biodiversity लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
biodiversity लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

सौरऊर्जा प्रकल्पांमुळे अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेला धोका? / Threat to Food Security and Biodiversity from Solar Energy Projects

भारताच्या हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखड्यात सौर ऊर्जा निर्मितीला अग्रस्थान दिले गेले आहे. राज्यांच्या सक्रिय सहभागासह भारत सरकारने जानेवारी २०१० मध्ये राष्ट्रीय सौर ऊर्जा मोहीमेची सुरुवात केली. जागोजागी सौर ऊर्जा संयंत्रे बसवून २०२२ पर्यंत १०० आणि २०३० पर्यंत ३०० गीगावॅट्स सौर ऊर्जा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. आता २०२२ च्या अखेरच्या टप्प्यात आपण असताना उद्दिष्टांच्या केवळ ४० टक्के काम पूर्ण झाल्याचे आढळते (आकृती १). 

आकृती १: सौर उर्जा ३१ मार्च २०२१ ची स्थिती
स्रोत: https://mnre.gov.in/solar/current-status/

पण झाले तेही नसे थोडके म्हणावे लागेल. कारण गेल्या पाच वर्षांत सौरऊर्जेची स्थापित क्षमता पाचपटीने वाढली आहे. सुरुवात सावकाश झाली तरी उद्दिष्ट गाठण्यासाठी यापुढे वेग घेता येऊ शकतो. आतापावेतो सौर ऊर्जा मिळवण्याचे जे काम झाले आहे त्यापैकी दोन तृतियांशाहून अधिक ऊर्जा ही फोटोव्होल्टिक पद्धतीने मिळवलेली आहे. म्हणजे जमिनीवर मोठ्या आकाराच्या पसरलेल्या पत्र्यांवर 'प्रकाश घट' (सेल्स) बसवून त्यांद्वारे सूर्यप्रकाशाचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करायचे. अनेक पत्रे एकत्र पसरायला लांब-रुंद भूभाग लागतो. त्यामुळे त्यांच्या समुच्चयाला 'सौर शेत'च म्हणले जाते. हे पत्रे ओसाड जमिनींवर बसवून त्यातून ऊर्जा मिळवण्याचे धोरण आहे. पण जर हे पत्रे लावण्याकरता शेतजमिनींचा, कुरणांचा किंवा वन्यजीव आणि नैसर्गिक अधिवास असलेल्या परिसंस्थेचा वापर केला तर लक्षणीय प्रमाणात विपरीत परिणामच होण्याची शक्यता. कारण त्यातून अन्न तुटवडा निर्माण होणे, जैवविविधतेत घट, वातावरणातील कार्बनच्या शोषणाचा पर्याय कमी होणे आणि परिणामी ज्या हवामान बदलाला तोंड देण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत त्यालाच शह बसू शकतो. शिवाय अशा प्रकारे केलेल्या सौर ऊर्जा विकासामुळे होणारे भू-वापरातील बदल (उदा. जैवविविधता-समृद्ध अधिवास, स्थानिक शेती आणि कुरणांवर अवलंबून असलेल्या समुदायांसाठी महत्त्वाची ठिकाणे) सामाजिक-पर्यावरणीय संघर्षांना जन्म देण्याचे कारण ठरु शकते आणि शेवटी या चांगल्या हेतूला खीळ बसून उद्दिष्ट गाठणे अवघड होऊ शकते. आतापर्यंत झालेल्या कामांसाठी कुठल्या प्रकारचा भूभाग वापरला आहे याची नेमकी माहिती उपलब्ध नाहीये. अशी माहिती गोळा करायला मनुष्यबळाचा वापर करीत जेथे सौर शेतं उभी आहेत तेथे भेट देऊन, त्याची मोजमापं काढून हे करणे हा सरधोपट मार्ग झाला. पण भारतभर पसरलेल्या सौरशेतांचे सर्वेक्षणाचे कार्य करायला लागणारा वेळ, श्रम आणि वित्ताचा विचार करता हा पर्याय अव्यवहार्यच ठरतो. इतर पर्यायांचा धांडोळा घेत 'द नेचर ऑफ कंझर्वन्सी' या संस्थेच्या दिल्लीस्थित शाखेतील संशोधकांनी भारतातील सौर ऊर्जाशेतांची माहिती मिळवायला मग कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येणे शक्य होईल का याचा विचार केला. त्यांना त्यात यश तर आलेच पण 'साइंटिफिक डेटा' या संशोधन नियतकालिकात त्यांच्या सर्वेक्षणामधून प्रसिद्ध झालेले निष्कर्ष महत्वाचे आहेत त्याचा हा आढावा. 

आकृती २: उपग्रह नकाशांचे
अर्थबोधन. स्रोतः संदर्भ
त्यांचे संशोधन दोन भागात विभागता येईल. याकरता त्यांनी उपलब्ध असलेल्या उपग्रहांद्वारे नकाशे मिळवले आणि त्यात आढळून येणार्‍या चित्रांतून सौरशेतांना नेमके जाणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करीत अशी माहिती गोळा करता येण्याची शक्यता पडताळली. अशी ठिकाणे आणि त्यांच्या व्याप्तीची खात्री इतर मार्गांनी मिळवल्यानंतर या नकाशांना मग त्यांनी राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राकडे (एनआरएससी) उपलब्ध असलेल्या पाच वर्षांपूर्वीच्या नकाशांवर अध्यारोपित केले. यामुळे गेल्या पाच वर्षात ज्या ठिकाणी अशी सौरशेतं उभी राहिली आहेत त्या जमिनींचा वापर पूर्वी कशा प्रकारे होत होता हे लक्षात यायला मदत झाली आहे (आकृती २).

उपग्रहांद्वारे मिळालेल्या नकाशांमधून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करीत त्यांनी अखेरीस १३६३ सौर शेतांची इतर मार्गांनी तपासून सिद्ध केलेली माहिती एकत्र केली. मोठ्या भूभागाची माहिती एकत्र करताना नेहमीच बहुभुजांचा (पॉलिगॉन - जमिनीच्या लहान तुकड्यांचा) वापर केला जातो. अशा अनेक तुकड्यांना एकत्र करीत प्रत्येक सौर शेताला एक क्रमांक दिला. मग त्या सौरशेताचा एकूण आकार, रेखांश-अक्षांशांचा वापर करीत ते कसे पसरले आहे याची माहिती आणि कुठल्या राज्यात ते आहे हे ही नमूद केले. या माहितीव्यतिरिक्त अनेक ठिकाणच्या सौरशेतांची ओळख पटली असली तरी ती वैध आहेत की नाही याची खात्री न करता आल्यामुळे त्या माहितीला निष्कर्षांमधून वगळले.

खात्रीच्या सौरशेतांची माहिती गोळा केल्यानंतर त्याचा ताळा एनआरएससीच्या नकाशांशी केला गेला. त्याचे निष्कर्ष असे: ७४% पेक्षा अधिक सौर शेतांची उभारणी अशा भूभागांवर झालेली आहे की, ज्यामुळे भविष्यात जैवविविधतेसंबंधी आणि अन्न सुरक्षेसंबंधी कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. याची विभागणी अशी: ६.९९% भूभाग नैसर्गिक अधिवासाशी संलग्न आणि ६७.६% शेत जमिनीवर आहे. ३८.६% शेतजमिनीतून खरीप (पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली), रबी (थंडीत लागवड आणि वसंत ऋतूत उपज), तर झैद (उन्हाळ्यातली शेती) पिकं घेतली जात होती, आणि २८.९५% भागात फळबागा आणि मळ्यांची लागवड होत असे. नैसर्गिक अधिवासाशी संलग्न अशा भूभागात सदाहरित, पानझडी आणि किनारी दलदलीच्या जंगलासारख्या त्यांच्या जैवविविधता मूल्यासह संवेदनशील परिसंस्थांचा समावेश होतो. अर्थात या संशोधनातून मिळालेले निष्कर्ष एकतर्फी असू शकण्याचे संशोधक मान्य करतात. कारण त्यांनी असे मूल्यांकन करताना खात्रीशीर सौर शेतं असलेली माहितीच पुढील विश्लेषणासाठी घेतली. त्यामुळे हे निष्कर्ष आजमितीस कार्यरत झालेल्या एकूण सौरशेतांच्या सुमारे २०% प्रकल्पांचा विचार करुनच काढले गेले आहेत.

