर असे. तसंच या भागात, या दरम्यान कसलीही भूविवर्तनी क्रिया (tectonic activity) झालेली नाही. हे गृहीत धरलं तर असं लक्षात येतं की अगदी २००० वर्षांपूर्वीही या धाकट्या रणाची खोली समुद्रसपाटीपासून ४ मीटर तरी असायला हवी आणि हे समुद्राला जोडलं गेलेलं असल्यामुळे हा भाग वर्षभर पाण्याखाली असायला हवा. असाच अभ्यास थोरल्या रणात खदिर बेटाजवळ केला गेला आणि तेथील वार्षिक अवसादनाचं प्रमाण २५०० वर्षापूर्वीपर्यंत १.२२ मिलिमिटर असल्याचं आढळलं. याचाच अर्थ इथेही हा भाग समुद्रसपाटीपेक्षा खोलच होता आणि साहजिकच त्यातही समुद्राचं पाणी असणार असाच निघतो. कच्छचं रण त्यावेळी नौकानयनास योग्य असा भाग होता या तर्कशुध्द विचाराला पुष्टी देणार्‍या साधनाच्या शोधात वैज्ञानिक होते. त्यांनी मग याकरता संगणकावर कच्छच्या भागाची आज अस्तित्वात असलेल्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीनुसार एक स्थलाकृती (digital elevation model) तयार केली आणि आज्ञावली वापरुन जर हा भाग ५ मीटर कमी उंचीचा असेल तर तेथील नकाशा कसा दिसेल याची प्रतिकृती तयार केली. या स्थलाकृतींनुसार (आकृती १ (अ) आणि (ब)) असं लक्षात येतं की कच्छच्या रणात ५००० वर्षाँपूर्वी, हडप्पन वसाहत होती तेव्हा, तो अरबी समुद्राचाच एक भाग होता आणि त्यात बारमाही पाणी होतं. तसंच ऐतिहासिक तथ्य विचारात घेतलं तर असंही म्हणता येईल की हे कच्छचं रण अगदी इसवी सनाच्या सुरुवातीलाही (सुमारे २००० वर्षांपूर्वीही) समुद्राला जोडलेला पाण्याचा उथळ भाग होता आणि अगदी मध्ययुगातही (१९व्या शतकापर्यंत) त्यात बारमाही पाणी असायचं.

आकृती २: कच्छच्या किनार्‍यावरील हडप्पन वसाहतीं
कच्छ रणाच्या आसपास केलेल्या उत्खननातल्या हडप्पन वसाहती या रणाच्या भागात पूर्वी पाणी असताना त्याच्या दोन्ही किनार्‍यांवर असल्याचं आढळतं (आकृती २). पूर्वीच्या एका अभ्यासानुसार कच्छचं रण खंबाटाच्या आखाताला धाकट्या रणाच्या बाजूनी जोडलं गेलं होतं आणि त्यामुळे कच्छचं आखात, दोन्ही रणं आणि खंबाटाचं आखात यातून सोयीच्या बाजूने हडप्पन जलवाहतूक करायचे. काळाच्या ओघात तळातल्या सिंध मध्ये बरेच प्राकृतीक बदल घडत गेले. सिंधू नदीचं पात्र अनेक किलो मीटर पश्चिमेकडे सरकत गेलं आणि कालांतरानं कच्छच्या रणावर त्याचा परिणाम दिसून यायला लागला. सौराष्ट्राच्या किनार्‍यावर वसलेल्या हडप्पन वसाहतींचा पुरातत्व अभ्यास खंबाटाच्या आखाताच्या किनार्‍यावरील बदलांची नोंद करतो. या बदलांची दोन कारणं आहेतः तेथे होत असलेली भूविवर्तनी क्रिया आणि समुद्र-पातळीत होणारे बदल.

कच्छचा भूभाग भूकंपांसाठी प्रसिध्द आहे. मोठे प्राकृतीक बदल इथं घडवून आणणार्‍या अशा कित्येक भूकंपांची नोंद झालेली आहे. पुरातत्वशास्त्रानुसार हडप्पन काळात किमान तीन मोठे प्रलयकारी भूकंप तरी इथं झाले आहेत. इ.स.पू. २१०० वर्षांपूर्वी झालेला शेवटचा भूकंप पूर्वीच्या हडप्पन वसाहतींच्या विनाशास कारणीभूत ठरला. त्यानंतर काही दशकांनंतर हडप्पनांनी इथं पुन्हा नव्यानं वसाहती केल्या. पण या पूर्वीच्या वसाहतींच्या तुलनेत मोजक्याच होत्या आणि त्यातल्या काहीच जुन्या वसाहतींच्या जागी होत्या असं दिसतं. कारण त्यांच्यातील बर्‍याच जणांनी सौराष्ट्रात - त्यातल्या त्यात भूकंपांपासून कमी नुकसान करणारी जवळची जागा म्हणून - स्थलांतर केलं असावं असं तिथल्या नव्या वसाहतींवरुन अनुमान काढता येतं.

समुद्र पातळीत होणारे बदल हे दुसरे कारण. १३००० वर्षांपूर्वी जगभर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत होती आणि ही वाढ इ.स.पू. ६००० वर्षांपूर्वी स्थिरावल्याचं दिसतं. कच्छच्या रणातले पुरातत्वशास्त्रीय अभ्यास इथे बंदरांचं अस्तित्व असल्याचं सिध्द करतात. आता त्याठिकाणी केवळ ओसाड जमीन उरली आहे. त्यावेळच्या रणाच्या मध्यभागी असलेल्या बेटांच्या उत्तरेकडच्या किनार्‍यांची धूप झाल्याचे पुरावे आजही मिरवत आहेत. यानंतर मात्र येथील जमिनीची उंची वाढत जाऊन या भागातलं पाणी मागे हटलं.

बदल ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ती सतत घडत असते. काळाच्या उदरात यामुळे अनेक संस्कृती लयाला गेल्या, वसाहती नष्ट झाल्या तसंच निसर्ग नव्या रुपात नवचैतन्य घेऊन आला. कच्छचे रण याचं एक उत्तम, बोलकं उदाहरण ठरतं. बदलाचे स्वागत करण्यापलिकडे आपल्या हातात असतं तरी काय?

हा लेख 'शैक्षणिक संदर्भ' या नियतकालिकात अंक ८७; पृष्ठ १३-१८ प्रकाशित झाला.
आभारः लेखातील आकृत्या करंट सायन्स च्या मूळ लेखातून घेतलेल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा