मंगळवार, ११ मार्च, २०१४

टायर वाचवा, प्रदूषण टाळा / Save tyres, save environment

भारतात दळणवळणाच्या साधनात गेली काही वर्षे वेगाने भर पडतेय. महानगरातच काय पण लहान लहान शहरातूनही अरुंद रस्त्यावर ट्रॅफिक जाम पहायला मिळतो. नव्या वाहनांची इंजिनं पूर्वीच्या वाहनांच्या मानाने कमी प्रदूषणकारी आहेत. सीएनजी सारख्या इंधनाचा वापर ते आणखी कमी करतो असं आढळलं आहे. पण एका महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष होतंय का काय, ते न कळे. या वाहनांना जे टायर्स लावले जातात त्याचं उत्पादनही वाहनांच्या वाढीच्या प्रमाणात वाढतंय. यांचं उत्पादन करणार्‍या संघटनेच्या माहितीनुसार २०१२-१३ साली सुमारे ९ कोटी २२ लाख टायर्सचं उत्पादन झालं. यातली सुमारे १४% ट्रक, बससारख्या अवजड वाहनांची टायर्स, २६% चार चाकी मोटारी, जीप्स यांची; तर ४८% दुचाकींची होती. उरलेल्या १२ टक्क्यात ७% वाटा पिकअप सारख्या वहानांचा आणि ४% ट्रॅक्टरांच्या टायर्सचा समावेश आहे. वाहन मालकाकडे या टायर्सची झीज झाल्यावर ती फेकून देण्याव्यतिरिक्त काहीही पर्याय नसतो. ती जिथे बदलली जातात तिथेच सर्वसाधारणपणे ती सोडली जातात. यांचं पुढे काय होतं याचा विचार कधीच केला जात नाही.


वापरलेल्या टायर्सची मग वेगवेगळ्या पध्दतीने विल्हेवाट लागायला सुरुवात होते. महानगरात आणि मोठ्या शहरात ती गोळा करून त्याचा कच्चा माल म्हणून वापर करणार्‍या कारखान्यांना पुरवठा होतो. पण हे सगळीकडे शक्य नसते. आणखी एक उपयोग सर्रास पहायला मिळतो तो म्हणजे मासेमारी करणार्‍या, खनिजं वाहून नेणार्‍या नौकांच्या कठड्याला तसंच या जिथे धक्क्याला लागतात त्या जागीही ती बांधलेली आढळतात. या नौका जेव्हा धक्क्यावर येतात तेव्हा त्या तेथे आदळून आघाताने त्यांचे आणि धक्क्याचे कठडे खराब होऊ नयेत म्हणून हे वापरले जातात. यातली बरीचशी टायर्स आगीच्या भक्ष्यस्थानीही पडतात. उत्तर भारतात रक्त गोठवून टाकणारी थंडी असते. बेघर जनतेला रात्रभर उब मिळेल अशा इंधनाची गरज असते. बराच वेळ, हमखास जळणारे आणि त्या मानाने विनाखर्चाचे इंधन म्हणून याकडे पाहिले जाते. याव्यतिरिक्त इतर अनेक कारणांसाठी - स्मशानात, रस्त्यावर डांबर घालताना ते वितळवण्यासाठी त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो त्याची आकडेवारी कुठेच उपलब्ध नाहीये.
आभार: U. Subramanyam, The Hindu मधून
याशिवाय दंगेखोरांकडूनही याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. पण आता याला चाप बसावा. कारण फेब्रुवारीत न्यायालयाचा एक निर्णय वर्तमानपत्रात बातमी देऊन गेलाय. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने सार्वजनीक ठिकाणी - जसं रस्त्यांवर, वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी निषेध व्यक्त करण्यासाठी - टायर जाळण्यावर बंदी आणली आहे. १४ वकिलांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाविरुध्द या न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. आतापावेतो टायर जाळण्यामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी कुठलाही कायदा नव्हता असं असिम सरोदे यांनी म्हणलं असल्याचं प्रसूत झालं आहे. या निर्णयानुसार स्थानिक पोलिसांवर याच्या कार्यवाहीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. हा गुन्हा करणार्‍यांवर आता न्यायाधिकरणाच्या कलम २६ नुसार गुन्हा दाखल करता येऊ शकतो आणि हा सिध्द झाल्यास दहा कोटी रुपयाचा दंडही ठोठावता येऊ शकतो. धुळ्यासारख्या तुलनेने लहान शहरातही याचा परिणाम जाणवतोय आणि तेथील सप्तर्षी जनसेवा फाउंडेशन सारखी सेवाभावी संस्था त्यासाठी लोकशिक्षणाचा प्रयत्न करतेय असं कळतं. नेपाळसारख्या निसर्गसुंदर देशात थंडीचे पाच महिने १० अंश सेल्सियस पेक्षा कमी तापमान असतं. तेथे वापरलेले टाकाऊ टायर्स सर्रास जाळले जातात. तेथील वैज्ञानिकांनी याच्या परिणामांचा केलेला अभ्यास प्रकाशित झाला आहे (अ‍ॅटमॉस्फिअरिक एनव्हायरन्मेंट, खंड ४२, २००८, पृष्ठ ६५५५-). त्यांचा आढावा आपल्याकरिताही चिंतनीय ठरावा.

टायर्स जाळल्यावर त्यातून जे वायू बाहेर टाकले जातात त्यात प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साईड (CO), सल्फर डाय ऑक्साईड (SO2) आणि नायट्रोजन डाय ऑक्साईड (NO2) असतात. त्यांनी त्यांच्या प्रयोगासाठी चार चाकी मोटारी आणि दुचाकीच्या टायर्सचे प्रत्येकी दोन-दोन नमुने वापरले. ते नावाजलेल्या आणि उत्तम कंपन्यांनी बनवलेले होते याची काळजी घेतली गेली. मोटारींच्या टायर्सपैकी एक चिनी बनावटीची तर एक कोरियन आणि दुचाकींच्या टायर्सपैकी एक भारतीय तर एक जपानी बनावटीची होती. या टायर्सच्या वेगवेगळ्या भागातले नमुने काढून ते प्रयोगशाळेत जाळले गेले आणि त्यातून बाहेर पडलेल्या वायूंची मोजदाद केली गेली. प्रत्येक प्रयोग तीन-तीन वेळा केला गेला ज्यायोगे प्रयोगजन्य त्रुटींचा परिणाम निष्कर्षात टाळता येणं शक्य झालं. त्यांना असं आढळून आलं की वेगवेगळ्या कंपन्यांच्या आणि वाहनांच्या (दुचाकी, चार चाकी) टायर्समधून वेगवेगळ्या प्रमाणात वायू बाहेर टाकले जातात. याचाच अर्थ असा की या कंपन्या जेव्हा टायर्स बनवतात, तेव्हा त्यातील पदार्थांच्या वापरात एकवाक्यता नसते. ते वेगवेगळ्या प्रमाणात वापरले जातात. यात कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण किरकोळ तर सल्फर डाय ऑक्साईड मात्र मोठ्याच प्रमाणात उत्सर्जित होत असल्याचं दिसून आलं. आणखी एक बाब त्यांच्या लक्षात आली ती अशी की हे वायू एकमेकांशी व्यस्त प्रमाणात होते. म्हणजे ज्या टायरमधून सर्वात कमी कार्बन मोनॉक्साईड निर्माण झाला त्या नमुन्यातून सर्वात जास्त सल्फर डाय ऑक्साईड वायू बाहेर टाकला गेला. नायट्रोजन डाय ऑक्साईडचं उत्सर्जनही मोजलं गेलं आणि तेही मध्यम प्रमाणात आढळून आलं. प्रयोगाच्या अखेरीस त्यांनी हे प्रमाण प्रत्येक टायरमागे त्याच्या वजनानुसार किती असेल याचा आढावा घेतला तो तक्ता हीक्र. १ मध्ये दिला आहे.

तक्ता १: प्रत्येक टायर जाळल्यानंतर होणारे विषारी वायूंचे (किलो ग्रॅम मध्ये) उत्सर्जन

वायू चार चाकी वाहनाचे टायर (वजन ६.५ किलो) दुचाकी वाहनाचे टायर (वजन २.५ किलो)
कार्बन मोनॉक्साईड (CO) १.८९x१०-४ ते ३.१९x१०-४ ५.००x१०-५ ते ५.२५x१०-५
सल्फर डाय ऑक्साईड (SO2) ४.४९x१०-३ ते ६.६०x१०-४ १.५३x१०-३ ते २.०५x१०-३
नायट्रोजन डाय ऑक्साईड (NO2) २.००x१०-५ ते ६.००x१०-५ १.५०x१०-५ ते १.६०x१०-६

टायरचं वजन ते कुठल्या वाहनाला वापरलं जातंय त्यावर अवलंबून असतं. उदा. ट्रकचं टायर प्रत्येकी ५२.५ किलो वजनाचं, तर पिक-अप सारख्या वाहनांच्या टायरचं वजन ११ किलो असतं (बेसल कन्व्हेन्शन - संयुक्त राष्ट्रसंघाची मार्गदर्शक तत्वं, २०१३). यावरून या वाहनांचाही एक टायर जाळला गेला तर किती प्रमाणात विषारी वायूंचं उत्सर्जन होईल याचा वरील प्रयोगावरून अंदाज करता येईल. अर्थात मुक्त वातावरणात हे टायर जाळले जातात तेव्हा त्याच्या ज्वलनशीलतेचं प्रमाण, सभोवतालचं तापमान, आर्द्रता या सगळ्या बाबींमुळेही विषारी वायुंच्या उत्सर्जनात फरक पडू शकतो पण त्याबद्दल फारसं संशोधन झालेलं नाहीये. त्यामुळे अर्थात हा अभ्यास इतकंच सांगतो की इतर कारणांमुळे होणार्‍या वायू प्रदूषणात टायर जाळून त्यात भर घालू नये. तेही बर्‍यापैकी असतं आणि ही टाळता येण्यासारखी बाब आहे.

या विषारी वायूत, सल्फर डाय ऑक्साईड हा वायू अ‍ॅसिड मिश्रित पाऊस पाडण्यास कारणीभूत ठरतो. याचं ढगात मोठ्या प्रमाणात ऑक्सिडीकरण होतं तर बराचसा वायू वातावरणात तसाच राहतो आणि दुसर्‍या ठिकाणी हवेबरोबर वाहून नेला जातो. नायट्रोजन डाय ऑक्साईड शहरी भागात धुकं पसरवण्यास कारणीभूत ठरतो आणि शेवटी ओझोनच्या निर्मितीला निमंत्रण देतो. याचंही सल्फर डाय ऑक्साईड सारखं ढगात ऑक्सिडीकरण होतं आणि नायट्रिक अ‍ॅसिडच्या निर्मितीस तो कारणीभूत ठरतो. अ‍ॅसिड मिश्रित पाऊस मंदगतीनं जलचरांच्या मृत्यूस उत्तरदायी ठरतोच पण जमिनीवरील वनस्पतीही यामुळे क्षतीग्रस्त होऊ शकतात. अ‍ॅसिड मिश्रित पावसाचा परिणाम प्रदूषण झालेल्या जागीच न होता शेकडो चौरस किलो मीटर परिसरात जाणवतो. म्हणून या विषारी वायूंच्या निर्मितीची सगळी लहान-मोठी स्त्रोतं (यात टायर जाळण्यामुळे होणारं प्रदूषणही आलं) मुळापासून उखडून टाकायला हवीत किंवा त्याची वाढ तरी होऊ देता कामा नये. सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरॉन्मेंट या सेवाभावी संस्थेने २००७ साली भारतातल्या मोठया शहरातून होणार्‍या सल्फर ऑक्साईडस आणि नायट्रोजन ऑक्साईडसच्या प्रदूषणाचा आढावा घेतला होता. त्यात त्यांना असं दिसून आलं की पश्चिम भारतातल्या शहरात भारतातल्या इतर शहरांच्या तुलनेत वातावरणातल्या नायट्रोजन डाय ऑक्साइडच्या पातळीच्या प्रमाणात फारसा फरक पडला नाहीये पण मुंबई, नागपुर, नासिक, पुणे आणि चंद्रपुर येथे मात्र ते वाढतं आहे. सल्फर डाय ऑक्साईडचं प्रमाण मात्र भारतात एकूणच काही शहरं वगळता मानकाच्या मर्यादेत आहे. महाराष्ट्रातील नासिक आणि चंद्रपुर ही शहरं मात्र अद्याप धोक्यातून बाहेर आली नाहीत. अर्थात टायर्सचं जाळणं हेच एकमेव कारण नाहीये (मुख्यत्वेकरून वाहनांमुळे होणारं प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे).

प्रदूषण कमी व्हायला हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण हे प्रदूषण कमी करण्यात सामान्य माणूस म्हणून आपला कसा हातभार लावता येईल हा प्रश्न वाचकाला नेहमीच भेडसावत असतो. बेसल कन्व्हेन्शनची मार्गदर्शक तत्वं यावर काही प्रकाश पाडतात ती अशी: जिथं चालत जाता येत असेल तिथे वाहन टाळायचं. शक्यतो एकत्र प्रवास (सार्वजनिक वाहनांनी, सामायिक) करायचा. टायरचं आयुष्य कसं वाढेल आणि त्यांना लवकर बाद करायची आवश्यकता भासणार नाही हे पहायचं यासाठी चाकात योग्य प्रमाणात हवेचा दाब, चाकांचं वेळोवेळी परीक्षण आणि देखभाल ही करायलाच हवी. जेव्हा एखादं टायर बाद होण्याच्या स्थितीस पोहोचतं तेव्हा ते रिट्रेडींग करणं शक्य आहे का हे तपासून पहायचं. हे सगळं करून झाल्यावर मात्र मग त्याची निकालात काढण्याची पाळी येते. याकरता सार्वजनिक व्यवस्था असणं गरजेचं आहे. नाहीतर ते जळणासाठी वापरलं जाण्याचीच शक्यता असते. अनेक उत्पादनांसाठी बाद झालेल्या टायर्सचा वापर कच्चा माल म्हणून केला जातो. त्याकरता लहान लहान शहरात ते गोळा करून अशा कारखान्यांपर्यंत ते पोहोचते करण्याची साखळी मात्र तयार व्हायला लागते. कृत्रिम गवत, खेळाचं मैदान, रुळाखालचे तळपाट (स्लिपर्स), कारखान्यांमध्ये जेथे घसरुन पडण्याची शक्यता असते तेथे अंथरायच्या तक्तपोशी, कंटेनरचे अस्तर, सरकते पट्टे, पादत्राणं, छतावरची कौलं त्यापासून बनवली जातात. शिवाय स्थापत्य अभियांत्रिकीत भराव घालायला, धूप होऊ नये म्हणून, उष्णता निरोधक वगैरे साठीही ते वापरतात. अर्थात हे करतानाही त्यापासून पर्यावरणाची काही प्रमाणात हानी होतेच आणि ती कमी करण्याकरता वेगळी यंत्रणा असते. त्याचा विचार वैयक्तिक पातळीवर करणे अशक्य असते. यातून आपण एकच बोध घेऊ शकतो तो हा की जोपर्यंत ते टायर आपल्या वापरात असेल तोवर ते चांगले, अखेरपर्यंत वापरूया आणि किमान ते जाळले न जाता त्याची योग्य तर्‍हेने विल्हेवाट लागेल याबद्दल शक्य तितके समाजभान जागे करुया.

हा लेख "शैक्षणिक संदर्भ" च्या ८८ व्या अंकात (जून-जुलै २०१४) पृष्ठ ५६-६१ प्रसिध्द झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा