शिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

स्वमग्नतेच्या व्याधीशी लढा/ Fight with Autism

स्वमग्नता ही मेंदूच्या विकासाशी संबंधित एक स्थिती. या व्याधीचा पट फार मोठा आहे. संवाद कौशल्य, सामाजिक सहभाग आणि  कृतिकौशल्यांचा अभाव या व्याधींनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये त्यांच्या बालवयातच दिसून येतो. या व्याधीसंबंधी भारतामध्ये फारशी जागरुकता नाहीये. अशा व्याधीने ग्रस्त व्यक्तीला मानसिक आजार असल्याचे समजले जाते, वेडा ठरवले जाते, वाळीत टाकले जाते आणि तो समाजापासून आणखी-आणखी अलग होत जातो. याशिवाय प्रत्येक व्यक्ती वेगळ्या तर्‍हेने व्यक्त होत जाते त्यामुळे या व्याधीवर एक असा उपचार अस्तित्वात नाही. भारतात दर ५०० लोकसंख्येमागे १ याव्याधीने ग्रस्त असल्याचे एक अनुमान आहे तर जगभरात हेच प्रमाण १६० जणांमध्ये एक असे आहे, म्हणजे आपण सुदैवीच म्हणायला हवे. याबाबत आपल्या समाजात काही गैरसमजही आहेत. जसे, ही व्याधी पाश्चिमात्य देशांमध्ये आढळते, फक्त श्रीमंतांमध्ये असा आजार होऊ शकतो, या व्याधीने ग्रस्त व्यक्ती मुक्या असतात, वगैरे. अर्थात एक मात्र नक्की की प्रत्येक व्यक्तीमध्ये याची लक्षणे भिन्न प्रकारांनी दिसून येत असल्याने तिच्यात सुधारणा घडवून आणायची असेल तर त्या व्यक्तीच्या कुवतीनुसार तिच्यासाठी कार्यक्रम आखावा लागतो, तिच्याकडे लक्ष द्यायला वेगळा प्रशिक्षक ठेवावा लागतो. अशा प्रशिक्षकांची संख्या मर्यादित असल्याने प्रशिक्षकांवर अनेक मुलांची जबाबदारी येऊन पडते.

सहज हाताळता येण्यासारखे टॅब्लेटसारखे संगणकाचे प्रकार आजकाल मुलांना त्याच्या पडद्यावर (स्क्रिनवर) येणार्‍या विविध चित्रांमध्ये गुंतवून ठेवतात हा सर्वसामान्य अनुभव. त्यातून ते शिकतातही. हाच अनुभव स्वमग्न मुलांच्या बाबतीतही आढळतो. तेही त्याकडे आकर्षित होतात. म्हणून संगणकांचा उपयोग त्यांना शिकवायला केला जात आहे. प्रशिक्षकाची एकाच मुलामध्ये गुंतून पडण्यातून त्यामुळे सुटका होते. पुढे चालून अशा संगणकीय पडद्यापेक्षा रोबोबरोबर ते जास्त तादात्म्य पावतील असा विचार पुढे आला आणि त्या दृष्टीने केलेले प्रयोग प्रेरणादायी ठरले. सामान्य मूलही बाहुल्यांबरोबर संवाद साधताना आपण पाहातो. त्यातून त्याची भाषा सुधारते, शब्दसंग्रहात भर पडते. स्वमग्न मुलांमध्ये त्यांच्याशी संवाद साधणारी रोबोच्या रुपातली बाहुली मिळाली तर ते लवकर शिकतील हा विश्वास यामागे आहे. पण आतापावेतोच्या अभ्यासात खूप महागडे, याच कामासाठी निर्माण केलेले रोबो वापरले गेले ज्यात प्रशिक्षकांचा सहभाग शून्य आहे. असे रोबो घेणे सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. म्हणून प्रशिक्षकाच्या सहभागाने आणि अल्प किमतीतले रोबो वापरुन एक प्रयोग भारतीय विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी अशा मुलांना एका प्रशिक्षण देणार्‍या धर्मादायी संस्थेत जाऊन केला त्याचा हा आढावा.

स्वमग्न मुलांमध्ये भाषा आणि संवाद कौशल्याचा अभाव या बाबी सर्वसाधारणपणे त्यांच्या विकासात मोठाच अडथळा असल्याचे आढळून येते. एखाद्या शब्दाचा वास्तव अर्थ न कळणे, व्याकरण, शब्दोच्चार व्यवस्थित न करता येणे ही याची मूळ कारणे असतात. मग ते मूल त्या शब्दाचा अर्थ न कळता पुनरुच्चार करत सुटते, बोलताना अडखळते, उस्फूर्त प्रतिसाद देत नाही, तुटक शब्द वापरते आणि मग त्याच्याशी संवाद खुंटतो. महागड्या रोबोंचा वापर फक्त संवाद सुधारणेसाठीच केला जातो. पण स्वमग्न मुलांमध्ये आणखी एक मर्यादा आढळते ती म्हणजे त्यांच्या वेगळ्या पद्धतीच्या शरीराच्या ठेवणीमुळे त्यांच्या हालचालींमध्ये असूत्रता येते आणि ती त्यांच्या दैनंदिन गरजेच्या स्थूल आणि सूक्ष्म कृति कौशल्यांमध्ये अडथळे निर्माण करते. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींना नियमित व्यवसायोपचार आणि शारीरिक उपचारांची आवश्यकता असते.

कॉस्मो रोबो 

संशोधकांनी याकरता बाजारात उपलब्ध असणार्‍या आणि तुलनेने अल्प किमतीत मिळणार्‍या खेळण्यातल्या 'कॉझ्मो' रोबो आणि 'टेलो' नावाच्या लहान ड्रोनची निवड केली. कॉझ्मोचा वापर स्वमग्न मुलांच्या संभाषण कौशल्यासाठी आणि टेलो शारीरिक व्यायामाकरता वापरला गेला. त्यांच्या वापरापूर्वी कॉझ्मोला आज्ञावलींद्वारा माणसाचा आवाज दिला आणि विशिष्ट मुलाला जो व्यायाम द्यायचा आहे त्यानुसार टेलोला स्वयंप्रेरित हालचालींसाठी तयार केले. या शिक्षणाचे तीन उद्देश ठरवले गेले (१) वर्गात आणि (२) ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली स्वमग्न मुलाला कॉझ्मोचा वापर करुन संभाषण कौशल्य शिकवणे, आणि (३) स्वमग्न मुलाला प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली टेलोने शारीरिक व्यायामासाठी उद्युक्त करणे.
टेलो ड्रोन 

कॉझ्मोच्या पडद्यावर माणसाच्या चेहर्‍यावरचे हावभाव (इमोजी) दाखवण्याची सोय केली, शिवाय त्याला कॅमेरा आणि ध्वनीवर्धक असतोच. त्याला संगणकाशी आज्ञावलींद्वारे बोलण्याकरता जोडले गेले शिवाय त्याचे नियंत्रण प्रशिक्षकाच्या ताब्यात दिले. टेलोला खोलीच्या आकारानुसार कसे खाली-वर व्हायचे आणि खोलीच्या जमिनीवर लावलेल्या चिन्हांदरम्यान कशा हालचाली करायच्या याचे प्रशिक्षण दिले.

कोस्मोशी संवाद साधताना स्वमग्न मुलगा 

टेलोच्या उडण्याच्या पद्धतीनुसार स्वमग्न मुलगी हालचाल करताना 

कॉझ्मोशी संवाद साधताना खालील उद्दिष्टे ठरवली गेली: (१) प्राथमिक संवाद - कॉझ्मो मुलाला प्रश्न विचारेल आणि तसे नमुना उत्तर देऊन त्याला उत्तर द्यायला उद्युक्त करेल. जसे 'माझे नाव कॉझ्मो'. तुझे नाव काय आहे? यातून स्वमग्न मुलांची उस्फूर्त प्रतिसादशक्ती विकसित करणे. (२) कथा कथन - प्रशिक्षक मुलाला गोष्ट वाचून दाखवेल आणि मग कॉझ्मो त्यावर प्रश्न विचारेल. प्रश्न विचारताना पडद्यावर काही सूचक दृष्य दाखवेल. याचा उद्देश मुलाची ग्रहणक्षमता आणि शब्दरुपात प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे. (३) स्पेलिंग सांगणे - उच्चारलेल्या शब्दाचे योग्य स्पेलिंग सांगणे किंवा लिहिणे. (४) वाचन - कॉझ्मोने एक वाक्य वाचायचे आणि तेच मुलाने उच्चारायचे. यातून संभाषण कला शिकवण्याचा उद्देश होता.

टेलो ड्रोनचा वापर खालील उद्दिष्टांसाठी केला गेला. (१) हातांची हालचाल - ठराविक उंचीपर्यंत त्याने उडायचे आणि पुन्हा जमिनीवर यायचे आणि त्याच्या वर-खाली होण्याबरोबर मुलानेही आपले हात वर-खाली करायचे (२) आळीपाळीने हात वर करणे - टेलो उड्डाण करतो आणि हवेत डावीकडून उजवीकडे झुकत गिरक्या घेतो आणि परत उलट्या दिशेने फिरतो त्याच्या संगतीने मुलानेही आपला योग्य तो हात वर खाली करायचा (३) उठाबशा - टेलो हवेत उडतो आणि पुन्हा जमिनीवर येतो त्या लयीत मुलानेही उठायचे आणि उकिडवे बसायचे. (४) जलद धाव - टेलो छताजवळ जातो आणि मग खोलीभर भिंतींच्या बाजूबाजूने फिरतो. मुलांनी त्याच्या मागे-मागे धावायचे. 

कॉझ्मोचा उपयोग ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यासाठीही केला. (१) तीन अक्षरांचे शब्द ओळखणे - योग्य उच्चार करायला याचा उपयोग केला. यात कॉझ्मोने उच्चारलेले शब्द पुन्हा मुलाने उच्चारायचे, चित्र ओळखून शब्द उच्चारायचा, शब्दावरुन चित्र ओळखायचे वगैरे. यात प्रशिक्षक कॉझ्मोला शब्द उच्चारायला सांगतो त्याचे उच्चार ऐकून मूल शिकते आणि कॉझ्मोची नक्कल करते. (२) प्लीज, व्हॉट, हेल्प या शब्दांचा उपयोग करायला शिकणे - ही क्रिया प्रशिक्षकाने गोष्ट सा़ंगून झाल्यावर, कॉझ्मो प्रश्न विचारतो त्यावेळी सामाजिक चालीरितींमधून हे शब्द उच्चारायला शिकवले जाते. (३) हो-नाही म्हणायला शिकवणे - प्रशिक्षक कॉझ्मोला प्रश्न विचारतो आणि तो त्याचे उत्तर हो-नाही या शब्दांनी देतो. मूल ते ऐकत त्या प्रश्नाचा अर्थ जाणून घेत हो-नाही म्हणायला शिकते. 

या क्रिया प्रशिक्षकाकडून शिकणार्‍या मोठ्या गटाचे निरीक्षण केले गेले. त्यातून जी मुलं प्रशिक्षकाकडून शिकण्यात फारसा रस घेत नव्हती त्यांची निवड वरील पद्धतीने रोबोकडून द्यायच्या शिक्षणासाठी केली गेली आणि त्यांचा प्रतिसाद तपासला गेला. या अभ्यासाअंती असे लक्षात आले की ही मुलं रोबोने शिकवल्यानंतर त्यात रस घ्यायला लागतात आणि योग्य असे प्रतिसाद देतात. 

एकूणच अशा मुलांना शिकवणे किती अवघड आहे हे वरील उदाहरणांवरुन लक्षात येते. पण ही स्वमग्न मुलं रोबोंना उत्तम प्रतिसाद देताना आढळून आली. संशोधक नमूद करतात की त्यांनी फारच थोड्या मुलांवर ही चाचणी घेतली आहे आणि हे निष्कर्ष तपासायला खूप मोठ्या प्रमाणावर असे प्रयोग करणे आवश्यक आहे. पण यातून एक दिशा मात्र मिळते. एक आशेचा किरण दिसतो. प्रशिक्षकावर पडणारा कामाचा भार यामुळे हलका होऊ शकतो. थोडक्या गुंतवणूकीतून असे रोबो घेऊन अनेक स्वमग्न मुलांचे आयुष्य मार्गी लावायला संधी मिळते. 

छायाचित्र: मूळ लेखातून साभार  

संदर्भः Nabanita Paul, N., et al. Can non-humanoid social robots reduce workload of special educators: An online and in-premises field study. IEEE International Conference on Robotics and Automation (ICRA 2021), Xi'an, China. 31 May-4 June  2021.  https://mllab.csa.iisc.ac.in/downloads/ICRA21_2315_FI.pdf

-------------------------------------------------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या ३ ऑगस्ट च्या अंकात प्रसिद्ध झाला. 

बुधवार, ६ जुलै, २०२२

गोव्यातल्या रेबीज निर्मूलनाची यशोगाथा / Rabies Control: Success Story from Goa

आभार: फेसबुक 

रेबीज हा एक अत्यंत संहारक असा आणि मुख्यतः संक्रमित प्राण्यांकडून, विशेषतः रेबीजग्रस्त कुत्र्यांच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये पसरणारा हा संसर्गजन्य रोग आहे. इतर संसर्गजन्य रोगांमुळे होणार्‍या मृत्यूंपेक्षा रेबीजमुळे होणारे मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरवर्षी यामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो आणि मुख्यत्वेकरुन यात लहान मुले आणि निराश्रीतांचा समावेश प्रामुख्याने असतो. रेबीजमुळे होणार्‍या मृत्यूत आणि यामुळे आजारी पडून, अपंगत्व येऊन आयुष्यातला बराच मोठा कालावधी वाया घालवाव्या लागलेल्या पीडितांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे. शिवाय पीडिताला वेळीच योग्य उपचार मिळाले तरी यामुळे आजारी पडणार्‍यांची संख्या कमी होत नाही कारण कुत्रे इतरांना चावण्याचे थांबत नाहीत. म्हणून संक्रमित कुत्र्यांचे लसीकरण करुनच याच्या प्रसाराला आळा घालता येणे शक्य आहे. अस्तित्वात असलेल्या किमान ७०% कुत्र्यांचे लसीकरण झाले तर त्यांच्यापासून संक्रमित होणारा हा रोग मर्यादेत येऊ शकतो (हर्ड इम्युनिटी). पण भारतात बेवारशी, मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक - हजारो-लाखोंच्या संख्येने, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अतिशय अवघड बाब आणि त्यामुळे भारतासारख्या देशात रेबीजचे निर्मूलन ही अशक्यातली बाब समजली जायची. पण गोव्यासारख्या राज्याने, आकाराने लहान का होईना, हे शक्य करुन दाखवले. ते कसे केले त्यावर नुकताच एक संशोधन लेख प्रसिद्ध झाला आहे त्या आधारे लिहिलेली ही यशोगाथा.

याकरता राज्यभर एक मोठा कार्यक्रम २०१३ पासून सातत्याने राबवला गेला आणि त्याचे उत्कृष्ट परिणाम २०१९ नंतर पाहायला मिळत आहेत. हा कार्यक्रम तीन स्तरांवर राबवला गेला - (१) लसीकरण, (२) शिक्षण आणि (३) रेबीज बाधितांवर पाळत. 

(१) लसीकरण

या रोगाला बळी पडणार्‍यांची संख्या आटोक्यात आणायची असेल तर सर्वप्रथम कुत्र्यांचे लसीकरण करणे याला अग्रक्रम देणे आवश्यकच. याकरता राज्यभर वेगवेगळ्या भागांकरता फिरत्या तुकड्यांची पथके तयार केली गेली आणि त्यांच्यावर त्याभागातील मोकाट कुत्र्यांना जाळीत पकडून तसेच पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करायची जबाबदारी सोपवली गेली. पथकांनी दर दिवशी कुठला भाग पूर्ण करायचा हे स्मार्टफोनवरील नकाशामध्ये बहुभूजकोन (पॉलिगॉन्स) आखून  ठरवले गेले. किती लसी दिल्या गेल्या, त्यातील पाळीव आणि मोकाट कुत्र्यांची संख्या, इत्यादी माहितीचे संकलन मध्यवर्ती केंद्राद्वारे करुन ती माहिती पद्धतशीरपणे साठवली गेली, त्या पथकांना लसीकरणासाठी लागणार्‍या साहित्याचा सातत्याने पुरवठा केला गेला. यामुळे राज्यातला कोपरान-कोपरा पिंजून काढणे शक्य झाले. २०१३ ते २०१७ दरम्यान अंदाजित एक लाख सदतीस हजार कुत्र्यांपैकी सुमारे एक लाख कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण झाले होते आणि तोच वेग पुढची दोन वर्षंही राखला गेला (आकृती १). २०१९ च्या अखेरीस एकूण सव्वाचार लाखांवर लसी देऊन झाल्या होत्या. एका अभ्यासानुसार सुमारे ४०% कुत्र्यांचे लसीकरण झाले तर हे कुत्र्यांमध्ये पसरणार्‍या संसर्गाचे प्रमाण कमी होते तर ७०% लसीकरणाअंती विषाणूंचा प्रसार संपूर्णपणे आटोक्यात येतो. एकूण किती टक्के कुत्र्यांचे लसीकरण झाले आहे याचा अंदाज घेण्यासाठी दरवर्षाअखेर प्रत्येक लसीकरण झालेल्या भागात दिसतील तेवढ्या कुत्र्यांची शिरगणती करुन सर्वेक्षण केले गेले. एकूण ३१८८ सर्वेक्षणे झाली त्यातून अखेरीस असे दिसून आले की ९०% कुत्र्यांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ८३% कुत्रे भटक्यांच्या यादीत टाकले गेले. यातील काही पाळलेले जरी असले तरी ते बांधलेले नसून मोकळेच असतात म्हणून त्यांचाही याच यादीत समावेश केला.  



आकृती १: गोव्यातील तालुके आणि त्यातील कुत्र्यांच्या संख्येचा अंदाज

(२) शिक्षण

या कार्यक्रमाचे दुसरे महत्त्वाचे अंग शिक्षणाचे. यामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले गेले. कुत्र्यांपासून कसे सावध राहायचे, आणि जर चावलाच तर काय करायचे हे या कार्यक्रमांतर्गत सांगितले गेले. एकूण सुमारे सात लाख विद्यार्थी आणि ३१ हजार शिक्षकांपर्यंत २०१४ ते २०१९ दरम्यान हा संदेश पोहोचवला गेला. याच दरम्यान विविध समुदायांमार्फत, स्थानिक अधिकारी आणि सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान दीड लाख जनतेपर्यंतही याबाबत संदेश पोहोचवला गेला.

(३) रेबीज बाधितांवर पाळत

कार्यक्रमाला यश मिळवून देणारा तिसरा स्तंभ रेबीज बाधित कुत्र्यांवर पाळत ठेवण्याचा होता. यादरम्यान भटक्या आणि पाळीव कुत्र्यांवर बारीक नजर ठेवली गेली. यासाठी जनतेकडूनही आधार घेतला गेला. कोणाला एखाद्या कुत्र्याविषयी शंका आली तर त्याच्यासाठी ऑक्टोबर २०१७ पासून एका राखीव क्रमांकाच्या फोनवर (हॉटलाईन) संपर्क साधण्याची सोय केली गेली. यावर सात हजारावर आलेल्या संपर्कांची दखल घेतली गेली. दर आठवड्याला २०१८ साली सरासरी ५० जणांनी तर २०१९ मध्ये सरासरी ७९ जणांनी संपर्क साधला. हे संपर्क गोव्याच्या विविध भागातून केले जात होते त्यावरुन या कार्यक्रमाचे यश सर्वदूर पोहोचल्याचे आढळून येते. अर्थात यातील बरेचसे रेबीज बाधित कुत्र्यांसंबंधी नसून सुमारे ४४% संपर्क लसीकरणाची विनंती करणारे होते, ३२% जखमी झालेल्या अथवा आजाराची लक्षणं असलेल्या कुत्र्यांसंबंधी, आणि ७% कुत्र्यांच्या उपद्रवासंबंधी होते. रेबीज बाधित कुत्र्यांसंबंधी संशयाचे संपर्काठिकाणी पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ पोहोचून प्राण्यांचे परीक्षण करत आणि बाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांशी संवाद साधत. २०१६ पासून बाधित कुत्र्यांची तपासणी करण्याची सोय स्थानिक स्तरावर उपलब्ध केली असल्याने रोगाचे निदान त्वरीत करण्याची आणि उपचाराला सुरुवात करण्याची सोय झाली होती.

२०१४ साली एकूण ७३ रेबीज बाधित कुत्र्यांची नोंद झाली. त्या वर्षी सरासरी १० प्रतिमहिना (जुलै २०१४ मध्ये सर्वाधिक -२० प्रकरणे) यावरुन हे प्रमाण २०१९ साली ०.८ वर घसरले (९२% घट). २०१९ साली १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये एकाही बाधित कुत्र्याची नोंद झाली नाही. १२ वा तालुका महाराष्ट्राच्या सीमेवरील असल्याने तिकडून येणारे बाधित सापडले असावेत असा कयास आहे (आकृती २). रेबीज विषाणूंचे पृथःकरण केले तेव्हा त्यांचे तीन प्रकार सापडले. या विषाणूंनी बाधित कुत्रे गोव्याच्या सीमेवरील राज्यातही सापडलेले आहेत. 

आकृती २: २०१४ आणि २०१९ दरम्यान झालेली बाधित कुत्र्यांची नोंद

सार्वजनिक आरोग्य आणि किफायतशीरता 

या कार्यक्रमाच्या परिणामाचा आढावा घेतला तेव्हा असे आढळले की रेबीजमुळे मानवी मृत्यूचे प्रमाण १७ वरुन (२०१४ साली) शून्यावर (२०१८ आणि २०१९ साली) पोहोचले आहे. विशेषतः २०१२ मध्ये कुत्र्याच्या चावण्याच्या प्रकरणांची नोंद दर लाख लोकसंख्येमागे ७८५ (२०१२ साली) वरुन १४३० (२०१९ साली) वर पोहोचली तरीही. 

हा राज्यव्यापी कार्यक्रम याचेच दिग्दर्शन करतो की हा देशभर या मॉडेलप्रमाणे राबवला तर आंतरराष्ट्रीय संस्थांनी सुचवल्याप्रमाणे २०३० पर्यंत भारत त्याचा वाटा हे जग रेबीजमुक्त करण्यासाठी उचलू शकतो. यासाठी प्रत्येक कुत्र्यामागे आलेला सुमारे २७५ रुपयांचा खर्च आंतरराष्ट्रीय सरासरीपेक्षा (१७० रुपये) थोडा जास्त असला तरी इतर काही देशात तो ११७५ रुपयांपर्यंतही पोहोचला आहे. म्हणजे मोकाट कुत्र्यांच्या मोठ्ठया संख्येला पकडून त्यांचे लसीकरण करण्याकरता एवढा खर्च किरकोळच म्हणायला हवा. उत्पादनक्षम व्यक्तीचे आंतरराष्ट्रीय मानकानुसार सरासरी वार्षिक उत्पन्न ४२००० रुपये जर घेतले तर बाधिताचे या कार्यक्रमामुळे वाचलेले आजारपणामुळे वाया गेलेले दिवस किंवा मृत्यू यांचा विचार करता हा कार्यक्रम अतिशय किफायतशीर स्तरावरच राबवला गेला असे म्हणायला हरकत नाही. गोवेकरांचे वार्षिक सरासरी उत्पन्न तर साडेपाच लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते. भारतीयांचे वार्षिक सरासरी उत्पन्नही दीड लाख रुपये आहे. त्यामुळे हा आलेला खर्च असा कार्यक्रम राबवायला किफायतशीरच आहे असे दिसून येते असे संशोधकांचे मत आहे. या कारणांमुळे गोव्यात राबवलेला हा कार्यक्रम एक पथदर्शक उदाहरणच म्हणायला हरकत नाही.

संदर्भः Gibson, A.D. et al. Elimination of human rabies in Goa, India through an integrated One Health approach. Nature Communications. 13; 2022; 2788. https://doi.org/10.1038/s41467-022-30371-y

आकृती आभार : संदर्भ