डीएनए किंवा डीऑक्सिरायबोन्युक्लिक अॅसिड हा अनुवंशिकता सांगणारा मानवाच्या किंवा प्रत्येक जीवाच्या पेशींमधील एक अविभाज्य घटक आहे. १९८०च्या दशकात डीएनए चा उपयोग गुन्हेगार ओळखणं, वंश संबंध सांगणं, वगैरे कामांसाठी व्हायला लागला आणि ही पध्दत आपल्या सगळ्यांनाच वर्तमानपत्रात 'असल्या' बातम्या वाचून ओळखीची झाली. आनुवंशिकता विज्ञानाची (जेनेटिक्स) समाजाला याद्वारे मोठीच देणगी मिळाली. आपल्याला आपले पूर्वज कोण याचं मोठंच कुतूहल असतं. धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी तेथील पुरोहित त्यांच्याकडील नोंदी पाहून आपल्या वंशावळीची माहिती पूर्वी देत असत. आता ती पध्दत आहे की नाही हे माहीत नाही. ख्रिस्ती समाजात त्यांच्या चर्चमध्ये अशा नोंदी ठेवलेल्या असतात त्यावरून माझ्या एका मित्राने त्यांच्या कुटूंबाचा कुलवृक्ष तयार केला होता. पण ही साधनं आपल्याला काही पिढ्यांपर्यंतच मागे घेऊन जाऊ शकतात. म्हणून डीएनए सारखी साधनं वापरून शास्त्रज्ञ एखाद्या देशाचे पूर्वज कोण, त्यांची संस्कृती कशी होती, पूर्वी स्थलांतरं कशी झाली, वगैरे समजावून घेण्यासाठी उपयोग न करतील तर नवलच. गेल्या दोन दशकात याचा वापर करून अनेक बाबींचा उलगडा त्यांनी केला आहे.