एकूण, उपग्रहांद्वारे नकाशे मिळवून त्यात आढळून येणार्‍या चित्रांतून सौरशेतांना नेमके जाणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणखी सुधारित मॉडेलद्वारे करणे शक्य असल्याचे ते नमूद करतात. सौरऊर्जा प्रकल्प पडिक जमिनींवरच मर्यादित ठेवावेत यासाठीही त्यांनी वापरलेली प्रणाली उपयोगी ठरु शकते याची ते नोंद करतात. नाहीतर यातून सौर ऊर्जा तर मिळेल पण त्यासाठी जैवविविधतेला आणि कृषी अन्न सुरक्षेला धोका निर्माण होईल. असे होणे कोणत्याही परिस्थितीत टाळायला हवे ही धोक्याची घंटा ते वाजवतात.

हा संशोधन लेख त्यांच्या मर्यादांसकट वाचताना भारतात नियोजनाचा अभाव असल्याने असे होऊ शकते याची जाणीव होते. अशाच प्रकारची धोक्याची घंटा 'वनीकरणाचे विचारात घेण्यासारखे पैलू' (https://muraritapaswi.blogspot.com/2022/06/facets-of-afforestation.html) या सुमारे दोन महिन्यांपूर्वी लिहिलेल्या लेखात संशोधकांनी वाजवल्याचे नमूद केले होते. त्यांनीही गवताळ प्रदेशावर वृक्षारोपण करु नये किंवा ती पडिक जमीन आहे असे समजून तेथे सौर उर्जेसाठीचे पॅनल्सही बसवू नये अशी सूचना दिली होती. विविधतेने नटलेली आपली भूमी तिचा र्‍हास न करता पुढील पिढ्यांच्या हाती सुपूर्द करणे आपली प्राथमिक जबाबदारी ठरते.  

संदर्भ:‌ Ortiz, A., et al. An Artificial Intelligence Dataset for Solar Energy Locations in India. Scientific Data. 9; 2022; Article no. 497. https://doi.org/10.1038/s41597-022-01499-9

---------------------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या २८ सप्टेंबर २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.






बुधवार, १५ जून, २०२२

वनीकरणाचे विचारात घेण्यासारखे पैलू / Facets of Afforestation


आभार :‌ 
Tree planting photo created by jcomp -
www.freepik.com

हवामान बदल हा बर्‍याच वर्षांच्या संशोधनानंतर आता एक परवलीचा शब्द झाला आहे. सामान्य माणसापासून ते राजकारण्यांपर्यंत या बदलाच्या झळा लागत असल्याने पूर्वीचा हा चेष्टेचा विषय आता सगळेच गांभिर्याने घेत आहेत हा त्यातल्या त्यात चांगला बदल म्हणावा लागेल. अनियमित पाऊस, पर्यावरणातील बदल, जैवविविधतेमध्ये आलेली घट वगैरे दृष्य परिणामांमुळे निदान हा चर्चेचा विषय तरी झालेला आहे हे खरे. याच्या अनुषंगाने झाडं लावली की जैवविविधतेचे संवर्धन होईल आणि हवामान बदलाला आळा बसेल असे अनेकांना वाटते. समाज माध्यमे, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, बातम्या आणि यावर होणार्‍या चर्चांमुळे सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. मग प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलून यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. अगदी शालेय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठ नागरिक किंवा व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पाँसिबिलिटी) या नात्याने लहान मोठे उद्योगही यात सहभागी होताना दिसतात. अनेकांचा भर सोप्या मार्गाचा अवलंब करण्याकडे आहे तो म्हणजे 'वृक्षारोपण'. नेते मंडळींनाही हा मार्ग सोयीस्कर वाटतो. झाडे लावताना फोटो काढले जातात, ते अनेक माध्यमातून प्रकाशित होतात आणि त्यामुळे हवामान बदलावर काही केल्याचे पुण्य पदरी पडते. झाडे लावण्यामुळे कार्बनचे वातावरणातील प्रमाण कमी होते, प्रदूषण घटते, जैवविविधता सुधारते, पाण्याचे चक्र नियंत्रित होते आणि मातीची धूप थांबते असे काही महत्त्वाचे फायदे सगळ्यांना माहिती झाले आहेत.

पण आपल्या बिघडत चाललेल्या पर्यावरणाला स्थिर करण्यासाठी वृक्ष लागवड हा रामबाण उपाय आहे का? लाखो झाडे लावल्याने हवामान बदल थांबतो का? हा वृक्ष लागवडीचा मोठा उपक्रम जैवविविधता सुधारण्यास मदत करतो का? या प्रश्नांचा ऊहापोह नुकत्याच प्रकाशित झालेल्या करंट सायन्स या संशोधन नियतकालिकात संजय गुब्बी यांनी केला आहे तो मननीय ठरावा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वृक्षारोपण हे एक दुधारी शस्त्र आहे आणि चुकीच्या झाडाची प्रजाती त्याला अयोग्य अशा जमिनीवर लावली तर त्याचे विपरित परिणाम दिसून येतात. खूप झाडे लावली की जंगल निर्माण झाले असे नसते. नैसर्गिक जंगले ही परिसंस्था तेथील जमिनीशी, वातावरणाशी जुळवून घेणारी असते. पक्ष्यांच्या विविध प्रजाती, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक, उभयचर प्राणी, बुरशी, सूक्ष्मजीव, पाणी, माती, पर्यावरणीय परिस्थिती अशा अनेक घटकांतील परस्परसंवादामुळे त्या विकसित होतात. भारतात वृक्षारोपणाची प्रक्रिया ही याबाबतचा कुठलाही विचार न करता राबवली जाते असे सामान्यत: दिसून येते. कुठल्या प्रकारची प्रजाती एखाद्या ठिकाणी योग्य होईल, झाड लावल्यानंतर त्याची घ्यावी लागणारी काळजी आणि अशा प्रकल्पांची वैज्ञानिक पद्धतीने केलेली चिकित्सा या सगळ्या बाबींची वानवाच दिसून येते. उदाहरणार्थ, अंजन वृक्ष शुष्क प्रदेशात उत्तम जोपासला जातो कारण तेच त्याचे ठिकाण, तो गवताळ जमिनीत लावायचा नसतो. केवळ ते झाड भारतीय उपखंडातले आहे म्हणजे भारतात ते कुठेही वाढेल या समज पूर्ण चुकीचा आहे कारण भारतात विविध प्रकारच्या जमिनी आहेत. मग होतं काय की त्याच्याशी निगडित इतर जैवविविधतेचा प्रसार त्या भागात होत नाही आणि अखेरीस अशा वृक्षारोपणाचा उपयोग जैवविविधतेच्या प्रसाराच्या दृष्टिकोनातून शून्य होतो. 

एका अंदाजानुसार भारतातील ३,२०,००० चौ.कि.मी. भूभाग गवताळ प्रदेश, झुडुपांच्या जमिनी, दर्‍या, वाळूच्या टेकड्यांनी व्यापला आहे. अशा ठिकाणी वृक्ष जवळजवळ नसतातच किंवा असले तरी ते विरळ स्वरुपात आढळतात. या ठिकाणांवर आढळणार्‍या वनस्पती आणि त्यांच्याशी निगडीत असलेले प्राणीजगत वेगळेच असते. या अधिवासांमध्ये बंगाली कोल्हे, भारतीय लांडगे, काळवीट, चिंकारा आणि इतर अनेक सस्तन प्राणी आढळतात. त्याचप्रमाणे माळढोक, खारमोर, करकोचे, बगळे आणि इतर लहान पक्ष्यांच्या प्रजाती, सरपटणारे प्राणी आणि संधिपाद प्राणी हे ही सर्व येथे निवास करतात. पण अशी विविधता असली तरी केंद्र शासन या सगळ्या ठिकाणांचे वर्गीकरण 'पडिक जमिनी' या संज्ञेखाली करते (https://dolr.gov.in/documents/wasteland-atlas-of-india) आणि यातील सुमारे ५१% ठिकाणांवर शासनदरबारी वृक्षारोपण करण्याचे प्रस्ताव आहेत. ज्या ठिकाणी वृक्षांची वाढ नैसर्गिकरीत्या होत नाही त्या ठिकाणी वृक्षारोपण केल्यामुळे त्या ठिकाणच्या परिसंस्थेवरच नाही तर त्या परिसंस्थेतील वन्यजीवांवर घातक परिणाम होणार आहेत. या पडिक जमिनी आहेत असे समजून त्यांना आरक्षित करुन विनाअभ्यास 'हरित' करण्याचा हट्ट यापूर्वीही नडला आहे. ज्याकरता हे प्रयोग केले गेले त्यामुळे अपेक्षित जिवांचा नाशच झाला आहे. कर्नाटकातील रानीबेन्नूर वन्यजीव अभयारण्य आणि जयमंगली संवर्धन केंद्रात वृक्ष लावल्यामुळे गवताळ प्रदेशात अधिवास करणारे तेथील माळढोक आणि लांडगे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि तेथे बिबटे, जंगली मांजरींचे प्रस्थ वाढले आहे. माळढोकाची प्रजाती नष्ट होणे हे तर मोठे दुर्भाग्य ठरेल, आजमितीस केवळ २५० च्या आसपास पक्षी शिल्लक असल्याचे अनुमान आहे. बरं, असंही नव्हे की वृक्ष लावूनच कार्बनची पातळी कमी होते. गवताळ प्रदेश वाढवूनही तितकाच परिणाम साधता येतो. बर्फाळ प्रदेशातले वृक्षारोपणाचे प्रयत्न म्हणजेही वेडेपणाच. यामुळे सूर्यकिरणे परावर्तित होण्याऐवजी त्यांचे शोषण होऊन तापमानवाढ होऊ शकते. अनेकदा तांत्रिक माहितीशिवाय केलेले वृक्षारोपण वाढीस लागत नसल्याची उदाहरणेही पाहायला मिळतात. चुकीच्या भूप्रदेशाची निवड, मातीची अयोग्य परिस्थिती, पशुंनी ते खाऊन टाकणे, त्यावर अनावश्यक शैवाल जमा होणे, कीटकांचे आक्रमण आणि लागवडीनंतरची काळजी न घेणे ही त्याची कारणे होत.

म्हणून कितीही आकर्षक वाटले तरी चुकीचे केलेले वृक्षारोपण हे अनेकदा त्या भूप्रदेशाच्या आणि परिसृष्टीच्या हानीस कारणीभूत ठरते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. असलेल्या परिसंस्थांचे योग्य पद्धतीने केलेले जतन केव्हाही श्रेयस्कर. वैज्ञानिक अभ्यास असे दर्शवितो की नैसर्गिक परिसंस्था सुमारे ४०% कार्बन शोषून घेतात शिवाय जैवविविधतेला आधार देतात आणि म्हणून नैसर्गिक वनजतनात अधिक गुंतवणूक करण्याचा विचार आपल्याला अधिक स्थैर्य मिळवून देईल. जागतिक पातळीवर विचार केला तर आताची जंगले वर्षभरात सुमारे १६ कोटी टन कार्बन शोषून घेऊ शकतात पण परिस्थिती अशी आहे की मानवाकडून होणारी जंगल कटाई आणि जंगलातील आगींसारख्या कारणांमुळे अंदाजे ८.१ कोटी टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात परत सोडला जात आहे.

देशपातळीवर विचार करताना गवताळ प्रदेशावर वृक्षारोपण करु नये किंवा तेथे ती पडिक जमीन आहे असे समजून सौर उर्जेसाठीचे पॅनल्सही बसवू नये. वृक्षारोपण कार्यक्रमापूर्वी वनस्पतीशास्त्रज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ - ज्यांना यातले काही कळते अशांचा सल्ला अवश्य घेतला जावा. 

स्रोत: Gubbi, S. Many facets of afforestation (tree planting) and climate change. Current Science, 122(9); 2022; 1007-1008. 
https://currentscience.ac.in/Volumes/122/09/1007.pdf

---------------------------------

हा लेख 'दैनिक हेराल्ड'च्या १५ जून २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला