रासायनिक उद्योगांमध्ये खनिज तेलाला पर्याय म्हणून वनस्पतींपासून मिळवलेल्या तेलांकडे मोठ्या आत्मीयतेनं पाहिलं जात आहे. त्याची मुख्य कारणं दोन: खनिज तेलाचा मर्यादित साठा आणि दुसरं म्हणजे त्याच्या अति वापरामुळे प्रदूषणाची उंचावणारी पातळी. अमेरिकेनं हल्लीच खनिज तेलाचं मोठ्या प्रमाणात देशांतर्गत उत्पादन सुरु केल्यामुळं त्याचे बाजारभाव सध्या तरी आटोक्यात आहेत. नाहीतर वाढते भाव हे ही एक महत्वाचं कारण होतं. प्रदूषणाचे चटके मात्र आता सगळ्यांनाच जागतिक तापमानवाढीच्या स्वरुपात जाणवू लागले आहेत. १०-१५ वर्षांपूर्वी जेव्हा वैज्ञानिक याची शक्यता ओरडून सांगत होते तेव्हा ते विनोदानं, उपहासानं आणि तुच्छतेनं ऐकलं जायचं. आता मात्र अति पाऊस पडणे, अवेळी पडणे, अजिबात न पडणे, हवेत सतत उकाडा हे नित्याचंच झालं आहे आणि त्यामुळे हा विषय सामान्य माणसापासून ते जगाचं राजकारण करणार्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडी आहे आणि म्हणून वनस्पती तेलांकडे एक अक्षय आणि पर्यावरणाला अनुकूल असा स्त्रोत म्हणून पाहिलं जात आहे. औद्योगिक विकासाची कास ज्या राष्ट्रांनी गेल्या काही दशकात धरली तेथे शेती उद्योग कमी होत गेला. जर वनस्पती तेलं उद्योगांसाठी कच्च्या मालाचा स्त्रोत म्हणून उदयाला आली तर शेती उद्योगालाही पुनः महत्त्व प्राप्त होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं मानलं जातं. वनस्पती तेलांमधल्या मेदाम्लांचा वापर आजही साबण, सौंदर्य प्रसाधनं, वंगण, शाई, विरलतकं (diluent), वगैरे उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ही तेलं वापरुन पॉलिमर राळेची (रेझिन्सची) निर्मितीही होऊ शकते आणि म्हणून तो खनिज तेलाला पर्याय ठरु शकतो हे लक्षात आलेलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणात त्या शक्यता तपासून पाहाण्यासाठी संशोधन सुरु आहे. एकाच प्रकारच्या सेंद्रिय रेणूंची लांबलचक साखळी म्हणजे पॉलिमर. पॉलिमर्सचा वापर आज प्रत्येक मानवाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. वेगवेगळ्या स्वरुपात पॉलिमर्सपासून बनलेल्या वस्तूंचा वापर प्रत्येकजण करतच असतो. पॉलियुरेथेन्स (polyurethanes - PU) हा पॉलिमर राळेचा (रेसिन) एक प्रकार. याचा वापर फर्निचर, गाद्या-उशा, वाहन उद्योग, बांधकाम, पादत्राणं, विविध प्रकारची उपकरणं (appliances), तसंच लेपांमध्ये (रंग, रोगण (वॉर्निश)), चिकटद्राव (adhesives), भेगा आणि छिद्र बुजवायला (sealants), रबरासारख्या लवचिक गुणधर्म (elastomers) असणार्या वस्तू बनवायला केला जातो. चिकटपणा, मूळ वस्तूवर ओरखडे न येऊ देणं, पाणी आणि आम्लासारख्या वहनशील द्राव्य वस्तूंचा मूळ वस्तूवर परिणाम न होऊ देणं, धातूंच्या वस्तूंवर गंज न चढू देणं हे पॉलियुरेथेन्सचे महत्त्वाचे गुणधर्म.