पाऊस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पाऊस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

पावसाळ्याला ग्रासणार्‍या राक्षसांची गोष्ट/ Effect of global warming on rains

'हवाई जहाज' की गलबत? चेनै चा २०१५ चा पाऊस 
वायू प्रदूषणाची वाढती पातळी ही सगळ्यांच्याच आरोग्याला, विशेषतः विकसनशील देशांना धोकादायक ठरणार आहे असे इशारे जागतिक आरोग्य संघटना (WHO) एका तपापासून देतेय. विशेषतः चीन आणि भारतातील शहरांत होणार्‍या वायू प्रदूषणाच्या वाढीमुळे दरवर्षी सुमारे २० लाख लोकांना अकालीच प्राणाला मुकावं लागतंय. ही बातमी पुरेशी वाईट नाही असं वाटावं अशी परिस्थिती डॉ.रघू मुर्तुगुड्डे आणि त्यांचे सहाध्यायी यांनी केलेल्या संशोधनातून आली आहे. या संशोधनात भारतीयांचं योगदानही आहे. रघू मुर्तुगुड्डे हे भारतीय वंशाचे संशोधक मेरीलँड विद्यापीठात संशोधन करतात आणि पृथ्वी विज्ञान शास्त्रात त्यांच्या संशोधनाकडे आदरानं पाहिलं जातं. यांच्या असं लक्षात आलंय की या देशांमधील वाढत्या वायू प्रदूषण आणि धूलीकणांच्या थरांमुळे शतकभरात मोसमी पावसाची सरासरी २० टक्क्यांनी घटली आहे.

इंग्रजीतील 'मान्सून' हा शब्द अरबी भाषेतील 'मोसम' या ऋतुपासून आला आहे. उन्हाळ्यानंतरचा आशिया खंड चिंब करणारा मोसमी पाऊस हा निसर्गातील एक मोठा चमत्कारच आहे. अनादि कालापासून हा कवी आणि लेखकांना स्फूर्ती देत आलेला आहे. वर्षानुवर्ष १ जूनच्या सुमारास याचं आगमन ठरलेलं होतं. याची सुरुवात भारताच्या दक्षिण टोकापासून होते. जरी याचं आगमन जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत करणारं असलं तरी या निसर्गाच्या देणगीकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात. वार्षिक सरासरीच्या सुमारे ८० टक्के पाऊस या उपखंडात या ऋतुत होतो आणि म्हणूनच हा येथे वास्तव्य करणार्‍यांसाठी जीवनाधार ठरला आहे. जसं त्याच्या आगमनाची वेळ ठरलेली आहे तसंच त्याच्या ओसरण्याचीही. वर्षातले तब्बल चार महिने मुक्काम ठोकलेला पाऊस ३ ऑक्टोबरच्या दरम्यान पुन्हा पुढच्या वर्षी येण्यासाठी रजा घेतो. त्याच्या या वारंवारितेमुळे 'नेमेचि येतो मग पावसाळा' ही  काव्यपंक्ती प्रसिध्द झाली असावी.

वातावरणातील आणि भूभौतिकीय घटनांचा एकत्रित अभ्यास मोसमी पावसाचा अंदाज बांधायला मदत करतात. उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून वहाणार्‍या व्यापारी वार्‍यांचं मीलन आणि विषुववृत्ताच्या आसपास उच्चतम पातळी गाठणारी सूर्याची उष्णता, संपूर्ण पृथ्वीला वेढणारा रुंद असा ढगांचा पट्टा आणि वादळं निर्माण करते. याला आंतर-उष्णकटीबंधीय केंद्रभिमुख क्षेत्र (Inter Tropical Convergence Zone - ITCZ) असं म्हणलं जातं. हे क्षेत्र उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि ऋतुबदलानुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे हेलकावत असते.

समुद्राच्या पाण्यापेक्षा पृथ्वीवरचा भूभाग वेगानं तापत असल्यानं आणि विषुववृत्ताच्या उत्तरेकडे भूभागाची व्याप्ती अधिकतम असल्यानं हे क्षेत्र उत्तर गोलार्धातल्या उन्हाळ्याच्या दरम्यान जास्तच सक्रिय होतं. जरी हा मोसमी प्रवाह सगळ्याच खंडांशी निगडीत असला तरी दक्षिण आशियाई मान्सून जास्तच सक्रिय होतो कारण या ठिकाणी खंडाचा अधिकतम भूभाग उष्ण कटीबंधीय प्रदेशात सरकलेला दिसतो. शिवाय भव्य आणि उंचच उंच अशा हिमालय पर्वताच्या रांगा आणि तिबेटीय पठार या भूभागाचे तापमान आणखी वाढवायला हातभार लावतात. हिन्दी महासागरासारखा शेजारी मग या दक्षिण आशियाई रखरखत्या भूभागाची उष्णता आपल्याकडे खेचून मोसमी बदल घडवून आणण्यात आपला वाटा उचलतो.

जागतिक तापमानवृध्दीमुळं खरं तर आतापावेतो दक्षिण आशियाई भूभागाचं तापमान हिन्दी महासागरापेक्षा वेगानं वाढून दोन्हीत मोठा फरक दिसून यायला हवा होता आणि परिणामी दक्षिण आशियात पावसाचं प्रमाण वाढायला हवं होतं. भावी कालात ऋतुमान कसं असेल याचा अंदाज घेणारे बहुतांश अभ्यास असं वर्तवतात की जागतिक तापमानवृध्दी २१व्या शतकात दक्षिण आशियाई भागात जास्त पाऊस घेऊन येईल पण वस्तुस्थिती मात्र वेगळेच चित्र उभे करतेय. भारताच्या उपखंडावर २०व्या शतकात पावसाचं प्रमाण सातत्यानं, विशेषतः पाकिस्तान आणि गंगेपासच्या मैदानी प्रदेशात, खालावतंय  असं शतकभरच्या पावसाच्या सरासरी नोंदींवरुन दिसून येतं. याचं कारण वैज्ञानिकांना एक गूढच बनलं होतं.

'नेचर कम्युनिकेशन्स' (http://www.nature.com/ncomms/2015/150616/ncomms8423/abs/ncomms8423.html) मधल्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या लेखात या संशोधकांनी हे कोडं सोडवायचा प्रयत्न केला आहे. वायू प्रदूषणात होत असलेली वाढ दक्षिण आशियाई भूभागाच्या तापमानात घट होण्यास कारणीभूत आहे असं त्यांच्या निदर्शनास आलं आहे. दरम्यान हिन्दी महासागराचं तापमान  मात्र वाढतंय आणि मग भूभाग आणि सागराच्या तापमानात जे अंतर असायचं ते नाहीसं होत चाललं आहे. हे भूभाग आणि सागराच्या तापमानातलं नाहीसं होत जाणारं अंतर मोसमी पावसाच्या नैसर्गिक क्रियेत अडथळा बनून त्याला क्षीण करतंय. हिन्दी महासागरातल्या पाण्याची वाफ त्याच्या तापमानाच्या वाढीमुळे अवश्य होतेय, पण हा वाफेच्या रुपातला पाऊस दक्षिण आशियाई प्रदेशावर वाहून न आणला जाता तो सागरातच पडतोय.

याशिवाय, दक्षिण आशियाई मान्सूनवर अल निनोचा आणि मागील कित्येक दशकांतील प्रशांत महासागरावरील हवामानाच्या वैविध्यामुळे होणार्‍या दोलायमान स्थितीचाही प्रभाव असतो. भारतातल्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासातून आढळून आलंय की १९७०च्या दशकात प्रशांत महासागरावरील हवामानाच्या व्युत्क्रमामुळे (इन्व्हर्शन) निर्माण झालेली स्थितीही मोसमी पावसाच्या आगमनाचा काल पुढे ढकलतेय. तेव्हापासून अल निनोच्या तीव्रता आणि वारंवारितेमुळे पावसाचं आगमन १ जून ऐवजी ५ जूनच्या आसपास होतंय. तसंच हा मोसमी पावसाळा १९७० च्या दशकापासूनच त्याच्या नेहमीच्या वेळेच्या कितीतरी पूर्वी माघार घेतोय. पावसाचं गेल्या काही दशकातलं उशीरा आगमन आणि नियोजित वेळेपूर्वीची माघार एकूण पावसाळ्याचे दिवस कमी करतेय आणि त्यामुळे जीवनदायी पर्जन्यमानाच्या सरासरीत विचार केला तर त्यात घट दिसतेय.

पावसाच्या पाण्याच्या या अनुपलब्धतेमुळे दक्षिण आशियाई प्रदेशात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या नासाच्या अहवालानुसार याचा परिणाम भूजलावर होऊन त्याच्या पातळीत, बर्‍याचशा देशात पण विशेषतः चीन आणि भारतात, मर्यादेपलिकडे घट होत असल्याचं दिसून आलं आहे.

लोकसंख्येत वाढ आणि उंचावणारे रहाणीमान यामुळे या देशांत पर्जन्यमानातली ही घट अधिकच भयावह ठरते. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार होतात हे माहीत होतंच पण आता हा प्रश्न केवळ काहींच्या आरोग्यापुरता मर्यादित राहिला नसून जर त्यामुळे पावसावर परिणाम होणार असेल तर तो जीवनाला ग्रासणारा असल्यानं त्याच्या निर्मूलनाकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

वायू प्रदूषण टाळण्याकरता तुम्ही हे नक्कीच करुन खारीचा वाटा उचलू शकाल: 

  • अनावश्यक विजेचा वापर टाळा - गरज नसताना दिवे, पंखे, उपकरणे बंद करा वातानुकुलन यंत्राचा वापर टाळा 
  • अन्नाची नासाडी टाळा, स्वयंपाकघरातला कचरा घरातल्या कुंड्यात/बागेतच जिरवा 
  • प्लॅस्टिक, कागद, काच, पत्राजन्य वस्तू फेकून देण्यापेक्षा त्या ते गोळा करणार्‍यांना द्या 
  • घरात जास्तीत जास्त नैसर्गिक उजेड आणि हवा खेळू द्या 
  • सौर उर्जेचा वापर जिथे शक्य असेल तेथे करा, अंगणातल्या आणि सामायिक वापराच्या ठिकाणच्या (उदा. जिना, व्हरांडा) दिव्यांना टाईमर लावा 
  • स्वच्छतेकरता पाण्याचा अतिवापर टाळा 
  • धुम्रपान टाळा 
  • खरेदीला जाताना कापडी पिशव्या सोबत बाळगा. प्लॅस्टिक पिशव्या नाकारा 
  • सतत वापरायच्या उपकरणांमध्ये पुनः प्रभारित होणार्‍या बॅटर्‍यांचा वापर करा 
  • वाहनांच्या चाकात योग्य हवा, तेलजन्य पदार्थ असल्याची खात्री करा 
  • वाहन थांबवल्यानंतर ते बंद करा 
  • जेथे चालत जाणे शक्य असेल तेथे वाहनाचा वापर टाळा, शक्य तेथे सार्वजनीक वाहनांचा वापर करा, एकत्र प्रवास करा 
  • दर सुटीला स्वतःचे वाहन काढून सहलीला जाण्याचे टाळा, त्यापेक्षा घरी बसून वाचन करा 
  • कामाच्या वेळा लवचिक करण्याचा विचार करा ज्यायोगे गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल
---------------------------------------------------------------
हा लेख इ-साहित्य दरबारच्या 'दीपोत्सव-२०१५ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला.