शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

तेल-प्रदूषणावर नियंत्रण / Controlling oil-spills

नव्या पध्दतीनं तेल प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याच्या पायऱ्या. चित्र साभार:‌ मूळ लेख
पावसाळा सुरु झाला की समुद्रकिनाऱ्यावर चालणं अवघड होऊन बसतं. अवघड अशासाठी की किनाराभर तेलगोळे पसरलेले असतात आणि त्यातून वाट काढत चालणं बिकट होतं. त्याकडे दुर्लक्ष केलं तर ते आपल्या पादत्राणांच्या तळाशी चिकटून बसतात. कुठून येतात हे तेलगोळे? अर्थातच समुद्रातून. समुद्रातून तेल वाहून आणणारी जहा़जं त्यांच्या टाक्या रिकाम्या झाल्यावर परतीचा प्रवास करता करता समुद्राच्या पाण्याचे उष्ण फवारे वापरुन जहाजाचे डेक धुण्याचे 'रिकामपणचे उद्योग' करतात. मग ते तेल पाण्यात मिसळतं, पाण्याबरोबर घुसळलं जातं आणि त्याचे तेलगोळे तयार होत समुद्रतळाशी जाऊन बसतात. पावसाळ्यापूर्वी जेव्हा वेगानं वारे वाहायला लागतात, समुद्र खवळतो तेव्हा पाण्याच्या अभिसरणातून ते गोळे पाण्याबाहेर किनाऱ्यावर फेकले जातात. तेलप्रदूषणाविरुध्द (तेलामुळे होणारं पाण्याचं प्रदूषण) कायदे आहेत पण त्याची कडक अंमलबजावणी करायला आपल्याकडे आवश्यक ती साधनसामग्री आणि पुरेसं मनुष्यबळ याची कमतरता हे नेहमीचंच रडगाणं आहे.

तसं पाहिलं तर सगळा हिंद महासागर, विशेषतः अरबी समुद्र कायमच तेलप्रदूषणामुळे ग्रस्त आहे. कारण तेल वाहून नेणारी अजस्त्र जहाजं अरब देशांतून जगभरच्या इतर देशांना तेल पोहोचवण्याकरता इथूनच प्रवास करतात. त्यांच्या इतर जहाजांशी होणाऱ्या टकरांतून ती फुटणं आणि मग नको तितकी तेलगळती ही कायमची डोकेदुखी आहे. २८ जानेवारी २०१७ ला चेन्नैजवळच्या एन्नोर बंदरातला अपघात हे ताजे उदाहरण. बीडब्ल्यू मेपल नांवाच्या ४७३ टनी ब्रिटीश तेलवाहू जहाजाने डॉन कांचीपूरम नांवाच्या भारतीय जहाजाला टक्कर दिल्यानंतर किमान ३० ते ६० टन तेल समुद्रात सांडलं. अपघातांशिवाय समुद्रातल्या तेलविहिरीतून तेल काढताना, जलक्रिडेनिमित्तानं वाढ झालेल्या स्वयंचलित बोटी वगैरे तेलप्रदूषणाची इतरही काही कारणं आहेत.

या प्रदूषणाचा सर्वात मोठा फटका समुद्रपक्ष्यांना बसतो. ते पाण्यावर भक्ष्याच्या शोधात उतरतात तेव्हा त्यांच्या पंखांना हे सांडलेलं तेल चिकटून बसतं. पंख जड होतात आणि त्यांना हवेत भराऱ्या घेणं अशक्य होऊन बसतं. तसेच जलचरांच्या श्वास घेण्याच्या यंत्रणेलाच यामुळे धोका पोहोचतो. सी-ऑटर्सची संपूर्ण त्वचाच श्वसनासाठी वापरली जाते त्यावर तेलाचा थर जमा होतो तर व्हेल माशांची नाकं यामुळे बुजतात. याशिवाय ते जी मासळी खातात तीही प्रदूषित होते  आणि अन्नसाखळीतील सगळ्यांनाच ते सेवन केल्यावर बाधा पोहोचण्याची शक्यता असते. यात समुद्र खाद्यावर जगणारा मानवही आला. समुद्री वनस्पतींवर तेल तवंग चढल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, बंद पडते. एकपेशीय प्राणी, माशांच्या जीवनचक्रातील सुरुवातीच्या अळ्या, शिंपले, तिसरे, शिणाणे (ऑयस्टर्स) वगैरे सगळेच या प्रदूषणामुळे ग्रस्त होतात.

अपघाताने समुद्राच्या पाण्यावर निर्माण झालेल्या तेल तवंगांचं निर्मूलन ही एक मोठीच डोकेदुखी होऊन बसली आहे. सध्या अशा तेल तवंगांचं निर्मूलन प्रथम जिथं ते पसरलं आहे त्या पाण्यावर 'कुंपण' घालून केलं जातं. तेल पाण्यावर तरंगतं. पण लाटांमुळे, अभिसरणामुळे ते इतरत्र पसरण्याची भीतीही मोठ्या प्रमाणात असते. मग पाण्यावर असं तरंगतं कुंपण घालून त्याच्या पसरण्याला प्रथम आळा घातला जातो. त्यानंतर आहे त्या ठिकाणीच ते जाळून नष्ट करता येतं पण त्यातही पर्यावरणाला आणि जलचरांना हानी पोहोचण्याची मोठी शक्यता असते. शिवाय वायू प्रदूषण होतं ते वेगळंच. दुसरा प्रकार म्हणजे रासायनिक क्रियांद्वारा या तेलाचं विघटन करणं. पण मग ते आणखी नव्या प्रश्नांना जन्म देतं. सांडलेल्या तेलावर ते विघटन करणारे जीवाणू सोडायचे हा आणखी एक उत्तम नैसर्गिक पर्याय. पण त्यालाही मर्यादा आहेत. थोड्या प्रमाणात तेल सांडलं असेल तर ते जीवाणू सोडून परिणामकारकपणे नियंत्रित करणे शक्य आहे पण मोठ्या प्रमाणात झालेल्या तेल प्रदूषणाला अशा प्रकारे आळा घालणे अशक्य होऊन बसतं. अन्य साधनसामग्री वापरुन सध्या असं प्रदूषण आटोक्यात आणलं जातं. सांडलेल्या तेलावर कुंपण घातलं की मग वरचा तेल तवंग खेचून घेण्याची यंत्रसामग्री निर्माण केली गेली आहे. सांडलेलं तेल स्पंजासारख्या गुणधर्म असणाऱ्या वस्तू वापरुन त्याद्वारे ते शोषून घेणं हाही आणखी एक पर्याय.

तेल आळवणारा पदार्थ वापरता आला तर? असे पदार्थ अस्तित्वात आहेत. त्यांना जिलेटर्स म्हणतात. ते सांडलेल्या तेलाला बांधून घेतात पण त्यांच्या ठिसूळतेमुळे आणि बुळबुळीतपणामुळे त्यांना हाताळणं अवघड असतं. तिरुअनंतपुरमच्या 'आयसर' संस्थेतल्या वैज्ञानिकांनी या दृष्टिनं विचार करुन जिलेटरच्या दोषांवर पांघरुण घालणारा पर्यावरण स्नेही, कमी खर्चिक आणि कमी घनतेचा, सच्छिद्र असा पदार्थ कोणता याचा शोध घेतला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं (Prathap, A.; Sureshan, K.M. Organogelator – Cellulose Composite for Practical and Eco-friendly Marine Oil Spill Recovery. Angewandte Chemie 56(32); 2017; 9405–9409). याकरता त्यांनी सेल्युलोजचा लगदा जिलेटरबरोबर मिसळून तो गोळ्यांच्या स्वरुपात तयार केला. असा लगदा करायला स्वस्त असा कच्चा माल म्हणून निलगिरी, बाभूळ वगैरेची खोडं वापरता येणं शक्य आहे. भारतात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. लगदा करायची पध्दत कागद तयार करण्याच्या कारखान्यात वापरली जाते तशीच. या झाडांचे तंतू बऱ्यापैकी लांब असतात आणि ते जिलेटरला व्यवस्थित 'बांधायला' उपयोगी असल्याचं दिसून आलं. खरं म्हणजे लगदा स्पंजासारखं काम करत असल्यानं जिलेटरची आवश्यकताच काय असा प्रश्न वैज्ञानिकांच्या मनातही आला. पण फक्त अशा लगद्याचाच वापर केला तर तो जलस्नेही असल्यानं तेलाबरोबर पाणीही (तेलापेक्षा पाणीच जास्त) खेचून घेतो आणि त्याचे गोळे पाण्यात बुडतात असं त्यांना आढळून आलं. तर जिलेटर जलरोधी असल्यानं तो पाणी न शोषता तेलच शोषतो आणि ही जोडगोळी पाण्यावर तरंगते जी सहज गोळा करणं सोपं जातं. लगदा, त्याच्या लांब तंतूंमुळे, शोषून घेतलेल्या तेलाला आपल्यात सामावून तर घेतोच पण गोळ्याचं स्वरुप टिकवून ठेवण्याचं कामही करतो आणि त्यामुळे त्याला पाण्यातून सहज वर काढणं सोपं जातं. एकदा का तेल शोषलेले गोळे पाण्याबाहेर काढले की पाणी पुन्हा शुध्द स्वरुपात आपल्याला मिळू शकतं.

पाण्यावरचा तेल तवंग
पाण्यावरचा तेल तवंग शोषून घेतल्यावर 
या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगात असं दिसून आलं की वेगवेगळा चिकटपणा असलेला हा तेल तवंग सुमारे ३० ते १२० मिनिटात ही जोडगोळी शोषून घेते. सुमारे ८०० मिलीग्राम वजनाची जोडगोळी १५ मिली लिटर तेल शोषून घेऊ शकते जे त्यातील जिलेटरच्या वस्तुमानाच्या २६० पट तर जोडगोळीच्या वस्तूमानाच्या १६ पट आहे. हे आकडे पाहिले की टनावारी सांडलेले तेल पाण्यातून काढायला किती टन सेल्युलोज लागेल याची कल्पना करवत नाही आणि एवढे सेल्युलोज कुठून आणायचे हा प्रश्न उभा राहातो. पण इतर उपायातून आणखी स्वस्तात आणि या प्रमाणात प्रदूषण नियंत्रण करण्याचं तंत्रज्ञान तरी कुठे उपलब्ध आहे? म्हणून या प्रयोगाचं महत्त्व वाढतं आणि म्हणूनच मर्यादित खर्चात, कमीत कमी देशात उपलब्ध असलेला कच्चा माल वापरुन जास्तीत जास्त सांडलेलं तेल गोळा करायला हा उत्तम पर्याय ठरु शकतो. तेल शोषून घेतलेल्या गोळ्यांवर दाब दिला की, किंवा उर्ध्वपातन पध्दतीनं त्यातले तेलही पुनर्वापरासाठी मिळू शकतं असंही लक्षात आलं आहे शिवाय या प्रयोगात झाडांपासून काढलेले सेल्युलोज जरी वापरलेले असले तरी कागदाचा पुनर्वापर करुन लगदा बनवण्याचे प्रयोग करणेही आवश्यक आहे.

तेल तवंग काढून घेण्याच्या सध्या काही पध्दती तरी सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणे अस्तित्वात आहेत. पण जेव्हा हे तेल पाण्यात सांडतं तेव्हा पाण्याच्या सतत घुसळण्याच्या क्रियेमुळे कालांतरानं त्याचं (तेल-पाण्याचं) एक मिश्रण (पायस) तयार होतं. यातून तर तेल वेगळं करणं केवळ अशक्य आहे. पण या जोडगोळ्यांद्वारे त्यातील तेलही वेगळं करणं सहज शक्य आहे असंही प्रयोगाअंती आढळून आलं आहे. हंस पक्ष्याला 'नीरक्षीर विवेक' बुध्दी असते असं म्हणतात. पाणी आणि दूध एकत्र असेल तर त्यातलं केवळ दूधच पिणारा पक्षी ही कविकल्पना आहे की माहिती नाही पण जिलेटर आणि लगद्याचं मिश्रण पाण्यात सांडलेलं तेल वेगळं करायला मात्र मिळालं आहे. हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर येऊन तेलामुळे प्रदूषण झालेल्या समुद्राच्या पाण्यात लवकरात लवकर वापरलं जावं ही सदिच्छा.

हा लेख गोवन वार्ता या दैनिकाच्या २७ ऑगस्ट २०१७ आणि 'शैक्षणिक संदर्भ' च्या ऑकटोबर-नोव्हेंबर २०१७ (अंक १०८) अंकात प्रसिद्ध झाला.

1 टिप्पणी: