बुधवार, २३ जून, २०२१

जगातील सर्वात भव्य भारतातल्या मृण्मयाकृतींचा (जियोग्लिफ्स) शोध /Largest ever geoglyphs found in India

वसुंधरेच्या पाठीवर इतर पदार्थ न वापरता मानवाने तयार केलेल्या वेगवेगळ्या रचना म्हणजे 'मृण्मयाकृती' (जियोग्लिफ्स) असे म्हणता येईल. म्हणजे असे की जमिनीवरील दगडा-मातीचा विशिष्ट भाग काढून टाकून किंवा त्याचाच भराव टाकून निर्माण केलेल्या आकृती. मूळ जमिनीवरच दृष्यमानतेच्या फरकातून या रचना निर्माण होतात. खडकावर रंगकाम करुन निर्माण केलेली चित्रं किंवा खडकांच्या पृष्ठभागावर ओरखडे उठवत, तासून आणि घासून काढत निर्माण केलेल्या कलाकृती शिल्पकला या सदरात मोडतात. भारतीयांना आजिंठा-वेरुळ सारख्या ठिकाणी अशी प्रस्तर चित्रं आणि शिल्पं परिचयाची आहेत. ती मृण्मयाकृतींहून भिन्न आहेत. एक तर ही शिल्पं, चित्रं माणसाच्या एका नजरेत मावतात, शिवाय त्यातून निर्माण झालेली कला ही बहुधा सजीवांची रेखाटनं करतात. मृण्मयाकृतींमधून निर्माण होणार्‍या आकृत्या बहुधा अमूर्त आणि भूमितीय स्वरुपाच्याच असतात, क्वचितच त्यात सजीवांचे रेखाटन केलेले आढळते. अशा आकृत्यांसाठी पृथ्वीवरील रखरखीत भागांची, पठारावर किंवा मैदानी प्रदेशाचीही निवड केलेली आढळते कारण तो भूभाग त्याच्या नैसर्गिक संरक्षणासाठी अनुकूल असतो. मृण्मयाकृतींचा आकार सुमारे चार मीटरहून अधिक असल्याने त्याचे अवलोकन करायला अशा ठिकाणी मोकळी जागा असते, इतर मानवी वस्तीपासून दूर असल्याने अडथळे निर्माण होत नाहीत. त्यांचे नैसर्गिकरित्याच जतन होते. काही मृण्मयाकृती तर अवाढव्य आकाराच्या आहेत ज्यांचे अवलोकन जमिनीवर उभे राहून एका नजरेत करणे केवळ अशक्य असते. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडात यांची संख्या अधिक्याने आहे. शिवाय युरोपात इंग्लंडमधला उफिंग्टन व्हाईट हॉर्स, आशियाई आणि आफ्रिकी खंडामधल्या अल्जेरिया, इजिप्त, लिबिया आणि इस्रायल देशात सापडलेल्या कलेलाही मृण्मयाकृतींचा दर्जा दिला गेला आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला उपग्रह वापरुन पृथ्वीचे नकाशे उपलब्ध करुन देणार्‍या 'गुगल-अर्थ' या आज्ञावलीमुळे अशा मृण्मयाकृती शोधणे सोपे झाले आहे. भारतीयांना यांची तेवढी जाण नाही. कारण त्या भारतात आतापावेतो आढळलेल्या नाहीत. एवढेच काय, हा शब्दही भारतीय भाषाकोशांत सापडत नाही!
आकृती १*. बोहा येथील मृण्मयाकृती (४.६ कि.मी. उंचीवरुन घेतलेले छायाचित्र).
१ ते ३ - समूहातले मुख्य घटक
एका फ्रेंच पिता-पुत्र मानववंशशास्त्रज्ञ जोडीला भारतातल्या थर वाळवंटातल्या अशा मृण्मयाकृतीचा शोध लागला आहे. त्याचे संशोधन त्यांनी नुकतेच प्रकाशित केले. हा शोध आम्हा भारतीयांना अतिशय अभिमानास्पद वाटावा असाच आहे कारण सापडलेल्या मृण्मयाकृती या जगातील सर्वात मोठ्या मृण्मयाकृती आहेत. यांनी या विशाल भारतीय वाळवंटाचा सुमारे २.५ चौरस कि.मी. इतका मोठा भाग व्यापला आहे. त्यावरील रेखांकने एका लांबीत मोजली तर सुमारे ४८ किलोमीटर इतकी भरतील! गुगल-अर्थमुळे १५ मीटर ते १५ सेंटीमीटर (सें.मी.) इतक्या बारकाव्याने (resolution) पृथ्वीच्या भूभागाचे निरीक्षण करता येते. त्यामुळे वैज्ञानिकांची मोठीच सोय झाली आहे. २०१४ सालीच गुगल-अर्थ वापरुन त्यांनी थर वाळवंटाचा सुमारे २८० चौरस किलोमीटर प्रदेश ७०० ते १८५० मीटर उंचीवरुन पिंजून काढला आणि त्यांना अनेक ठिकाणी लांबवर पसरलेल्या भूरेषा नजरेस आल्या, त्या मृण्मयाकृतीच असाव्यात असा त्यांनी अंदाज केला. ठिकाण निश्चितीनंतर त्यांना मानवरहित हवाई विमानाची (UAV) गरज भासली कारण भूपृष्ठाचे सुमारे ३०० मीटर उंचीवरुन निरीक्षण आणखी योग्य निर्णयाप्रत येण्यास मदत करते. यातून मिळवलेल्या भूभागाच्या छायाचित्रांचे सुमारे १२ मीटर अंतर एका सेंटीमीटर अंतरात (स्केल) संगणकाच्या पडद्यावर दिसू शकते आणि त्याचा उपयोग या रचनेचा व्यवस्थित आवाका येण्यासाठी करता येतो. या निरीक्षणाअंती जैसलमेर जिल्ह्यात त्यांनी एकूण आठ ठिकाणं निश्चित केली. त्यानंतर २०१६ साली त्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी पदभ्रमण केले. एकूण आठ ठिकाणांपैकी सात ठिकाणी त्यांना गेल्या काही वर्षात वनीकरणाच्या उद्देशाने खणलेले चर आढळले पण जैसलमेरच्या उत्तरेला ४१ कि.मी. अंतरावर बोहा ग्रामाजवळ मात्र त्यांच्या कष्टांचे चीज झाले. त्यांना भूपृष्ठावरील सुमारे १० सें.मी. खोल आणि २० ते ५० सें.मी. रुंद माती काढून बनवलेल्या मृण्मयाकृतींच्या अशा 'बोहा रांगा' आढळल्या. खणलेल्या भागाच्या आकार, रुंदी, पोत आणि रंगाच्या सलगतेवरुन त्या रांगा गुरेढोरे चरायला नेताना निर्माण झालेल्या इतर पायवाटांपासून त्यांनी अलग केल्या (आकृती १). यातील सर्वात मोठी एक अवाढव्य पण असमान आकाराची, अंड्याच्या आकाराची एकात एक अशी १२ चक्रांची पण अनेक ठिकाणी,
आकृती २*. बोहा-१ आणि बोहा २ ची मानवरहित विमानाने १०० मीटर उंचीवरुन घेतलेली आणि सुधारलेली हवाई प्रतिमा. अस्तित्वात असलेल्या मृण्मयाकृतीच्या रेषा काळ्या रंगात आणि वाळूच्या चादरीवरील पुनर्रचित रेषा पांढर्‍या रंगात

विशेषतः वाळूच्या चादरीवर भंगलेली, मृण्मयाकृती आढळली. भंगलेल्या ठिकाणांची प्रतिमेवर काळजीपूर्वक पुनर्रचना करत ती चक्रे पूर्ण केली तेव्हा तिची लांबी जवळजवळ १२.७ कि.मी. आणि रुंदी २०१ मीटर असल्याचे आढळले. पश्चिम दिशेला चक्रांच्या रेषांनी फुगवटा निर्माण केलेला तर पूर्वेला त्या पुरेशा सरळ आणि समान अंतरावर विभागलेल्या दक्षिणोत्तर दिशेने आढळल्या (आकृती २ - बोहा १). अंडाकृती मृण्मयाकृतीच्या कुशीत नैऋत्येला नागमोडी वळणे घेत गेलेला (आकृती २ - बोहा २) असा दुसरा सुमारे ११ किमी अंतराचा एका सलग रेषेचा भाग आढळला. याने सुमारे ८८००० चौरस मीटर क्षेत्र व्यापलेले होते. पुढे याचेच एक टोक एकमेकाला आकड्यासारख्या रचनेने जोडलेल्या २३ समांतर सरळ रेषांचा क्रम साधणारा मृण्मयाकृतीचा भाग आढळला. शेतकरी जमीन नांगरताना जसे नांगर सीमेवर पोहोचला की फाळ न उचलता वळून पुन्हा उलट नांगरणी सुरु करतो तशा या रेषा असल्याचे त्यांच्या नजरेस आले. याच्या शेवटच्या टोकाला एक खूणेचा दगडही आढळला. असाच एक खूणेचा दगड अंडाकृतीच्या शेजारीही असल्याची त्यांनी नोंद केली होतीच. या रचनांमध्येही काही रेषा भंगलेल्या होत्या. त्यांना योग्य तर्‍हेने समजावून घेण्याकरता त्या ठिकाणांची प्रतिमेवर काळजीपूर्वक पुनर्रचना केली गेली. बोहा-१ च्या ईशान्येला आणि बोहा-२ च्या नैऋत्येला अनुक्रमे बोहा-३ आणि बोहा-४ (आकृती १) असे आणखी काही समूह सापडले. येथेही सुमारे ४० ते २०० मीटर लांबीच्या सर्पाकृती रेषा असल्याचे दिसून आले. पण यांची मोठ्या प्रमाणात धूप झालेली असल्याने त्यांची पुनर्रचना करणे अशक्यच असल्याचे लक्षात आले. या समूहांच्या दोन्ही अंगांना अमूर्त रेषा (आकृती १,२ - अ आणि ब) काढल्या तर त्यांचा कोन १३ अंश असेल असे या संशोधकांच्या लक्षात आले (क्षितिजांशाचा - अझीमुथचा - उत्तर दिशेने मोजलेल्या निरीक्षक ते क्षितिज यामधली रेखा आणि निरीक्षक ते आकाशातील ग्रह-तारे यांच्यामधल्या रेखेचा - कोन १३ अंशाचा असतो). समूह ३ च्या ईशान्येला थोड्या अंतरावर आणखीही काही समूह (आकृती १, बोहा-५ ते ७) असल्याचे दिसते. 

संशोधकांनी या मृण्मयाकृती केव्हा निर्माण केल्या गेल्या याचेही अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. याच्या आसपासच्या भागात उगवलेल्या हिरवळीवरुन त्याचा प्राथमिक आडाखा सर्वसाधारणपणे बांधला जातो. पण या वाळवंटी प्रदेशात अतिशय सावकाश वाढणारी आणि ती गुराढोरांकडून प्रमाणाबाहेर खाल्ली जात असल्याने त्यांना अनुमान बांधणे अशक्य झाले. तरीही या वाळवंटी फरसबंदीवर काही प्रमाणात वाढणार्‍या गवतामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरचा खडकाळपणा कमी करुन मातीचा पोत सुधारल्याचे त्यांच्या नजरेस आले. वाळूच्या चादरीवरही त्यांना वनस्पतींची वाढ दिसून आली. या प्रदेशात सुमारे तीस लहान झुडूपे दिसली, परंतु त्यापैकी एकही मृण्मयाकृतींवर नव्हते. दुसरा मार्ग म्हणजे जमिनीच्या पापुद्र्याच्या परिस्थितीचे अवलोकन. मृण्मयाकृती करताना उखडला गेलेला भाग पुनर्स्थापित व्हायला किती दिवस लागतात यावरुन अनुमान बांधता येते. पण येथे त्याचीही अनेक ठिकाणी वावटळींमुळे धूप झाल्याचे आढळले. एकूण या मृण्मयाकृतीच्या निर्माणाचा अंदाज बांधणे संशोधकांना अवघड जात असल्याचे ते नमूद करतात. तरीही या मृण्मयाकृती किमान दीडशे वर्षांपूर्वीच्या असाव्यात असा कयास शेजारी सापडलेल्या पुरातन कलाकृतींवरुन ते करतात. वैज्ञानिक कालनिर्धारण पद्धतींचा वापर आणि तेथील सांस्कृतिक घडामोडींचा इतिहास या माहितीत भर घालतील असे त्यांना वाटते.

थर वाळवंटातल्या मृण्मयाकृतींचे आकृतीबंध दोन-तीनच प्रकारात दिसत असले तरी त्यांची काही वैशिष्ट्येही आहेत. मुख्य म्हणजे त्यांचा विशेषतः बोहा-१ आणि बोहा-२ चा प्रचंड मोठा आकार. यावर काम सुरु करण्यापूर्वी त्यांचा आराखडा तयार करणे आणि त्याबरहुकूम त्या प्रत्यक्षात आणणे हे एक मोठेच आव्हानात्मक काम असल्याचे संशोधकांना वाटते. याच्या निर्मितीसाठी उत्तम गणितीय आणि भूमितीय ज्ञान असलेल्या व्यक्तींचा सहभाग आणि मृण्मयाकृतींचे शेजारी असलेल्या खूणेच्या दगडांवरुन याचे नियोजन अतिशय पद्धतशीरपणे केले गेले असले पाहिजे असे ते सुचवतात. मात्र यांच्या निर्मितीमागची प्रेरणा कोणती असावी याबाबत अनभिज्ञता आहे. एवढ्या प्रचंड आकाराच्या कृतीचे निर्माण कशाकरता केले गेले असावे यावर प्रकाश टाकणे त्यांना अशक्य वाटले. ७२४ मीटर लांबीच्या मोठ्या चक्राचा आकार अद्याप ज्ञात असलेल्या कुठल्याही मृण्मयाकृतींपेक्षा प्रचंड मोठा असल्याचे ते नमूद करतात. आतापावेतो ज्ञात असलेल्या मृण्मयाकृतींमध्ये सर्वात मोठ्या तुर्गे (कझाकस्तान)च्या मृण्मयाकृती (४३६ मीटर लांबी) आहेत. म्हणून तुलनेने थर वाळवंटातल्या मृण्मयाकृती अवाढव्यच. नाझका (पेरू)च्या सर्वात मोठ्या चक्राकृतीपेक्षा बोहा-१ ही २.७ पटीनी मोठी आहे. थर येथील मृण्मयाकृतीत चक्राशेजारीच सर्पाकृती आणि नंतर नागमोडी वळणाच्या लांब सरळ रेषा यांची मांडणी तर एकमेव अशीच आहे पण त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत. या सगळ्या रेषांना सुरुवात आणि शेवट का? त्या एकमेकाला कुठेही छेदत का नाहीत? बोहा-१ ची मांडणी दक्षिणोत्तरच का? मृण्मयाकृतींना लागून काढलेल्या अमूर्त रेषांमध्ये १३ अंशाचाच कोन का? चक्राकार, सर्पाकार आणि बोहा-३, बोहा-४ समूहातील रेषांचा एकमेकाशी अर्थपूर्ण संबंध आहे का? 

भारतीय उप-खंडात प्रथमच सापडलेल्या अनेकार्थाने भव्य आणि एकमेवाद्वितीय अशा या मृण्मयाकृती आहेत आणि म्हणून भारतीय धोरणकर्त्यांना संशोधक आवाहन करतात की या नाजूक वारशाचे जतन झाले पाहिजे. तेथील रहिवाशांना सर्वप्रथम याबद्दल सजग करणे आवश्यक आहे कारण त्यांच्या वहिवाटेवर या आहेत. याच्या जवळच बांधलेल्या कालव्यामुळे सुमारे २३०० चौ.मीटरचा भाग नष्ट झालाच आहे, शिवाय यावरुन प्रवास करणार्‍या वाहनांमुळे त्याची आणखीच हानी होत आहे. २००४ साली घेतलेल्या या ठिकाणच्या उपग्रहीय छायाचित्राची तुलना आताच्या परिस्थितीशी केली तर किती मोठ्या प्रमाणात हानी होत आहे हे लक्षात यावे. आतापावेतो ज्ञात असलेल्या मृण्मयाकृतींचा उपयोग सामूहिक विधी आणि समारंभ साजरे करण्यासाठी, स्मृती आणि संस्कार जतन करण्यासाठी, बचावात्मक संरचना, खगोलशास्त्रीय अभ्यासाची नोंद, सौंदर्यात्मक कलाकृती इत्यादींसाठी होत असलेले नमूद झाले आहे. थर वाळवंटातला हा वारसा इतका विशाल आहे की भूपृष्ठावरुन त्या ठिकाणाला भेट दिली तर त्याचा आवाका लक्षात येतच नाही त्यामुळे याची निर्मिती ही पुढील पिढीकरता ठेवलेला संदेश किंवा हे समारंभाचे स्थान म्हणून नक्कीच झालेली नाही. त्यामुळे याच्या निर्मितीचा कालावधी आणि आजमितीस अनाकलनीय असा हेतू शोधावाच लागेल. याक्षणी एवढेच म्हणता येईल की या गूढ अशा मृण्मयाकृतींची निर्मिती ही त्यांच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक संदर्भाशी अतिशय जवळून जोडलेली आहे आणि यात विश्वासाठी सार्वभौम आणि दैवी संदेश दडलेला आहे त्याची उकल करणे हे भारतीय संशोधकांपुढे मोठेच आवाहन असेल. 

१. Oetheimer, C. and Oetheimer, Y. New enigmatic geoglyphs in the Indian Thar Desert: The largest graphic realizations of mankind? Archaeological Research in Asia. 27; 2021; Article ID: 100290. https://doi.org/10.1016/j.ara.2021.100290.

*आकृती सौजन्य:‌ Archaeological Research in Asia. 27; 2021; Article ID: 100290
***


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा