स्थळ
सरकारी रुग्णालय. वेळ सकाळची. ठराविक वेळेत इथे बालकांना लस दिली जाते.
त्यामुळे गर्दी. सगळ्या माता आपआपल्या बाळांना घेऊन आपला नंबर कधी लागतोय
याची वाट पहात बसलेल्या आहेत. तसं एकाच वेळेस अनेक बालकांना लस दिली जातेय
पण गर्दीच इतकी आहे की थोडा कोलाहल माजलाच आहे. सगळीच बालकं त्यांना सुई
टोचल्यावर कळवळून रडताहेत. तर त्यांचा आवाज ऐकून रांगेतल्या इतर बाळांच्या
हळुवार मनालाही कसली तरी अनामिक भीती वाटतेय आणि तेही आपला आवाज त्यांच्या
आवाजात मिसळताहेत. त्यांना या संवेदनाशून्य जगाचा अद्याप परिचय व्हायचा आहे
ना! परिचारिका मात्र निर्विकारपणे एका पाठोपाठ एक बाळांना इंजेक्शनद्वारे
नाहीतर तोंडावाटे लस देण्यात गर्क आहेत. बाळांचं रडणं त्यांना सवयीचंच झालं
आहे. बाळांच्या आयांनाही बाळाला टोचल्यावर त्यांना दुखलं म्हणून वाईट
वाटतंय पण हे होणारंच हे सगळ्यांनीच अध्याहृत धरलंय. पिढ्यानपिढ्या हेच
चाललंय. त्यात विशेष ते काय? परिचारिकांना आणि आयांना त्यात विशेष असं वाटत
नसलं तरी वैज्ञानिकांना मात्र तसं वाटत नाही. सुई शिवाय इंजेक्शन देता आलं
तर किती मजा येईल नां? त्याच खटपटीत ते आहेत आणि आपण या लेखात त्यांच्या
ह्या प्रयत्नाचा आढावा घेणार आहोत.