मलमपट्टी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मलमपट्टी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २० जुलै, २०२२

मलमपट्टी / Bandage

त्वचा पंचज्ञानेंद्रियांपैकी एक अतिशय संवेदनशील इंद्रिय. सगळ्या शरीराला झाकणारे आणि बाहेरील वातावरणापासून शरीराला संरक्षण देणारे. याला जखम झाली तर उपचारांची आवश्यकता असते, शरीरातील यंत्रणाच त्याकरता कार्यरत होते आणि चार टप्प्यात ती बरी करण्याची क्रिया घडते. प्रथम होणारा  रक्तस्त्राव थांबवला जातो, मग जखमेमुळे झालेली दाहकता आणि सूज याला आळा घालण्याचा प्रयत्न होतो आणि शेवटी ती भरली गेली की तो भाग पूर्ववत तुकतुकीत करुन आसपासच्या त्वचेशी मिळता-जुळता केला जातो. जखम बरी करण्यासाठी बाह्य उपचारही करावे लागतात. ज्यामुळे संसर्ग टाळणे, होणारी जळजळ थांबवणे आणि ती लवकरात लवकर बरी करणे याकरता योग्य तर्‍हेची मलमपट्टी (ड्रेसिंग) करावी लागते. योग्य मलमपट्टी कशाला म्हणायचे? तर ज्यामुळे जखमेतून होणारा अतिरिक्त स्राव थांबायला मदत होते, बाहेरच्या सूक्ष्मजीवांपासून होणार्‍या संसर्गाला आळा निर्माण होतो, विषजन्य पदार्थांपासून तिचे संरक्षण होते आणि ती लवकरात लवकर भरुन येऊन त्वचा पूर्ववत होते त्यासाठी करावा लागणारा उपचार म्हणजे मलमपट्टी. सध्या तीन हजारांवर मलमपट्ट्यांचे प्रकार बाजारात अस्तित्वात आहेत! पण त्यांचा उपयोग मधुमेहामुळे चिघळलेल्या जखमा, दाबामुळे निर्माण झालेले फोड (अल्सर), भाजल्यामुळे आलेले फोड, शिरा फुटून झालेल्या जखमांना पूर्ण बरे करण्यात बर्‍याचदा अयशस्वी ठरतो कारण त्यात ऑक्सिडीकरणरोधी आणि दाहरोधी गुणधर्मांचा समावेश असतो. यामुळे जखमेचा भाग सतत कोरडा पडतो आणि अशा मलमपट्ट्या वारंवार बदलण्याची गरज भासते. ड्रेसिंगचे कार्यात्मक गुणधर्म सुधारण्यासाठी, त्यात मोठ्या स्तरावर संशोधन चालू आहे. त्यांच्या रचनेत बदल केले जात आहेत, नैसर्गिक तसेच कृत्रिम बायोअ‍ॅक्टिव्ह एजंट्सचा समावेश देखील केला जात आहे. जंतूनाशकांचा समावेश केलेल्या मलपपट्ट्याही उपलब्ध आहेत. पण वाढत्या वापरामुळे बॅक्टेरियाच्या प्रतिकारशक्तीचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आल्याने शक्यतो अशा मलमपट्ट्यांचा वापर टाळणेच श्रेयस्कर. ऑर्किड, झेंडू यासारख्या काही वनस्पतींचे अर्क ऑक्सिडीकरणरोधी आणि दाहरोधी कामांसाठी वापर करणे शक्य असले तरी त्याला अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता नाही कारण त्याच्या इतर परिणामांचा अभ्यास अद्याप झालेला नाही. इतरही पदार्थांचा उपयोग करण्याचे प्रयत्न चालू आहेत. किंमत, वापराबाबतची मान्यता, त्याचे दुष्परिणाम वगैरेचा विचार करत जखम बरी करणार्‍या एजंट्सची वानवाच आहे म्हणले तरी चालेल. अशा पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या काही संशोधकांनी आजीबाईचा बटवा हाती घेतला आणि त्यातले घरगुती पदार्थ मलमपट्टीत वापरुन यशस्वीरित्या प्रयोग केला त्याचा हा वृत्तांत.

रेखाचित्र: मालमपट्टीचे विविध भाग आणि त्याकरता वापरलेले साहित्य 

त्यांनी काही जैवसाधनांच्या मिश्रणांचा वापर करून, परवडणारी, त्वचेवर लावायची पट्टी विकसित केली आहे. ही पट्टी दोन स्तरीय आहे (रेखाचित्र). बाहेरील थर हा पॉलिकॅप्रोलॅक्टोन (पीसीएल) आणि चिटोसान नावाच्या पदार्थाचा बनला आहे (चिटोसान प्रामुख्याने खेकडे, शंख-शिंपले, झिंगे, कोळंबी यासारख्यांच्या बाह्य कवचात असते) तर खालचा थर पॉलिव्हिनील अल्कोहलमध्ये अंड्याच्या कवचाखालच्या अस्तरातले विद्राव्य प्रथिन आणि हळदीचे अतिसूक्ष्म (नॅनो) कण यांच्या (पीव्हीए) मिश्रणाने तयार केला आहे. ही पट्टीही दोन पद्धतींनी बनवली गेली. पहिल्या प्रकारात एकावर एक असे दोन थर जोडले तर दुसर्‍या प्रकारात या मिश्रणांची विद्युत-कताई करुन बनवली गेली. पीसीएलची उपयुक्तता त्याच्या जलविरोधी, जैवनुरुप (बायोकॉम्पॅटिबल), जैव-विघटनीय बहुवारिक (पॉलिमर) गुणधर्मांमुळे वाढते म्हणून त्याचा ऊती अभियांत्रिकी अनुप्रयोगातही मोठ्या प्रमाणावर वापर होतो. चिटोसान त्याच्या जिवाणूरोधी, जैव-विघटनीय गुणधर्मांमुळे जखम भरुन यायला उपकारक ठरत असल्यामुळे त्याचा वापर केला जातो. पीव्हीएचा कुठल्याही पृष्ठभागावर चिकटून न राहण्याचा, पण पृष्ठभागाला दमट ठेवत त्वचेतून बाहेर पडणारे द्रव शोषून घेण्याचा गुणधर्म तर पीसीएल-चिटोसानचा जलविरोधी आणि सूक्ष्मजीवांना अडथळा करण्याचा गुणधर्म जखमेला लवकर भरुन यायला मदत करतो. हळद ऑक्सिडीकरणरोधी, जिवाणूरोधी आणि सूजरोधी गुणधर्मांमुळे उपयोगी पडते तर अंड्याच्या कवचाखालच्या अस्तरातले प्रथिन जखम भरुन यायला मदत करते. हे अस्तर मानवी त्वचेच्या उतींसारखेच असते. त्यामुळे ते अलग करणे तसे अवघडच. पण त्याला सेंद्रिय द्रावकात विरघळवता येते. अशा विद्राव्य अवस्थेत त्याचे गुणधर्मही बदलत नाहीत आणि त्याचा वापर करणे सोपे होते. मुख्य म्हणजे या सगळ्या पदार्थांच्या वापराला अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता आहे.

दोन्ही पद्धतींनी (दोन थर एकावर एक जोडून आणि मिश्रणांची विद्युत-कताई करुन) बनवलेल्या या पट्ट्यांचा कितपत उपयोग होतो याचा पडताळा प्रयोगशाळेतल्या पात्रांमध्ये आणि प्रत्यक्ष उंदरांच्या जखमांवर त्या लावून केला गेला आणि संशोधकांना आढळून आले की या पद्धतीने बनवलेल्या मलमपट्ट्यांमुळे आज बाजारात उपलब्ध असलेल्या पट्ट्यांपेक्षा जखमा लवकरात लवकर भरुन येतात. दोन पद्धतींनी तयार केलेल्या पट्ट्यांमध्ये मिश्रणांची विद्युत-कताई करुन केलेल्या मलमपट्ट्या अधिक उजव्या ठरल्याचेही त्यांना आढळून आले. सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी, सहज ओढून काढता येणारी, तसेच सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक आणि जैवपदार्थांचा अधिकाधिक वापर करुन अशी मलमपट्टी बनवण्यात हे संशोधक यशस्वी ठरले आहेत. चिघळलेल्या जखमांमुळे अनेक दिवस टिकून राहाणारी सूज आणि त्याबरोबर उद्भवणारा जिवाणूंचा संसर्ग जखम बरी करायला खूप वेळ घेतो. अशा परिस्थितीतही या पट्ट्या उपयुक्त ठराव्यात असा या संशोधकांचा दावा आहे कारण सूज यायला कारणीभूत ठरणारा अतिरिक्त स्राव थांबवायची क्षमता त्यांच्यात आहे. या यशानंतर संशोधकांनी आता या मलमपट्ट्यांची चाचणी मधुमेहामुळे झालेल्या आणि इतर जुनाट जखमांवर करण्याची योजना आखली आहे. 

पट्ट्यांची निर्मिती करण्यासाठी वापरलेली सामग्री सहज उपलब्ध असल्याने, बाजारपेठेसाठी व्यावसायिक उत्पादनाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जाऊ शकते. फक्त दोन मिलिमीटर जाडीच्या या लवचिक मलमपट्ट्या कोणत्याही आकारात तयार केल्या जाऊ शकतात म्हणून त्याचा वापर लहान-मोठ्या आकाराच्या आणि त्वचेवर कुठेही झालेल्या जखमांसाठी करता येऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.

मोठ्या आकाराची पट्टी आभार : आयआयटी, मुंबई

माझ्या एका मित्रावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया काही वर्षांपूर्वी यशस्वीरित्या पार पडली. त्या दरम्यानच्या आलेल्या अनुभवांच्या आठवणीचे एक पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे (पुनर्जन्म - मंगला ढवळीकर). त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांचे ड्रेसिंग किती काळजीने केले जायचे याचा अनुभव त्यात विस्तृतपणे मांडला आहे. अशा मलमपट्ट्यांचा उपयोग अशा गंभीर आजारांसाठी केलेल्या शस्त्रक्रियांदरम्यान घेतलेल्या मोठ्ठ्या छेदांना लवकरात लवकर आणि इतर गुंतागुंतींशिवाय उतार पडण्यासाठी होईल याची आठवण मला हा लेख लिहिताना झाली.

संदर्भ:‌Pillai MM, et al. Novel combination of bioactive agents in bilayered dermal patches provides superior wound healing. Nanomedicine: NBM. 40; 2022; Article ID 102495. https://doi.org/10.1016/j.nano.2021.102495

-------------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या २० जुलै २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.