रोग आणि विकार हे शब्द सहसा एकमेकाला पूरक असे वापरले जातात, पण त्याला विशिष्ट अर्थ आहे. म्हणजे असे की बाह्य किंवा अंतर्गत घटकांना शरीराने दिलेल्या प्रतिसादाला रोग म्हणतात. यातले बरेचसे संसर्गजन्य असतात. पण इतरांपासून अथवा वातावरणाचा परिणाम न होताही शरीरात अशा काही व्याधी निर्माण होतात त्यांना 'विकार' असे म्हटले जाते. शरीराच्या सर्वसाधारण कार्यांमध्ये व्यत्यय आला की तो विकार समजला जातो. हे असंसर्गजन्य असतात. काही प्रमाणात जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तंबाखूचे सेवन, मद्यपानात वाढ आणि वाढते शहरीकरण यामुळे भारतात असंसर्गजन्य विकारांनी ग्रस्त अशा रोग्यांची संख्या वाढत असल्याचे एक निरीक्षण सांगते. अशा विकारांमुळे आलेले आजारपण दीर्घकाळ टिकते आणि त्यावरील उपचारांसाठी कौटुंबिक खर्चात भरीव वाढ होते आणि रुग्णांची काळजी घेण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच सेवा देण्याची सज्जता ठेवण्याचा भार आरोग्य सेवेवर पडतो. हे विकार शारीरिक, मानसिक किंवा अनुवांशिक कारणांमुळेही असू शकतात. जगभर या विकारांनी ग्रस्त होणार्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते. भारतात या विकारांमुळे हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागणार्या रुग्णांचे प्रमाणही २९ टक्क्यांवरुन (२००४ साली) ३८ टक्क्यांपर्यंत (२०१४ साली) पोहोचले. यामुळे सार्वजनिक आरोग्य सुविधांवर ताण तर येतोच पण महत्त्वाचे म्हणजे असे विकार झालेल्या कुटुंबांच्या उत्पन्नातला मोठा भाग याच्या निवारणासाठी खर्च करावा लागतो. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या संशोधकांनी २०१७-१८ साली झालेल्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातून गोळा केलेल्या माहितीतील २२ राज्यांतील विकारांनी ग्रस्त असलेल्यांचे राज्यनिहाय विश्लेषण करुन एक लेख काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केला तो चिंतनीय आहे. या सर्वेक्षणादरम्यान एकूण १ लाख १४ हजार परिवारांतल्या ५ लाख ५५ हजार व्यक्तींची माहिती गोळा केली गेली. त्यात २४ हजार परिवारांमधून २८ हजार जणांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागलेल्यांच्या माहितीचा वापर केला. त्यांना झालेल्या विकारांमध्ये कर्करोग, रक्तदाब-हृदयविकार, पक्षाघात (लकवा), मधुमेह, श्वसन विकार, स्नायू आणि अस्थि विकार, अपस्मार, मनोविकृति, जननमूत्र संस्थेचे विकार, दृष्टी आणि इतर इंद्रिय विकार अशा १० विकारांचे प्राबल्य होते.
सामाजिक स्तरावर याचे मोजमाप करायला जी एकके केली आहेत त्यातले एक म्हणजे आजारपणामुळे आयुष्याची गमावलेली वर्षे (इयर्स ऑफ लाईफ लॉस्ट - वायएलएल). या अकाली मृत्यूच्या मोजमापात विकारांमुळे एकूण मृत्यू पावलेल्यांची संख्या आणि त्यांचे वय या दोन्ही बाबी विचारात घेतल्या जातात. तर एखादी व्यक्ती अशा विकारामुळे येणार्या परावलंबनात किती काळ जगली (ईयर्स लिव्हड विथ डिसॅबिलिटी - वायएलडी) हे मोजण्याचे आणखी एक एकक. या दोन्हींची बेरीज म्हणजे परावलंबनामुळे वाया गेलेला काळ (डिसॅबिलिटी-अॅडजेस्टेड लाईफ ईयर्स - डीएएलवाय) आजारपण, अपंगत्व किंवा अकाली मृत्यूमुळे गमावलेल्या वर्षांची संख्या यातून व्यक्त केला जातो.
२०१७ साली भारतात अशा विकारांनी ग्रस्त होऊन सुमारे ४७ लाख लोकांचा मृत्यू तर झालाच पण परावलंबनामुळे आणि मृत्यूंमुळे एकूण २ कोटी २६ लाख वर्षं वाया गेली. वर्षं वाया जाणार्यांत पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त होते तर स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक काळ परावलंबनात जगल्या. श्वसन विकाराचा अपवाद केला तर स्त्रियांचा क्रमांक इतर सगळ्या विकारांत पुरुषांपेक्षा आघाडीवर होता. कर्करोगात तर त्यांचे प्रमाण पुरुषांपेक्षा १२ पटीने अधिक होते. यात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे, जुनाट श्वसन रोग, कर्करोग आणि पक्षाघात ही प्रमुख कारणे होती आणि यापैकी ६५% मृत्यू ७० वर्षे वयाखालील लोकांचे आहेत. राज्यनिहाय विभागणी केली तेव्हा सर्वाधिक हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे विकार पंजाब आणि त्या खालोखाल कर्नाटकामध्ये आढळून आले. कर्करोगाने ग्रस्त व्यक्ती सर्वाधिक केरळात आणि त्यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये आढळून आल्या.
सर्वेक्षणातून असे दिसून येते की या विकारांसाठी ५०-७०% व्यक्ती उपचारांकरता खाजगी आरोग्य सुविधांकडे धाव घेतात. विशेषतः महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि पंजाबातल्या ७०-८०% रोग्यांनी खाजगी आरोग्य सुविधांचा आसरा घेतला. पूर्वोत्तर राज्यांमध्ये मात्र, विशेषतः अरुणाचल प्रदेशात, सार्वजनिक आरोग्य सुविधांचा वापर करण्याकडे कल दिसून आला (आकृती).
हे विकार सामान्यांच्या खिशाला मोठेच छिद्र पाडतात. यावर होणारा खर्च जर त्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नापैकी १० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च या विकारांच्या निवारणाकरता होत असेल तर तो त्यांच्यासाठी 'आपत्तीजनक' च / न पेलवणारा समजला जातो. या खर्चात थेट वैद्यकीय खर्च (हॉस्पिटलचे शुल्क, औषधे, डॉक्टरांची फी इत्यादी) आणि अनुषंगिक वैद्यकीय खर्च (हॉस्पिटलमध्ये जाण्या-येण्याकरता केलेली वाहन सेवा, रुग्णाबरोबर सोबत करणार्यावर केलेला खर्च इत्यादी) याचा अंतर्भाव होतो. आरोग्य विमा उतरवलेला असेल तर त्यातून मिळणारा परतावा एकूण खर्चातून वजा केला जातो. या अभ्यासादरम्यान असे दिसून आले की भारतात खाजगी आरोग्य सुविधांवर होणारा खर्च हा सार्वजनिक आरोग्य सुविधा वापरणार्यांच्या खर्चापेक्षा सुमारे पाच पट अधिक आहे (तक्ता). कर्करोगावर होणारा खर्च हा सर्वाधिक आहे. त्याखालोखाल अनुक्रमे श्वसन विकार, जननमूत्र संस्थेचे विकार, दृष्टी दोष, स्नायू आणि अस्थि विकारांचा क्रमांक लागतो. सुमारे ७५% परिवारांना, विशेषतः पूर्वेकडील आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये, हा भार पेलवण्यापलिकडचा होता. त्यातल्या त्यात कर्नाटक, आंध्र आणि गुजरातेत परिस्थिती बरी होती. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये पक्षाघाताने ग्रस्त असलेले रुग्ण सर्वाधिक आढळून आले. पण पंजाब सोडला तर इतर राज्यांमध्ये पक्षाघाताने होणार्या विकारावरील खर्चाचा भार सुसह्य असल्याचे आढळले.
तक्ता: विकारानुसार सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवेवर होणारा खर्च
संशोधकांनी कुठल्या विकारामुळे आयुष्याची सर्वाधिक वर्षे गमावली जातात आणि वाया गेलेल्या काळाचाही अभ्यास केला. रक्तदाब-हृदयविकारामुळे सर्वाधिक वर्षंं भारतात गमावल्याचे आढळून आले. कर्करोगामुळे होणार्या मृत्यूंचा क्रमांक हृदयरोगामुळे होणार्या मृत्यूंनंतर लागतो पण त्यावर सर्वाधिक खर्च होतो. स्नायू आणि अस्थि विकारांच्या वैद्यकीय उपचारांना होणार्या खर्चावर विमा कंपन्यांना सर्वाधिक परतावा द्यावा लागत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.
हा अभ्यास भारतीयांच्या सामाजिक परिस्थितीवर झगझगीत प्रकाश पाडतो. तसेच यातून विविध राज्यांमध्ये असलेल्या सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधांच्या उपलब्धतेचे दर्शनही काही प्रमाणात घडते. या विकारांमुळे आरोग्य सुविधांवर होणारा खर्च अनेकांना न परवडणारा असल्याचे दिग्दर्शनही त्यातून होते. भारतात आरोग्य सुविधांवर होणारी शासकीय गुंतवणूक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या केवळ १% आहे. इतर देशांशी तुलना (अमेरिका ८.६%, ब्राझिल ४%, चीन २.९%) केली तर ती अतिशय तोकडी वाटते. यामुळे भारतात खाजगी आरोग्य सुविधांनी पाय पसरल्याचे दिसून येते पण त्यामुळे नागरिकांच्या खिशाला फार मोठा भार सहन करावा लागतो. अशा विकारांवर उपाय करणे एवढेच देशाचे ध्येय नसावे तर विकारांचे प्रमाण अल्प असावे या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दिसून येते. या विकारांचे त्यांच्या सुरुवातीच्या काळातच निदान करता आले तर यावर होणार्या खर्चाला आळा बसू शकतो त्याकरता यासंबंधी जागरुकता वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. मोबाईल फोन्सवर मधुमेह, तंबाखू सेवन मुक्ती, तणाव मुक्तीसाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत त्याचा वापर करायला नागरिकांना उद्युक्त करायला हवे. सार्वजनिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा आणि विमा योजनांचा प्रसार आयुष्मान भारत योजनेखाली मोठ्या प्रमाणात झाला तर त्याचाही काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो असे संशोधक म्हणतात.
संदर्भ: Menon, G.R., et al. Burden of non-communicable diseases and its associated economic costs in India. Social Sciences & Humanities Open. 5(1); 2022; Article ID 100256. https://doi.org/10.1016/j.ssaho.2022.100256
-----------------------------
हा लेख दैनिक हेराल्डच्या १२ ऑक्टोबर २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा