लस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

कोविडच्या लसींना पर्याय / Alternative to COVID vaccine

कोविड-१९ ची पहिली लाट आली त्याला आता येत्या जानेवारीत तीन वर्ष होतील. आपण भारतीय इतरांपेक्षा नशीबवानच म्हणायला हवे. याकरता लागणार्‍या लसींची निर्मिती भारतात झाली, सरकारने ती सगळ्यांना मोफत द्यायला सुरुवात केली. दोनशे कोटी लसींचा आकडा आपण पार केला आहे. त्यामुळे त्याची लागण तशी आटोक्यात आहे. पण तरीही या दरम्यान एका मागोमाग लाटा येत गेल्या आणि धोका कमी झालेला असला तरी संपला नाहीये. अजूनही सुरक्षित अंतर पाळा, मुखपट्टी वापरा, हात वारंवार धुवा हे सांगितले जातेच. हा विषाणूही तसा चिवटच, जाता जात नाहीये. त्याच्या नवनव्या उपजाती निघताहेत आणि कधी कोणाला त्या ग्रस्त करतील याची खात्री देता येत नाहीये. घेतलेल्या लसींचा या नव्या उपजातींवर परिणाम कितपत होईल अशी शंका सतत मनाला सतावत राहते. कारण विषाणूंच्या नव्या उपजातींचीही लसींना तोंड द्यायची शक्ती वाढत आहे. मग वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेण्याचा आग्रह केला जातोय. ही साखळी कधी तुटणार आणि त्यातून सामान्य व्यवहार कधी सुरु होणार याची कल्पना कोणालाच नाहीये. फरक इतकाच की त्याला तोंड द्यायची मानसिक शक्ती वाढली आहे. कारण घरात किती दिवस बसून राहाणार? 'वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातोच' अशी एक म्हण मराठीत आहे. तशी परिस्थिती आहे.

रेखाचित्र :‌ भिंगाखाली पेप्टाइडनी कोविडच्या विषाणूंना (व्हायरसचे कण)
एकत्र गुंफलेले दिसत आहे 

या लसी कसे कार्य करतात हे समजून घेणे आवश्यक ठरते. एकदा का कोविडचा विषाणू आपल्या पेशीत शिरला की या लसींमुळे निर्माण झालेले प्रतिपिंड (अँटीबॉडीज) कार्यरत होतात आणि विषाणूला ग्रासून टाकत त्याला पेशींच्या केंद्रकापर्यंत पोहोचायला मज्जाव करतात. पण वर म्हणल्याप्रमाणे विषाणूच्या सुधारित उपजातींना अशी प्रतिपिंड कितपत मज्जाव करतील याची शंका उरते. म्हणून अशा विषाणूंच्या निर्मूलनासाठी आता वेगळ्या दिशेने त्यांचा अटकाव करण्याच्या अभिनव पद्धती शोधून काढण्याचे प्रयत्न होत आहेत. अशाच एका प्राथमिक स्तरावर सफल झालेल्या प्रयत्नाची ही झलक. सीएसआयआरच्या चंदीगड येथील सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने बंगळूरुच्या भारतीय विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी यासंबंधी केलेले प्राथमिक स्तरावरील प्रयोग नव्या आशा उत्पन्न करणारे आहेत.

दोन प्रथिने जवळ आली की त्यांच्यात परस्परसंवाद निर्माण होतो आणि ती कुलूप-किल्लीसारखी एकत्र येतात. हेच तर कोविड विषाणू आपल्या पेशीत शिरला की होते. मग हा संवादच टाळता आला तर? हा विचार मनात ठेऊन या वैज्ञानिकांनी याकरता कृत्रिम पेप्टाइडची निर्मिती करुन त्याचा उपयोग करायचे ठरवले. परस्परसंवादाला कृत्रिम पेप्टाइड्सद्वारे अडथळा आणला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली. पेप्टाइड म्हणजे अमिनो आम्लांची एक साखळीच असते. अगदी दोन अमिनो आम्ल एकत्र येऊन पेप्टाइड तयार होते, तर प्रथिने अशा अनेक पेप्टाइड एकत्र येऊन लांबलचक अशा अमिनो आम्लांच्या साखळीने बनतात म्हणून त्यांना पॉलीपेप्टाइडही म्हणले जाते. आपले शरीर अशा अनेक पेप्टाइड्सनी बनलेले असते. असे पेप्टाइड्स प्रयोगशाळेतही तयार करता येतात. प्रयोगशाळेत तयार केलेले पेप्टाइड्स आपल्या शरीरातल्या पेप्टाइड्सची नक्कल करू शकतात. म्हणून त्याचा वापर औषधांमध्येही केला जातो. अगदी मधुमेहापासून ते बहुविध चेतादृढन व्याधींसाठी (मल्टिपल स्क्लेरोसिस) त्यांचा वापर होतो. शिवाय यांचा वापर सौंदर्यप्रसाधनांसाठी लागणार्‍या क्रीम्स आणि लोशनमध्येही केला जातो. आहाराला पूरक म्हणूनही गोळ्या आणि द्रव स्वरुपातही त्यांचा वापर होतो. अशा कृत्रिम पेप्टाइड्स वापरुन दोन प्रथिनांमधील संवादाला अटकाव निर्माण करता येतो. हेच गृहीत या प्रयोगादरम्यान वापरले गेले. पेप्टाइड्समध्ये कोविडसारख्या विषाणूंना (व्हायरसचे कण) एकत्र गुंफण्याची क्षमता असते, त्यामुळे पेशींना संक्रमित करण्याची त्यांची क्षमता कमी होते. अशा रितीने कोविड विषाणूच्या पृष्ठभागावरील टोकदार प्रथिनाला (स्पाइक प्रोटीन) बांधून घेत त्यांना पेशीत शिरायलाच अटकाव करण्याचे प्रयत्न याद्वारे केले गेले आहेत.

वैज्ञानिकांनी याकरता एसआयएच-५ नावाच्या पेप्टाइडचा वापर करत कोविडच्या विषाणूतल्या प्रथिनाचा पेशीत आढळणार्‍या एसीई-२ प्रथिनाशी होणार्‍या परस्परसंवादाला अटकाव करायचे ठरवले. एसआयएच-५ ची मात्रा त्यांनी प्रयोगाला वापरल्या जाणार्‍या उंदरांच्या एका गटाला दिली. दुसर्‍या उंदरांच्या गटाला अशी मात्रा दिली नाही. या दोन गटांना मग त्यांनी  कोविड विषाणूच्या संपर्कात आणले. प्रयोगांती  त्यांना असे आढळून आले की एसआयएच-५ ची मात्रा दिलेल्या उंदरांच्या फुफ्फुसातील पेशींची हानी तुलनेने खूपच कमी प्रमाणात झाली आहे.

या छोट्याशा प्रयोगाअंती भारतीय वैज्ञानिकांच्या विश्वासाला पुष्टी मिळाली आहे. प्रयोगशाळेत बनवलेल्या या कृत्रिम पेप्टाइडमध्ये आणखी किरकोळ बदल करुन ही पद्धत कोविडचेच नाही तर दोन प्रथिनांच्या परस्परसंवादांमुळे होणार्‍या इतर रोगांनाही अटकाव करता येईल असा त्यांना विश्वास वाटतो. 

संदर्भ:‌ Khatri, B., et al. A dimeric proteomimetic prevents SARS-CoV-2 infection by dimerizing the spike protein. Nature Chemical Biology. 2022. https://doi.org/10.1038/s41589-022-01060-0

----------------------------------------------------------

हा लेख 'दैनिक हेराल्ड'च्या १० ऑगस्ट २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.