ड्रोन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ड्रोन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

स्वमग्नतेच्या व्याधीशी लढा/ Fight with Autism

स्वमग्नता ही मेंदूच्या विकासाशी संबंधित एक स्थिती. या व्याधीचा पट फार मोठा आहे. संवाद कौशल्य, सामाजिक सहभाग आणि  कृतिकौशल्यांचा अभाव या व्याधींनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये त्यांच्या बालवयातच दिसून येतो. या व्याधीसंबंधी भारतामध्ये फारशी जागरुकता नाहीये. अशा व्याधीने ग्रस्त व्यक्तीला मानसिक आजार असल्याचे समजले जाते, वेडा ठरवले जाते, वाळीत टाकले जाते आणि तो समाजापासून आणखी-आणखी अलग होत जातो. याशिवाय प्रत्येक व्यक्ती वेगळ्या तर्‍हेने व्यक्त होत जाते त्यामुळे या व्याधीवर एक असा उपचार अस्तित्वात नाही. भारतात दर ५०० लोकसंख्येमागे १ याव्याधीने ग्रस्त असल्याचे एक अनुमान आहे तर जगभरात हेच प्रमाण १६० जणांमध्ये एक असे आहे, म्हणजे आपण सुदैवीच म्हणायला हवे. याबाबत आपल्या समाजात काही गैरसमजही आहेत. जसे, ही व्याधी पाश्चिमात्य देशांमध्ये आढळते, फक्त श्रीमंतांमध्ये असा आजार होऊ शकतो, या व्याधीने ग्रस्त व्यक्ती मुक्या असतात, वगैरे. अर्थात एक मात्र नक्की की प्रत्येक व्यक्तीमध्ये याची लक्षणे भिन्न प्रकारांनी दिसून येत असल्याने तिच्यात सुधारणा घडवून आणायची असेल तर त्या व्यक्तीच्या कुवतीनुसार तिच्यासाठी कार्यक्रम आखावा लागतो, तिच्याकडे लक्ष द्यायला वेगळा प्रशिक्षक ठेवावा लागतो. अशा प्रशिक्षकांची संख्या मर्यादित असल्याने प्रशिक्षकांवर अनेक मुलांची जबाबदारी येऊन पडते.

सहज हाताळता येण्यासारखे टॅब्लेटसारखे संगणकाचे प्रकार आजकाल मुलांना त्याच्या पडद्यावर (स्क्रिनवर) येणार्‍या विविध चित्रांमध्ये गुंतवून ठेवतात हा सर्वसामान्य अनुभव. त्यातून ते शिकतातही. हाच अनुभव स्वमग्न मुलांच्या बाबतीतही आढळतो. तेही त्याकडे आकर्षित होतात. म्हणून संगणकांचा उपयोग त्यांना शिकवायला केला जात आहे. प्रशिक्षकाची एकाच मुलामध्ये गुंतून पडण्यातून त्यामुळे सुटका होते. पुढे चालून अशा संगणकीय पडद्यापेक्षा रोबोबरोबर ते जास्त तादात्म्य पावतील असा विचार पुढे आला आणि त्या दृष्टीने केलेले प्रयोग प्रेरणादायी ठरले. सामान्य मूलही बाहुल्यांबरोबर संवाद साधताना आपण पाहातो. त्यातून त्याची भाषा सुधारते, शब्दसंग्रहात भर पडते. स्वमग्न मुलांमध्ये त्यांच्याशी संवाद साधणारी रोबोच्या रुपातली बाहुली मिळाली तर ते लवकर शिकतील हा विश्वास यामागे आहे. पण आतापावेतोच्या अभ्यासात खूप महागडे, याच कामासाठी निर्माण केलेले रोबो वापरले गेले ज्यात प्रशिक्षकांचा सहभाग शून्य आहे. असे रोबो घेणे सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. म्हणून प्रशिक्षकाच्या सहभागाने आणि अल्प किमतीतले रोबो वापरुन एक प्रयोग भारतीय विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी अशा मुलांना एका प्रशिक्षण देणार्‍या धर्मादायी संस्थेत जाऊन केला त्याचा हा आढावा.

स्वमग्न मुलांमध्ये भाषा आणि संवाद कौशल्याचा अभाव या बाबी सर्वसाधारणपणे त्यांच्या विकासात मोठाच अडथळा असल्याचे आढळून येते. एखाद्या शब्दाचा वास्तव अर्थ न कळणे, व्याकरण, शब्दोच्चार व्यवस्थित न करता येणे ही याची मूळ कारणे असतात. मग ते मूल त्या शब्दाचा अर्थ न कळता पुनरुच्चार करत सुटते, बोलताना अडखळते, उस्फूर्त प्रतिसाद देत नाही, तुटक शब्द वापरते आणि मग त्याच्याशी संवाद खुंटतो. महागड्या रोबोंचा वापर फक्त संवाद सुधारणेसाठीच केला जातो. पण स्वमग्न मुलांमध्ये आणखी एक मर्यादा आढळते ती म्हणजे त्यांच्या वेगळ्या पद्धतीच्या शरीराच्या ठेवणीमुळे त्यांच्या हालचालींमध्ये असूत्रता येते आणि ती त्यांच्या दैनंदिन गरजेच्या स्थूल आणि सूक्ष्म कृति कौशल्यांमध्ये अडथळे निर्माण करते. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींना नियमित व्यवसायोपचार आणि शारीरिक उपचारांची आवश्यकता असते.

कॉस्मो रोबो 

संशोधकांनी याकरता बाजारात उपलब्ध असणार्‍या आणि तुलनेने अल्प किमतीत मिळणार्‍या खेळण्यातल्या 'कॉझ्मो' रोबो आणि 'टेलो' नावाच्या लहान ड्रोनची निवड केली. कॉझ्मोचा वापर स्वमग्न मुलांच्या संभाषण कौशल्यासाठी आणि टेलो शारीरिक व्यायामाकरता वापरला गेला. त्यांच्या वापरापूर्वी कॉझ्मोला आज्ञावलींद्वारा माणसाचा आवाज दिला आणि विशिष्ट मुलाला जो व्यायाम द्यायचा आहे त्यानुसार टेलोला स्वयंप्रेरित हालचालींसाठी तयार केले. या शिक्षणाचे तीन उद्देश ठरवले गेले (१) वर्गात आणि (२) ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली स्वमग्न मुलाला कॉझ्मोचा वापर करुन संभाषण कौशल्य शिकवणे, आणि (३) स्वमग्न मुलाला प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली टेलोने शारीरिक व्यायामासाठी उद्युक्त करणे.
टेलो ड्रोन 

कॉझ्मोच्या पडद्यावर माणसाच्या चेहर्‍यावरचे हावभाव (इमोजी) दाखवण्याची सोय केली, शिवाय त्याला कॅमेरा आणि ध्वनीवर्धक असतोच. त्याला संगणकाशी आज्ञावलींद्वारे बोलण्याकरता जोडले गेले शिवाय त्याचे नियंत्रण प्रशिक्षकाच्या ताब्यात दिले. टेलोला खोलीच्या आकारानुसार कसे खाली-वर व्हायचे आणि खोलीच्या जमिनीवर लावलेल्या चिन्हांदरम्यान कशा हालचाली करायच्या याचे प्रशिक्षण दिले.

कोस्मोशी संवाद साधताना स्वमग्न मुलगा 

टेलोच्या उडण्याच्या पद्धतीनुसार स्वमग्न मुलगी हालचाल करताना 

कॉझ्मोशी संवाद साधताना खालील उद्दिष्टे ठरवली गेली: (१) प्राथमिक संवाद - कॉझ्मो मुलाला प्रश्न विचारेल आणि तसे नमुना उत्तर देऊन त्याला उत्तर द्यायला उद्युक्त करेल. जसे 'माझे नाव कॉझ्मो'. तुझे नाव काय आहे? यातून स्वमग्न मुलांची उस्फूर्त प्रतिसादशक्ती विकसित करणे. (२) कथा कथन - प्रशिक्षक मुलाला गोष्ट वाचून दाखवेल आणि मग कॉझ्मो त्यावर प्रश्न विचारेल. प्रश्न विचारताना पडद्यावर काही सूचक दृष्य दाखवेल. याचा उद्देश मुलाची ग्रहणक्षमता आणि शब्दरुपात प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे. (३) स्पेलिंग सांगणे - उच्चारलेल्या शब्दाचे योग्य स्पेलिंग सांगणे किंवा लिहिणे. (४) वाचन - कॉझ्मोने एक वाक्य वाचायचे आणि तेच मुलाने उच्चारायचे. यातून संभाषण कला शिकवण्याचा उद्देश होता.

टेलो ड्रोनचा वापर खालील उद्दिष्टांसाठी केला गेला. (१) हातांची हालचाल - ठराविक उंचीपर्यंत त्याने उडायचे आणि पुन्हा जमिनीवर यायचे आणि त्याच्या वर-खाली होण्याबरोबर मुलानेही आपले हात वर-खाली करायचे (२) आळीपाळीने हात वर करणे - टेलो उड्डाण करतो आणि हवेत डावीकडून उजवीकडे झुकत गिरक्या घेतो आणि परत उलट्या दिशेने फिरतो त्याच्या संगतीने मुलानेही आपला योग्य तो हात वर खाली करायचा (३) उठाबशा - टेलो हवेत उडतो आणि पुन्हा जमिनीवर येतो त्या लयीत मुलानेही उठायचे आणि उकिडवे बसायचे. (४) जलद धाव - टेलो छताजवळ जातो आणि मग खोलीभर भिंतींच्या बाजूबाजूने फिरतो. मुलांनी त्याच्या मागे-मागे धावायचे. 

कॉझ्मोचा उपयोग ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यासाठीही केला. (१) तीन अक्षरांचे शब्द ओळखणे - योग्य उच्चार करायला याचा उपयोग केला. यात कॉझ्मोने उच्चारलेले शब्द पुन्हा मुलाने उच्चारायचे, चित्र ओळखून शब्द उच्चारायचा, शब्दावरुन चित्र ओळखायचे वगैरे. यात प्रशिक्षक कॉझ्मोला शब्द उच्चारायला सांगतो त्याचे उच्चार ऐकून मूल शिकते आणि कॉझ्मोची नक्कल करते. (२) प्लीज, व्हॉट, हेल्प या शब्दांचा उपयोग करायला शिकणे - ही क्रिया प्रशिक्षकाने गोष्ट सा़ंगून झाल्यावर, कॉझ्मो प्रश्न विचारतो त्यावेळी सामाजिक चालीरितींमधून हे शब्द उच्चारायला शिकवले जाते. (३) हो-नाही म्हणायला शिकवणे - प्रशिक्षक कॉझ्मोला प्रश्न विचारतो आणि तो त्याचे उत्तर हो-नाही या शब्दांनी देतो. मूल ते ऐकत त्या प्रश्नाचा अर्थ जाणून घेत हो-नाही म्हणायला शिकते. 

या क्रिया प्रशिक्षकाकडून शिकणार्‍या मोठ्या गटाचे निरीक्षण केले गेले. त्यातून जी मुलं प्रशिक्षकाकडून शिकण्यात फारसा रस घेत नव्हती त्यांची निवड वरील पद्धतीने रोबोकडून द्यायच्या शिक्षणासाठी केली गेली आणि त्यांचा प्रतिसाद तपासला गेला. या अभ्यासाअंती असे लक्षात आले की ही मुलं रोबोने शिकवल्यानंतर त्यात रस घ्यायला लागतात आणि योग्य असे प्रतिसाद देतात. 

एकूणच अशा मुलांना शिकवणे किती अवघड आहे हे वरील उदाहरणांवरुन लक्षात येते. पण ही स्वमग्न मुलं रोबोंना उत्तम प्रतिसाद देताना आढळून आली. संशोधक नमूद करतात की त्यांनी फारच थोड्या मुलांवर ही चाचणी घेतली आहे आणि हे निष्कर्ष तपासायला खूप मोठ्या प्रमाणावर असे प्रयोग करणे आवश्यक आहे. पण यातून एक दिशा मात्र मिळते. एक आशेचा किरण दिसतो. प्रशिक्षकावर पडणारा कामाचा भार यामुळे हलका होऊ शकतो. थोडक्या गुंतवणूकीतून असे रोबो घेऊन अनेक स्वमग्न मुलांचे आयुष्य मार्गी लावायला संधी मिळते. 

छायाचित्र: मूळ लेखातून साभार  

संदर्भः Nabanita Paul, N., et al. Can non-humanoid social robots reduce workload of special educators: An online and in-premises field study. IEEE International Conference on Robotics and Automation (ICRA 2021), Xi'an, China. 31 May-4 June  2021.  https://mllab.csa.iisc.ac.in/downloads/ICRA21_2315_FI.pdf

-------------------------------------------------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या ३ ऑगस्ट च्या अंकात प्रसिद्ध झाला.