शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

स्वच्छ भारतासाठी उपकरणांबरोबर संवादाचे महत्त्व/ Achieving clean cities through dialogue

२०१९ साली भारत सरकारने राष्ट्रीय शुद्ध वायू कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. ज्या शहरांमध्ये वातावरणातल्या हवेची गुणवत्ता मानकाच्या तुलनेत खालावलेली आहे तेथे हवेतील २.५ पीएम जाडीच्या धूळसदृश कणांचे मापन करुन २०२४ पावेतो त्याचे प्रमाण किमान २० ते ३० टक्के घटवायचे हा कार्यक्रम ठरवला गेला. पण मागे वळून पाहता गेली तीन वर्षे वायाच गेली असे म्हणायला हरकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे वायूची गुणवत्ता तपासण्यासाठी लागणारी आवश्यक तितकी उपकरणेच उपलब्ध करुन दिली गेली नाहीत. ४००० उपकरणांची गरज (किमान १६००) असताना केवळ ८८३ उपकरणे सध्या उपलब्ध करुन दिली आहेत आणि यातली केवळ २६१ सभोवतालच्या हवेच्या गुणवत्तेचे निरंतर निरीक्षण करु शकणारी आहेत. ही उपकरणे महागडी आहेत असे कारण सांगितले जाते. हवेतील कण-प्रदूषणामुळे होणार्‍या फुफ्फुसाच्या आजारपणामुळे किती जणांच्या आयुष्याची दोरी लहान होते, ते हिरावले जाते त्याचा हिशोब येथे केला जात नाही. कारण महामारीसारखे हे रोगी एकदम मरण पावत नाहीत त्यामुळे बातम्यात ते न आल्यामुळे सरकारची छी-थू होत नाही. अशी परिस्थिती असताना हे प्रदूषण कसे कमी होणार? २०२१ मध्ये दिल्ली आणि सलगच्या प्रदेशांमध्ये वायूच्या गुणवत्तेचे मूल्यमापन आणि व्यवस्थापन करणार्‍या दुसर्‍या एका शासकीय कार्यालयाने प्राप्त परिस्थितीत स्वस्त (कमी-किमतीचे) संवेदक (सेंसर्स) वापरावेत असा सल्ला दिला पण त्यावरही अचूकतेबद्दल शंका काढत अद्याप निर्णय घेतलेला नाही म्हणे. अर्थात माहितीत अचूकता ही असायला हवीच आणि त्याकरता उपायही आहेत. केवळ हातावर हात बांधून बसणे हा पर्याय नव्हे.  

स्वस्त संवेदक

दरम्यान आयआयटी कानपुरच्या संशोधकांची मदत घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२०-२१ दरम्यान मुंबईत असलेल्या ४० महागड्या संवेदकांशेजारी असे स्वस्त संवेदक बसवून त्यांच्या अचूकतेबद्द्लचा आढावा घेतला. या अभ्यासाअंती संशोधकांच्या असे निदर्शनास आले की हे स्वस्त संवेदक महागड्या संवेदकाच्या तुलनेत साधारणपणे ८०-९०% अचूक संवेदन करु शकतात. या अभ्यासादरम्यान आणखी एक सकारात्मक बाब समोर आली की या स्वस्त संवेदकांद्वारे नेमक्या कुठल्या वेळी सर्वाधिक प्रदूषण आहे हे कळू शकते. बंगळूरुच्या दुसर्‍या एका संस्थेने यांच्या अचूकतेचा अभ्यास केला आणि त्यांनी असे नजरेस आणले की या स्वस्त संवेदकांकडून मिळणारी गुणात्मक माहिती बर्‍यापैकी महागड्या संवेदकाशी मिळती-जुळती आहे पण संख्यात्मक माहितीत मात्र मोठा फरक पडतोय.

आयआयटी, कानपुरच्या संशोधकांनी आता चेन्नै, जयपुर, गुवाहाटी आणि इतर शहरी भागांमध्ये तेथील हवेतील प्रदूषणाचे मापन करण्याकरता अशी स्वस्त उपकरणे (महागड्या उपकरणांच्या जोडीने) लावली आहेत. पण केवळ उपकरणे लावून प्रदूषण कमी होणार नाही याची त्यांना कल्पना आहे. उपकरणांचा उपयोग प्रदूषण नेमके कशामुळे, केव्हा आणि कुठे होते हे कळण्यासाठी. पुढची पायरी महत्त्वाची. ज्यामुळे हे प्रदूषण होत आहे त्याकरता जबाबदार अशा समाजात जागरुकता आणून त्याला आळा घालण्याचे प्रयत्न महत्त्वाचे. नुसते महत्त्वाचे नाही तर ते चिवटपणे राबवावे लागतात, त्यात सातत्य असावे लागते. एका रात्रीत समाज त्यांच्या वागण्याच्या पद्धतीत बदल करीत नाही. याकरता या प्रकल्पाअंतर्गत उपकरणे बसवण्याबरोबर प्रत्येक शहरात वीस-वीस जणांचा 'स्वच्छ हवा मार्गदर्शकांचा' एक गट प्रशिक्षित करुन पाठवला. या प्रकल्पाच्या परिणामाचे अवलोकन केल्यावर आता अनेक शहरांत अशी स्वस्त उपकरणे बसवण्याचा कल वाढला आहे असे म्हणतात. स्मार्ट शहर मोहिमेअंतर्गत अनेक शहरांमध्ये ही स्वस्त उपकरणेच प्रदूषणाचे मापन करतात. नुसते मापनच नाही तर कोणत्या वेळी (हॉट-स्पॉट) आणि कशामुळे प्रदूषणाचा अतिरेक होतोय त्याचा मागोवा त्यातून ते घेतात. मध्य प्रदेशातील २० लाख वस्तीच्या इंदूरसारख्या शहरात केलेल्या प्रयोगाची माहिती मिळाली आहे. इंदूरमध्ये एकूण १९ उपकरणे कार्यरत आहेत आणि असे दिसून आले की तेथे एकूण तीन कारणांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी वायूप्रदूषण होत आहे. व्यावसायिक क्षेत्रात वाहनांच्या वर्दळीमुळे, औद्योगिक क्षेत्रात कचरा निर्मितीतून तर निवासी भागात जैवइंधन जाळण्यामुळे. एखाद्या शहरातले प्रदूषण हे एकाच कारणामुळे होते आणि त्यावर एकच एक उपाय लागू करुन ते कमी करता येईल असे नसते असा धडा यातून त्यांना मिळाला. मग त्यांनी त्या गटाचा उपयोग, विशेषतः नागरी वस्त्यांमध्ये ज्यांना या प्रदूषणाची कल्पनाच नाही, समाज जागृतीसाठी केला. 

जागृतीदरम्यान चौकात लाल दिवा लागल्यावर जेव्हा वाहनांची दाटी होते तेव्हा तेथे "लाल बत्ती चालू, वाहनाचे इंजिन बंद" अशी मोहीम राबवली. वाहन चालकांना असे आवाहन करुन त्यांनी हे सिद्ध केले की या छोट्याशा कृतीतून प्रदूषणात सुमारे २० टक्के घट होऊ शकते! स्वच्छ हवा मार्गदर्शकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे झालेल्या अशा दृष्य बदलातून समाजाचाही सकारात्मक प्रतिसाद वाढला. इंदूरातली हवा कोरडी असते. आर्द्रतेचे प्रमाण नगण्यच. गावातील नागरिकांना घरासमोरचे अंगण झाडण्यापूर्वी सडा घालून झाडायला शिकवले त्यामुळे धुलीकणांचे हवेतील प्रमाण कमी झाले, कमी अंतरावर जायचे असेल तर वाहतुकीचा वापर करण्याऐवजी चालत जायला उद्युक्त केले गेले, शक्य तेथे बागा फुलवायला प्रोत्साहन दिले गेले. मार्गदर्शकांनी झोपडपट्ट्यांमध्ये कचरा जाळण्याच्या सवयीतही बदल घडवून आणला आणि खाण्याच्या टपर्‍यांमध्ये जैवइंधनाचा वापर कमी झाल्याचीही नोंद केली आहे.

संशोधकांनी आता आपला मोर्चा कमी लोकवस्ती असलेल्या गावांकडे वळवला आहे. त्यांना शहरे आणि गावांमधल्या प्रदूषणातला फरक समजावून घ्यायचा आहे. उत्तम प्रतीच्या संसाधनाअभावी हातावर हात बांधून बसण्यापेक्षा कमी प्रतीच्या स्वस्त उपकरणांचा वापर करुन समाजाच्या प्रशिक्षणाच्या प्रयत्नांतून बदल घडवून आणवून संशोधकांनी केलेले हे प्रयत्न खरोखरीच स्पृहणीय आहेत. उपकरणे केवळ माहिती देतात. त्याचा वापर करुन समाजमन आणि सवयी बदलण्यासाठी संवादच महत्त्वाचा असतो. स्वस्त उपकरणांसोबत स्वच्छ हवा मार्गदर्शकांचा सहभाग म्हणूनच मोलाचा ठरतो. 

संदर्भ: Padmanaban, D. Indian cities invest in low-cost air quality sensors. EOS. 103; 2022. https://eos.org/articles/indian-cities-invest-in-low-cost-air-quality-sensors

----------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या ९ नोव्हेंबर २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.





शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

आपले शरीर - एक क्लिष्ट यंत्र / Our body: A complex engine

र्वसाधारणपणे मानवाच्या शरीरातल्या पेशी पेशीद्रवाने (सायटोप्लाझम) व्यापलेल्या असतात. या पेशीद्रवात विविध कार्य करणारे प्रभाग (ऑर्गेनेल्स) तरंगत असतात. या तरंगणार्‍या प्रभागांपैकी एक लिपिडचे लहान-लहान थेंब (बुडबुड्यात लिपिड रेणूंनी भरलेल्या पिशव्या) असतात. याशिवाय पेशीचा केंद्रक (न्यूक्लियस) आणि केंद्रकाला नळ्यांसारख्या आकाराच्या जाळीने वेढलेले प्रभागही आढळतात ज्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात. यकृताच्या पेशींमधील लिपिडचे थेंब एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला मधून मधून चिकटतात आणि त्यांच्यात रेणूंची देवघेव होते. पण असे कोणत्या परिस्थितीत होते हे अद्याप माहिती नव्हते. जेव्हा प्राणी अन्न सेवन करतो तेव्हा किंवा त्यात एखाद्या जीवाणूचे संक्रमण (बॅक्टेरियल इन्फेक्शन) होते तेव्हा लिपिडचे थेंब एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला चिकटत असल्याच्या निष्कर्षाला आयआयटी, मुंबई आणि टीआयएफआरचे संशोधक त्यांच्या अवलोकनानंतर पोहोचले आहेत त्याचा हा वृत्तांत. रक्तातली लिपिड्सची पातळी कमी करण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होऊ शकेल असे त्यांचे मत आहे. जर रक्तातली लिपिड्सची पातळी वाढली तर त्यामुळे लठ्ठपणात वाढ होते, जी पुढे चालून मधुमेहाला आमंत्रण देते आणि यातून हृदयविकाराचा धोका वाढतो म्हणून हे संशोधन महत्वाचे.

रेखाचित्र स्रोत: https://researchmatters.in/news/lipid-travel-diary

थेंबातले लिपिड यकृतातून रक्तात कसे पोहोचते? जेव्हा व्यक्ती अन्न सेवन करते तेव्हा रक्तातले साखरेचे (ग्लुकोज) प्रमाण वाढते आणि इन्सुलिनच्या निर्मितीला प्रेरणा देते. इन्सुलिन किनेसिन नावाच्या प्रथिनाला (प्रोटीन) कार्यरत करत ते लिपिडच्या थेंबांना बांधून घेते. किनेसिन मग लिपिडच्या थेंबांना एंडोप्लाझमिक रेटिक्युलमजवळ घेऊन येते आणि  एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या कडांवर असलेल्या प्रथिनाला जोडले जाते. एकदा का ते जोडले गेले की लिपिडच्या थेंबातले लिपिड एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये ओतले जाते आणि त्या बदल्यात जिवाणूरोधी प्रथिने त्यातून घेऊन ते थेंब मोकळे होतात. या क्रियाही याच संशोधकांच्या  यापूर्वी लक्षात आलेल्या होत्या. पेशींमधल्या या क्रिया नेमक्या केव्हा घडतात याचे अवलोकन करणे ही बाब तशी अवघडच. मग प्रयोगासाठी त्यांनी उंदरांच्या यकृतातील पेशींचा वापर केला. यातील काही उंदरांना उपाशी ठेवले तर काहींना त्यांचे पुरेसे अन्न दिले होते. यानंतर या नैसर्गिक क्रियाकलापांचे अवलोकन करण्यासाठी संशोधकांनी उपाशी आणि खायला घातलेल्या उंदरांच्या यकृतातील एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे तुकडे घेऊन ते पातळ पापुद्र्याच्या स्वरुपात आणि त्याच यकृताच्या पेशीतले लिपिडच्या थेंबांचे दोन वेगळे नमुने तयार करीत त्यांचे सूक्ष्मदर्शकयंत्राखाली निरीक्षण केले तेव्हा त्यांना असे आढळले की उपाशी उंदरांतून घेतलेल्या नमुन्यात पापुद्र्याजवळ केवळ २० टक्के लिपिड थेंब चिकटलेले आहेत तर खायला घातलेल्या उंदरांच्या नमुन्यांमध्ये ८०% लिपिड थेंब त्या पापुद्र्याला चिकटले आहेत. यावरुन त्यांनी असा निष्कर्ष काढला की जेव्हा जीव उपाशी असतात तेव्हा त्यांच्या पेशीतले लिपिड्सचे सर्वाधिक थेंब पेशीद्रवात विखुरलेले असतात. या दरम्यान जर ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलमशी संयोग करुन त्यात लिपिड्स ओतत राहिले असते तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती कारण ते अतिरिक्त लिपिड्स रक्तात मिसळून हृदयापर्यंत पोहोचते झाले असते ज्याचे परिणाम भयानक होण्याची शक्यता वाढते.

संशोधकांनी आणखी एक प्रयोग केला. त्यांनी काही उंदरांना लायपोपॉलिसेकराईडचे इंजेक्शन दिले. यामुळे त्यांच्यात जीवाणूसंसर्ग झाला. याला तोंड द्यायला त्यांच्यातली प्रतिरोधक यंत्रणा सक्षम झाली. अशा उंदरांच्या यकृतातील एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि लिपिड थेंबांचे अवलोकन सूक्ष्मदर्शकाखाली केल्यावर त्यांना असे आढळले की सुमारे ७०% थेंब एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या पापुद्र्याला चिकटले आहेत. या अवलोकनातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की अधिकाधिक लिपिड थेंब एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला चिकटण्याचे कारण असे की त्यांना या जिवाणूसंसर्गाशी संघर्ष करायला आता प्रथिनांची गरज आहे. ही प्रथिने एंडोप्लाझमिक रेटिक्युलममधून मिळवण्याकरता ते त्याला चिकटले आहेत. याचा उपयोग ते आता जिवाणूंचा नायनाट करण्याकरता करतील.

एंडोप्लाझमिक रेटिक्युलमशी लिपिड थेंबांचा संयोग होण्याकरता फॉस्फॅटिक अ‍ॅसिड कार्यरत होत असल्याचे त्यांना या संशोधनादरम्यान आढळून आले. फॉस्फॅटिक अ‍ॅसिड हा शंकूच्या आकाराचा एक असामान्य लिपिड रेणू असून त्याचे कार्य या संयोगासाठी होणे ही एक निसर्गाने केलेली अफलातून किमया आहे असे म्हणायला हवे. लिपिड थेंब गोलाकार असतात आणि त्यांना सपाट पृष्ठभाग असलेल्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमशी जोडणे प्राकृतिक दृष्ट्या अवघड जाते. शंकूच्या आकाराचे फॉस्फॅटिक अ‍ॅसिडचे रेणू सपाट एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या पृष्ठभागावर दाब देऊ शकतात आणि थेंबांतून लिपिड त्यात सुलभतेने रिते करायला मदत करतात. या दरम्यान फॉस्फॅटिक अ‍ॅसिड किनेसिनसारख्या इतर प्रथिनांना स्त्रवतात आणि ही प्रथिने लिपिडच्या थेंबांना एंडोप्लाझमिक रेटिक्युलमशी बांधून ठेवायला आणि त्यातील पदार्थांचे स्थानांतरण करायला उपयोगी पडतात. 

जेव्हा या प्रभागांच्या बंधनात त्रुटी निर्माण होतात तेव्हा अल्झायमर आणि पार्किंसन्स सारख्या व्याधींचा जन्म होतो. संशोधकांना या दरम्यान त्यांनी केलेल्या प्रभागाच्या बंधनाची उकल अशा व्याधींवरील संशोधनासाठीही उपयोगी ठरावी असा विश्वास वाटतो. संशोधक यकृतातील पेशींमध्ये असलेल्या लिपिड थेंबांवर होणारे किनेसिनचे बंधन रोखण्यासाठी काय करता येईल याचा आता विचार करीत आहेत. त्यात जर यश आले तर लिपिड्सचे एंडोप्लाझमिक रेटिक्युलममधील आणि पुढे चालून रक्तात होणार्‍या याच्या वितरणावर ताबा ठेवला जाऊन लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार यावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल असा त्यांना विश्वास वाटतो.

एखाद्या व्याधीवर नियंत्रण आणायचे असेल तर त्याकरता आपल्या शरीरातल्या क्रिया त्यांच्या बारकाव्यांसकट समजावून घेणे आवश्यक ठरते. हे काम किती किचकट आहे हे वरील विवेचनावरुन समजून येतेच. आपल्या शरीरात अनेक क्रिया घडत असतात ज्यावर आपले नियंत्रण नसते. त्या क्रियांना समजावून घेणे हीच खरी प्राथमिकता!

संदर्भ: १) Manohar, G.M. The lipid travel diary. Research Matters. 2022. https://researchmatters.in/news/lipid-travel-diary

२) Kamerkar, S. et al. Metabolic and immune-sensitive contacts between lipid droplets and endoplasmic reticulum reconstituted in vitro. Proceedings of the National Academy of Sciences of the United States of America, 119(24); 2022; Article ID: e2200513119. https://doi.org/10.1073/pnas.2200513119

--------------------------------------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या २ नोव्हेंबर २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.





बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

ओझोन स्थिरतेकडे / Arresting Ozone Layer Dilution

पण अनेक आंतरराष्ट्रीय बैठकांदरम्यान झालेल्या करारांच्या बातम्या ऐकतो, वाचतो. या करारांचे पुढे काय होते ते मात्र अनेकदा कळत नाही. सामान्य नागरिक त्याबाबत अनभिज्ञ राहातात. विश्वाच्या कल्याणासाठी एकत्र येऊन सर्वांसाठी असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय बैठका होतात. काही विषय मोजक्या राष्ट्रांच्या हिताचे असू शकतात आणि ती श्रीमंत राष्ट्रे असतील तर येनकेनप्रकारे गरीब राष्ट्रांवर दबाव टाकला जातो. उदाहरणार्थ, हवामानात होणारा वैश्विक बदल हा श्रीमंत राष्ट्रांनी निसर्गाला ओरबाडून घेऊन व्यक्तीगत मौजमजेसाठी त्याचा वापर केल्यामुळे झालाय आणि त्याचा भार गरीब राष्ट्रांना अशा बैठकांमध्ये उचलायला सांगितला जातो असा एक समज आहे. काही अंशी तो खराही असेल. पण घराला आग लागल्यानंतर ती कुणी लावली यावर चर्चा करीत बसण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या परीने त्यातून स्वतः सुरक्षित कसे बाहेर पडायचे आणि जमले तर घर कसे वाचवायचे ही प्राथमिक जबाबदारी ठरते. एकाच घरातल्या कुटुंबीयांचे वेगवेगळे विचार असू शकतात आणि त्यामुळे अनेकदा कुरबुरी झाल्याचे आपल्याला दिसून येते. मग 'हे विश्वचि माझे घर' या उक्तीनुसार सगळ्या देशांनी बैठकीसाठी एकत्र आल्यानंतर सर्वांनी एकमताने निर्णय घेणे किती अवघड असेल याची कल्पना यावी. मतं-मतांतरे होतातच पण त्यातून मार्ग काढत पुढे जावे लागते. ओझोनला पडलेले खिंडार (ओझोन होल) हा असाच सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. 

छायाचित्र स्रोत: https://www.thequint.com/

पृथ्वीपासून साधारण १० ते ५० कि.मी. अंतरावर जो हवेचा थर आहे त्या भागाला स्थिरावरण (स्ट्रॅटोस्फिअर) असे म्हणतात. त्याठिकाणी वातावरणाची एक प्रकारची स्थिरता असते त्यावरुन हे नाव दिले गेले आहे. यातला एक थर ओझोन या वायूचा असतो. जसजसे स्थिरावरणात उंचीवर जाऊ तसतसे त्या भागाच्या तापमानात वाढ होत असल्याचे जाणवते. याचे कारण असे की तेथे असलेला ओझोन वायू सूर्याकडून येणार्‍या अतिनील किरणांना शोषून घेतो आणि वरील भागाचे तापमान वाढते. वातावरणात ओझोन तसा सूक्ष्ममात्रेनेच असतो. इतका नगण्य की एक कोटी कणात केवळ तीन कण ओझोनचे असतात. पण याचे कार्य मात्र महान आहे. सूर्याकडून येणार्‍या अतिनील किरणांना तो एखाद्या स्पंजासारखा शोषून घेतो आणि आपल्याला त्यापासून होणार्‍या अपायांना वाचवतो. पृथ्वीची ही ढालच म्हणा ना! सूर्याची ही किरणे पृथ्वीवर पोहोचली तर त्यापासून काही जीवांना भाजून नष्ट होण्याचा धोका आहे. आपल्या त्वचेला ही किरणे भाजून काढतात. त्यामुळे त्वचेचा कर्करोग (कार्सिनोमा, मेलानोमा) होण्याची शक्यता बळावते, रोगप्रतिकारशक्ती क्षीण होते, मोतीबिंदूंसारखे आजार तरुण वयातच होतात वगैरे. जीवांच्या पेशींतील डीएनएलाही ही क्षती पोहोचवू शकतात. डीएनए प्रत्येक जीवाची ओळख ठरवत असतो. 

मानवजातीच्या सीएफसीच्या (क्लोरोफ्ल्युरोकार्बन) अतिवापराने या ओझोनच्या स्तराला धोका पोहोचत असल्याचे काही वर्षांपूर्वी लक्षात आले आहे. या रेणूत तीन मूलद्रव्ये असतात - कार्बन, क्लोरीन आणि फ्लोरीन. आपल्या राहणीमानातून याचा वापर बेसुमार वाढला आहे. अगदी सामान्य प्लॅस्टीकच्या वस्तूंमध्येही याचे अस्तित्व असते आणि ते सावकाश हवेत मिसळत असते. शीतकरण यंत्रांचा वापरही आता सगळ्यांसाठीच नेहमीचा झाला आहे. घरात रेफ्रिजरेटर नाही अशी घरे आता भारतातही सापडणे विरळीच. त्याशिवाय कार्यालयातील, घरातील खोल्यांना वातानुकूलन यंत्रे बसवण्याची पद्धतही रुढ होत आहे. या यंत्रांतून आपण सगळेच सीएफसीचे उत्सर्जन करीत असतो. याशिवाय द्रवाचे सूक्ष्म तुषार फवारण्यासाठी, द्रावक म्हणून, फेस उडवण्यासाठी याचा वापर केला जातो. सीएफसी आणि इतर सदृश रसायने स्थिर, जड, बिनविषारी, ज्वलनशील नसलेली आणि उत्पादनासाठी स्वस्त असतात. पण हा वायू स्थिरावरणात शिरकाव करुन तेथील रासायनिक क्रियेमुळे ओझोनला मात्र 'खाऊन टाकत' त्याचा थर पातळ करुन टाकतो. सर्वसाधारणपणे या क्रियेमुळे ओझोनला खिंडार पडले आहे असा वाक्प्रयोग केला जातो. पण ते खिंडार नसून त्याचा थर पातळ करण्याची क्रिया घडते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी या संकटाची कल्पना शास्त्रज्ञांना आली आणि यावर उपाय करायला हवे, सीएफसीचा वापर मर्यादित व्हायला हवा यासाठी त्यावेळच्या शासनांवर दबाव येऊ लागला आणि हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर हाताळण्याची गरज भासली. १९८५ साली व्हिएन्ना येथील अधिवेशनात यावर बरेच चर्वितचर्वण झाले आणि १९८७ साली माँट्रियाल येथे यासाठी देशांनी सीएफसी, कार्बन टेट्राक्लोराईड (सीटीसी), हॅलॉन्स (ब्रोमिनेटेड फ्लोरोकेमिकल्स), मिथाइल क्लोरोफॉर्म आणि काही इतर ओझोन-कमी करणार्‍या पदार्थांचे उत्पादन आणि वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रत्येक देशाने जबाबदारी उचलण्यासाठी करार अंमलात आला. सुरुवातीला केवळ ४६ देशांनी यावर सहमती दर्शवली असली तरी आजमितीस एकूण १९८ देश यात सहभागी झाले आहेत. भारतासकट अनेक सहभागी देशांनी तेव्हापासून याचा वापर आणि उत्पादन कमी करण्याकरता पावले उचलली आणि "विश्वाने ओझोनच्या समस्येवर मात केली, आता हवामान बदलाच्या प्रश्नालाही हात घालता येईल" अशा प्रकारचा मथळा असलेली बातमी न्यूयॉर्क टाइम्सने २०१९ साली दिली. सावकाश, म्हणजे २०५० सालापर्यंत ओझोनचा थर १९८० दरम्यानच्या स्थितीत यावा अशी आशा सगळ्यांनाच आहे. कारण कमी झालेला ओझोन पुन्हा निर्माण व्हायला अनेक वर्षे जावी लागतात. याकरता भारताने केलेल्या कामगिरीची माहिती एका संशोधन लेखात आली आहे त्याचा हा गोषवारा.  

भारताने या करारावर स्वाक्षरी केल्यावर अशा रसायनांची यादी बनवली आणि त्याला असलेले पर्याय शोधून त्यांचे उत्पादन आणि वापर देशात कधीपर्यंत बंद करता येईल याचा आढावा घेतला. हॅलॉन्स २००१ साली, सीएफसी २००३ साली, सीटीसी आणि मिथाईल क्लोरोफॉर्म २०१० साली, मिथाईल ब्रोमाईड २०१५ साली आणि हायड्रोक्लोरोफ्ल्युरोकार्बन्स (एचचीएफसी) चा वापर २०३० पर्यंत बंद करण्याचे लक्ष्य ठरवले गेले. नंतर भारत सरकारने १९९५ साली कारखान्यांत या रसायनांच्या पर्यायांचा वापर करण्यायोग्य यंत्रसामग्री बदलण्याच्या उद्देशाने भांडवली वस्तूंवरील सीमा आणि उत्पादन शुल्क रद्द केले.  

देशात ओझोनला हानीकारक अशा घटकांचा वापर कमी करत अखेरीस ठरवलेल्या तारखेपर्यंत कायमचा बंद करण्यासाठी जे कार्य करायला हवे त्याकरता भारत सरकारने एक नियंत्रण कक्षच उघडला. याकरता लागणारे वित्तीय सहाय्य आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळवणे, त्याचे वाटप देशांतर्गत उद्योगांना करुन हानीकारक घटकांऐवजी इतर पर्यायांचा वापर करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री बदलण्याकरता करणे, देशांतर्गत या घटकांचे उत्पादन आणि उपयोग किती कमी झाले याची माहिती वेळोवेळी घेणे, योग्य असे कायदे करणे अशी जबाबदारी या नियंत्रण कक्षाकडे सोपवली गेली. हा कक्ष त्याची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडत असल्याचे दिसते. 

हे घटक वापरुन ज्या उपकरणांची, साधनांची निर्मिती केली जायची त्यामध्ये नाशिवंत पदार्थांची वाहतूक करणारे कंटेनर, तसेच त्यांची साठवणूक करण्यासाठी तयार केलेल्या गोदामांच्या भिंती, एका पाईपमध्ये आणखी एक पाईप घालून द्रवाचे तापमान अबाधित राखण्यासाठी पॉलीयुरेथेन फेसाचा (फोम) वापर केला जायचा. याकरता एचसीएफसी (हायड्रोक्लोरोफ्ल्युरोकार्बन) हा घटक वापरला जात असे. त्याला पर्याय म्हणून आता हायड्रोकार्बन्स, हायड्रोफ्ल्युरोकार्बन्स वगैरेचा वापर केला जात आहे. भारतात वातानुकूलन यंत्रे बनवणारे सुमारे दोनशे उद्योग कार्यरत आहेत. या यंत्रात सीएफसीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. आता ते पूर्णपणे थांबले आहे. शिवाय या उद्योगातील मिथिल क्लोरोफॉर्मचा वापरही सन २००० पासून पूर्ण थांबला आहे. याकरता सुमारे २०००० तंत्रज्ञांना नव्या तंत्रज्ञानाच्या वापराकरता प्रशिक्षितही केले गेले. सीएफसीचा वापर द्रवपदार्थाचा सूक्ष्म तुषाराचा फवारा उडवण्यासाठीही मोठ्या प्रमाणात केला जायचा. त्यालाही पर्याय देण्यात आला आहे. वैद्यकीय कारणांसाठी इनहेलर्स वापरतात त्याकरता, चपलांचे तळवे बनवण्याकरता, अशा सगळ्या प्रकारच्या उद्योगांमधून याचा वापर पद्धतशीरपणे खूप प्रमाणात कमी केला गेला आहे. २०१५ ते २०२० दरम्यान याची निर्मिती आणि वापराचे आकडे खूपच प्रमाणात कमी झाले आहेत. यात आपण अगदी चीनलाही मागे टाकले आहे.

भारताने याकरता आवश्यक असे निर्माण केलेले नियंत्रण, व्यवस्थापन आणि प्रशासन इतर विकसनशील देशांना आदर्शवत ठरावे. या घटकांचा वापर टप्प्याटप्प्याने कसा कमी करता येतो या संदर्भात त्याने जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. या नियंत्रण कक्षाने केलेल्या कामामुळे त्याला मॉन्ट्रियल करार अंमलबजावणी पुरस्काराने २००७ साली सन्मानितही करण्यात आले आहे. शासनाच्या भोंगळ कारभारावर आपण नेहमीच बोट ठेवत असतो त्याच्या पार्श्वभूमीवर या कार्याबद्दल मिळालेला मानाचा तुरा खरेच गौरवास्पद आहे आणि पृथ्वी वाचवण्यासाठी आपण उचललेला खारीचा वाटा समाधान देऊन जातो. 

Garima. India’s management and governance in protecting the stratospheric ozone layer. Current Science. 123(5); 2022; 635-641. https://www.currentscience.ac.in/Volumes/123/05/0635.pdf

--------------------------
हा लेख दैनिक हेराल्डच्या २६ ऑक्टोबर २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.