शनिवार, ९ जानेवारी, २०१६

क्रौर्य: लाजिरवाणा वारसा/ Massacres: Shameful inheritance

प्रागैतिहासिक (pre-historic) काळ हा कपिचा मनुष्य होण्यापूर्वीचा काळ. या दरम्यान पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या काळी उत्क्रांती होत गेली आणि म्हणून प्रागैतिहासिक काळाचे संदर्भ देशपरत्वे बदलतात. पाषाणयुग (Neolithic age) हा प्रागैतिहासिक काळातला महत्वाचा टप्पा. या युगात मानवानं दगडापासून प्रथमच आयुधांची आणि अवजारांची निर्मिती केली म्हणून त्याला पाषाणयुग असं म्हटलं जातं. या दरम्यान कपिकुळातल्या प्राण्यांमधली फक्त एकच प्रजाति प्रगत होत गेली ती म्हणजे होमो सेपियन्सची (homo sepiens). अन्नाच्या शोधार्थ होणारी वणवण संपून एका जागी स्थिर होऊन शेती आणि पशुपालनाला सुरुवात करण्याचा मानवाच्या उत्क्रांतीतला हाच तो टप्पा. या स्थिरतेमुळे त्याच्या वागण्यात मोठ्या प्रमाणात बदल होत गेले असं मानलं जातं आणि हा त्याच्या सांस्कृतिक संक्रमणाचा काळ म्हणूनही ओळखला जातो. स्थिरतेमुळे त्याला स्वास्थ्य आलं आणि तो शांतपणे जगायला लागला, इतरांना जगू द्यायला लागला असं अनुमान त्याकाळच्या त्याच्या वसतीस्थानाभोवती नसलेल्या तटबंदीवरुन काढलं जातं (https://personal.sron.nl/~jheise/akkadian/prehistory.html). याचा अर्थ त्या काळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली नसेलच असं नाही तर हाती आलेल्या नव्या आयुधांमुळे युध्दतंत्रात बदल होत गेला आणि त्यामुळे समूहांमध्ये होणाऱ्या चकमकींच्या परिणामांचा विचार करुन प्रथमच शांततेचे सजगपणे प्रयत्न केले गेले आणि प्रत्येक प्रश्नावर संघर्षाऐवजी इतर मार्ग अवलंबण्यात काही समूहांना यश येत गेलं. मानववंशशास्त्राचे अभ्यासक किथ ऑट्टर्बेन यांच्या मते शेती करुन अन्न मिळवणं हे शिकार करुन अन्न मिळवण्यापेक्षा सोपं आहे असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यावेळच्या समूहांनी शेतीवर भर दिला. शांततेमुळं त्यांच्या कल्पकतेलाही बहर आला आणि अधिक समृध्दपणे जगण्याची त्यांची आस वाढली, त्यांच्यात असलेल्या झगडण्याच्या सवयीला आळा बसला. म्हणून शेती आणि शांतता यात परस्पर संबंध असल्याचं अनुमान काढलं जातं (Peace in World History By Peter N. Stearns. Routledge. 2014; pg 17).

युरोपात 'लिनिअरबँडसिरॅमिक संस्कृती' (Linearbandkeramik किंवा संक्षिप्त रुपात LBK Culture) नामक समूह पहिला पाषाणयुगकालीन मानवसमूह म्हणून ओळखला जातो. या समूहाच्या मातीच्या भांड्यांवर एकमिती पध्दतीने रेषा आखून त्यांना सजवलं गेल्याचं पाहून त्या समूहाला हे नांव दिलं गेलं आहे. या समूहाची आणखी काही ठळक वैशिष्ट्ये म्हणजे - निवार्‍यासाठी घराची निर्मिती, नवरा-बायकोनी एकत्र रहाण्यास सुरुवात, मृत्युनंतर देहाचं विशिष्ट पध्दतीनं - सन्मानानं दफन, पुरुषाच्या मृत्युनंतर त्याच्या देहाबरोबर त्याची आयुधं पुरण्याची पध्दत, वगैरे. हा एलबीके समूह पूर्वेकडून आणि मध्य आशियातून पाळीव प्राणी, शेतीसाठी लागणारी रोपं आणि शेतीच्या पद्धती घेऊन युरोपात आला आणि वसती करुन गुण्यागोविंदानं राहिला असं समजलं जातं. परंतु १९८० च्या दशकात जर्मनीत टल्हाईम इथं आणि त्याच्याजवळच अस्पार्न/श्लेट्झ इथं ऑस्ट्रियात झालेल्या उत्खननात एकाच खड्ड्यात अनेक मृतदेहांचे सांगाडे आढळून आले आणि या अनुमानाला प्रथमच तडा गेला. ते सांगाडे एलबीके संस्कृतीतल्या मानवांचे असल्याचं आणि त्यांची हत्या करुन ते एकत्र पुरल्याचं संशोधनाअंती लक्षात आलं. याला पुष्टी देणारं उत्खनन जर्मनीत आणखी एका ठिकाणी नुकतंच झालं. एखादी बाब एकदा आढळून आली तर तो अपवाद समजला जातो, दुसर्‍यांदा आढळली तर तो योगायोग म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं पण तिसर्‍यांदा तसंच नजरेस येतंय म्हणजे आपल्या पूर्वसमजांना आता पुन्हा नव्या संशोधनावर तपासून ते बदलण्याची गरज निर्माण होते. पाषाणयुगातले आपले पूर्वज खरोखरंच गुण्यागोविंदानं राहात होते या अनुमानाला आता नव्या दृष्टिकोनातून तपासलं गेलं आहे.


युरोपचा ढोबळ नकाशा. शोनेक-किलियनस्टेटेन(A), टल्हाईम(B) आणि अस्पार्न/श्लेट्झ(C)
त्याचं असं झालं. जर्मनीत शोनेक-किलियनस्टेटेन (Schöneck-Kilianstädten) इथं एकाच मोठ्या खड्ड्यात २६ जणांचे सांगाडे सापडले*. त्यातील १३ प्रौढ पुरुषांचे, एक किशोरवयीन तर १२ अल्पवयीन मुलांचे होते. अल्पवयीनांच्या सांगाड्यात दहा सांगाडे सहा वर्षाखालील देहांचे, तर एक केवळ सहा महिन्याच्या अर्भकाचा होता. त्या देहांच्या डोक्यावर जड वस्तूचा आघात करुन त्यांची हत्या केल्याचं अनुमान सगळ्या सांगाड्यांच्या फुटक्या कवट्या पाहून केलं गेलं आहे. तसंच अर्ध्यापेक्षा अधिक सांगाड्यांच्या नडगीच्या हाडांचे तुकडेही झालेले आढळले आहेत. याशिवाय हे सगळे देह असंस्कृत पध्दतीनं आणि एकत्रितरित्या पुरले गेले होते. अशी पध्दत या संस्कृतीत नव्हती. या दफनाचा त्यांच्या पारंपरिक पध्दतीशी कसलाच ताळमेळ दिसून आला नाही. या आणि या पूर्वीच्या १९८० च्या दशकात झालेल्या दोन उत्खनात सापडलेल्या सांगाड्यांमध्ये आणि दफनात साम्य आढळतं: त्या सगळ्याच देहांच्या पायाची हाडे तुटलेली असणं, एकत्र, कुठलीही विशिष्ट पध्दत न वापरता ते देह पुरणं आणि महत्वाचं म्हणजे एखाद्या पाड्यावरील सगळ्यांचीच - एका पाड्यावर साधारणपणे ३० ते ४० जणांचा गट राहात असे या हिशोबानं - हत्या करणं. आणखी एक नजरेस आलेली बाब म्हणजे या सांगाड्यांत कुठेही स्त्रियांचे सांगाडे नजरेस न येणं.

याचा अर्थ वैज्ञानिक असा काढतात की हे पुरावे दोन गटातल्या संघर्षाचे आहेत. एका गटाने दुसर्‍या गटावर हेतूपूर्वक आणि पध्दतशीरपणे केलेला हा हल्ला असणार आहे, त्यांच्या सगळ्यांच्याच पायाची हाडं तुटलेली आहेत म्हणजे प्रथम त्यांचा छळ केला गेला असावा आणि नंतर त्यांच्या डोक्यावर हत्यारांनी घाव घालून हत्या करुन बेपर्वाईनं सगळ्यांनाच एका खड्ड्यात सामूहिकरित्या पुरलेलं असावं आणि तसंच यात कुठेही स्त्रियांचे सांगाडे दिसत नाहीत म्हणजे त्यांचं अपहरण केलं गेलं असावं या निष्कर्षाप्रत वैज्ञानिक आले आहेत. या गटांमध्ये त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या चतु:सीमा असाव्यात आणि त्यांच्यात कुठलेही सामाजिक संबंध अथवा नातेसंबंध निर्माण झालेले नसावेत. दोन गटांमधील उद्रेकाची कारणं प्रत्येक वेळी वेगवेगळी असू शकतात. वैज्ञानिक या उद्रेकाची कारणमीमांसा करताना एखाद्या गटात  झालेली लोकसंख्येतली वृध्दी, दुष्काळी परिस्थिती, एखाद्या गटाची समृध्दता दुसर्‍याला न पाहवणं, त्या गटाकडे असलेल्या जमिनीतील मातीचा कस संघर्ष करु इच्छिणार्‍या गटाच्या जमिनीपेक्षा चांगला असणं ही कारणं असू शकतात. एक वेगळा विचारही पुढे आला आहे; हे उद्रेक दोन शेतकर्‍यांच्या गटात नसून कदाचित ते प्रगत अशा पाषाणयुगकालीन मानवाच्या आणि त्याच्या मागच्या पिढीतील अप्रगत अशा जमातीतला संघर्ष असण्याची शक्यताही असू शकते. अनेक वर्षांपासून स्थिर आयुष्य जगणार्‍या शेतकर्‍यांच्या समूहामध्ये, परंपरेनं क्रूरतेने शिकार करणार्‍यांबरोबर दोन हात करुन, स्वतःचा बचाव आणि युध्दखोरांचा पाडाव करण्याची असमर्थता आली असावी असंही अनुमान ते काढतात.

कसंही असो, वंशविच्छेद हा त्या काळच्या डावपेचांचा मुख्य गाभा असावा आणि असे संघर्ष त्याकाळी पुन:पुऩ्हा होत असावेत असंही या तीन उत्खननातून दिसून येतं. वैज्ञानिक प्रगती - अश्मयुगात झालेली शेतीची सुरुवात - ही शांततेला आणि सहिष्णूतेला खतपाणी घालते या समजाला मात्र त्यामुळे मर्यादा आल्या आहेत. अर्वाचीन युगात झालेले वंशविच्छेद हे या पूर्वजांचा पुढच्या पिढ्यांना मिळालेल्या वारसा असावा हेच यातून आपल्याला शिकायला मिळतं. एखाद्या कुळाची, वंशाची, विशिष्ट धार्मिक, सांस्कृतिक अथवा राष्ट्रीय समूहाच्या समूळ उच्चाटनाची अर्वाचीन युगातली उदाहरणं म्हणून आर्मेनियातले १९१५ साली ८ लाख नागरिकांचे मृत्यु, १९३२ ते १९३३ च्या दरम्यान सुमारे २५ ते ७५ लाख युक्रेनच्या नागरिकांची केलेली उपासमार, १९४१ ते १९४५ च्या दरम्यान हिटलरनं सुमारे एक कोटी ज्यूंचा केलेला नरसंहार, १९७१ च्या सुमारास बांगला देशात पाकिस्तानने केलेली ३ ते ३० लाख बंगाल्यांची हत्या आणि २ ते ४ लाख महिलांवर केलेले बलात्कार, १९९४ च्या दरम्यान रवांडात टुटसी जमातीच्या केलेल्या हत्येत ५० लाख ते १ कोटी लोकांचा मृत्यु, १९९५ च्या दरम्यान २५ ते ३० हजार बोस्नियातील नागरिकांचा झालेला संहार याकडे बघता येईल. माणसातील हिंस्त्र वृत्ती काढायला वैज्ञानिक प्रगती तोकडी पडते आणि मग इतर मार्गांचा अवलंब आवश्यक ठरतो. आपण सुसंस्कृत समाजाचे घटक आहोत असं जर वाटत असेल तर आपल्यात आलेला हा क्रौर्याचा वारसा कुठल्याही मार्गानं का होईना पण संपवायलाच हवा.
-------------
*Meyer, C.; Lohr, C.; Gronenborn, D.; Alt, K.W. The massacre mass grave of Schöneck-Kilianstädten reveals new insights into collective violence in Early Neolithic Central Europe. Proceedings of the National Academy of Sciences. 112(36); 2015; 11217–11222.
-------------------------------------------------------------
हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेत जानेवारी २०१६ च्या अंकात प्रसिद्ध झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा