बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

वैद्यकीय कचर्‍याची समस्या आणि उपाय / Biomedical Waste: Problems and Solutions

शाश्वत विकासाच्या संदर्भात भारताचा क्रमांक १६५ राष्ट्रांमध्ये १२० वा लागतो. कचरा प्रक्रियेबाबत उदासिनता हे याचे एक महत्वाचे कारण. त्यात गेल्या काही वर्षात कोविड महामारीने 'दुष्काळात तेरावा महिना' असे म्हणायला हवे. वैद्यकीय सेवांमधून निर्माण होणारा कचर्‍यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि या धोकादायक कचर्‍याची विल्हेवाट हा एक अतिमहत्वाचा प्रश्न निर्माण झाला. यासंदर्भात संशोधकांनी या गंभीर बाबीचा आढावा घेतला आहे त्याचा हा गोषवारा.

वैद्यकीय कचरा विविध वैद्यकीय सेवांमधून निर्माण होतो. मानव तसेच प्राण्यांच्या स्वास्थ्यासाठी दिलेल्या निदान, उपचार आणि लसीकरण तसेच जैविक संशोधन आणि विकास या त्या वैद्यकीय सेवा. यातून निर्माण होणारा ८५% कचरा हा कमी जोखमीचा असला तरी उरलेल्या कचर्‍यातील सुमारे १०% कचर्‍यातून संसर्गजन्य रोगांचा फैलाव होण्याची आणि सुमारे ५% कचरा किरणोत्सर्गी किंवा रासायनिक असल्याने तो अतिधोकादायक ठरतो. त्यामुळे ४० लाख मुलांसकट सुमारे ५२ लाख लोक मृत्यू पावतात असे जागतिक आरोग्य संस्थेचे अनुमान आहे. भारतात दररोज सुमारे ७७५ टन वैद्यकीय कचरा निर्माण होतो आणि यात सरासरी ७% वार्षिक वाढ नोंदलेली आहे. सुमारे ३००० इस्पितळे, ३,२२,००० इतर आरोग्य सेवा सुविधा केंद्रे, २१००० अलगीकरण कक्ष, १५०० नमुना चाचणी केंद्र आणि २६४ प्रयोगशाळांतून कोविड महामारी दरम्यान दररोज १०१ टन वैद्यकीय कचर्‍याने यात मोठीच भर घातली आणि कचर्‍याच्या विल्हेवाटीची समस्या आणखीच गंभीर केली आहे. १० मे २०२१ रोजी तर २५० टनाइतकी नोंद झाली. आरोग्य सेवा केंद्रांपैकी सुमारे १३% केंद्रांनी वैद्यकीय कचर्‍याच्या विल्हेवाटीची नियमावली पाळली नाही असे नजरेस आलेले आहे. दररोज सुमारे ७४ टन कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता खोल खड्ड्यात ढकलला जातो. कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय कचर्‍याची योग्य तर्‍हेने विल्हेवाट न लावल्यामुळे कोरोनाच्या नव्या जातीतील विषाणूंना आणि इतर संसर्गजन्यरोगांना जन्म देण्याची भीती व्यक्त केली जाते. 

आकृती: वैद्यकीय कचर्‍याच्या धोक्यानुसार
 त्याचे करावयाचे वर्गीकरण
वैद्यकीय कचर्‍याच्या धोक्यानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते. तो वेगवेगळ्या डब्यात साठवला जातो. त्या डब्यांना रंगांचे संकेत दिले आहेत. जसे शरीराचे भाग, रासायनिक आणि घाणेरडा कचरा, केमोथेरपीचा कचरा, औषधी उत्पादने आणि प्रयोगशाळेतील कचरा यांची विल्हेवाट लावण्याकरता पिवळ्या डब्यांचा वापर केला जातो. लाल डबा दूषित प्लास्टिक कचऱ्यासाठी, निळा डबा काच आणि रोपणासाठी वापरलेल्या धातूच्या कचर्‍यासाठी, पांढरा डबा धातूच्या धार-दार वस्तूंसाठी, काळा डबा इतर घातक कचऱ्यासाठी तर हिरवा डबा विघटन होणार्‍या साध्या कचऱ्यासाठी वापरला जावा असे संकेत आहेत.

गोव्याच्या शेजारच्या राज्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावायची सोय केलेली आहे असे संशोधक म्हणतात. पण गोव्यातही हल्लीच पिवळा, लाल, निळ्या आणि पांढर्‍या डब्यातला कचरा हाताळायची सोय झालेली दिसतेय. कुंडई औद्योगिक वसाहतीत बायोटिक वेस्ट सोल्युशन्स प्रा.लि. नावाच्या कंपनीला ही जबाबदारी दिली असल्याचे इतर संकेतस्थळे शोधल्यावर कळते. जगातल्या सर्वोत्कृष्ट भट्टीचा उपयोग ते कचरा जाळण्यासाठी करतात असा त्यांच्या संकेतस्थळावर दावा आहे. 

कोविडमुळे वैद्यकीय कचर्‍यात अचानक झालेली वाढ आणि त्याची विल्हेवाट लावणे ही नागरिकांना लस देण्याइतकेच बिकट काम होते. दिलेल्या प्रत्येक इंजेक्शनची सिरिंज, १०-२० जणांना लस दिल्यानंतर (किंवा वाया गेलेल्या) लसीच्या काचेच्या बाटल्या रिकाम्या होऊन कचर्‍यात भर पडते. मुखावरणे (मास्क), चेहरा झाकणारी कवचे, हातमोजे, पोशाख (पीपीई किट्स) यांची भरही वैद्यकीय कचर्‍यात पडतच असते. अनेकदा ते आजूबाजूच्या कचर्‍यातही आढळतात. या वस्तूंना पुन:प्रक्रियेला पाठवण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक ठरते आणि यासंबंधी संबंधित घटकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. 

महामारीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याला तोंड देण्यासाठी करायच्या काही उपाययोजना खालीलप्रमाणे नमूद केल्या आहेत:

  • मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कचरा ज्या राज्यांमध्ये निर्माण होतोय तेथे घातक कचरा जाळण्याचे संयंत्र, औद्योगिक स्तरावर बंदिस्त ठिकाणी कचरा जाळण्याची सोय करणे यासारख्या वैकल्पिक व्यवस्था निर्माण करण्यावर भर
  • रुग्णालयाबाहेरील लसीकरण शिबिरांमध्ये निर्माण होणारा कचर्‍याचे योग्य प्रकारे विलगीकरण
  • जैव-वैद्यकीय कचऱ्याच्या संकलनादरम्यान बार-कोडिंगची योग्य अंमलबजावणी करणे, ज्यायोगे कचऱ्याच्या स्त्रोताचा सुनिश्चित मागोवा घेता येणे शक्य होईल
  • कचरा निर्मितीच्या ठिकाणीच त्याचे त्याच्या स्तरानुसार योग्य असे अलगीकरण करण्याकरता जागरुकता निर्माण करणे
  • कचरा निर्मितीच्या ठिकाणांची मध्यवर्ती केंद्रावर व्यवस्थित नोंद ठेवणे
  • कचरा निर्मिती केंद्र, संस्करण केंद्र, निवडक कचरा जाळणार्‍या भट्ट्या यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अविरत नोंद ठेवण्याची सोय
  • राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांद्वारे तळागाळात आरोग्य सेवा कर्मचार्‍यांसाठी आणि राज्य मंडळाच्या अधिकार्‍यांसाठी व्यापक प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे
  • यासंबंधीच्या नियमांचे पालन न करणार्‍या आरोग्य सुविधांविरुद्ध नियामक प्राधिकरणांकडून कठोरपणे पर्यावरण नुकसान भरपाई शुल्क वसूल करणे

आकृती सौजन्य: बायोटिक वेस्ट सोल्यूशन्स प्रा.लि. कुंडई

संदर्भ:‌ Saxena, P. Redefining bio-medical waste management during COVID-19 in India: A way forward. Mater Today Proc. 2022; 60: 849–858. doi: 10.1016/j.matpr.2021.09.507

----------------------------------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या ३१ ऑगस्ट २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा