गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

मेदवृद्धीला संगणकीय खेळातून आळा / Health Education With Computer Games

माजात लहान मुलांमध्ये दिसून येणारा लट्ठपणा हा एक मोठाच सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. याचे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम दृष्टीपथात येत आहेत. शिवाय त्यामुळे अनावश्यक असा आरोग्य सेवांवरचा खर्च वाढत आहे ते वेगळेच. मेदवृद्धी किंवा लठ्ठपणाला कारणीभूत असणारे अनेक घटक असले तरी खाणार्‍याला काय खावं हे वाटणं हे एक प्रमुख कारण असते. टीव्हीवरील खाद्यपदार्थांच्या जाहिराती, मित्र काय खातात याकडे लक्ष ही एखाद्या पदार्थाविषयी आकर्षण वाढण्याची आणखी काही कारणं. शिवाय पालकांनाही आपलं मूल गुटगुटीत दिसावं ही सुप्त इच्छा - अर्थात यातही पुन्हा टीव्हीवरील जाहिरातींचा पालकांवर होणार्‍या मानसिक परिणामाचा अंतर्भाव आहेच. याव्यतिरिक्त पालकांनी त्यांच्या नोकरी-व्यवसायात अति व्यस्त असणं आणि मग खाण्याकरता काहीतरी शिजवण्यासाठी तयार पदार्थांचा वापर, किंवा काहीतरी वेळ भागवून नेणारं (ज्याला इंग्रजीत 'जंक फूड' म्हणतात ते) खाण्याची जीवनशैली, विशेषतः मोठ्या शहरांतून, खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हे आर्थिक दृष्ट्या सुदृढ तसेच कमी उत्पन्नाच्या कुटूंबातही दिसून येतं. पण यामुळे होतं काय की मुलांवर लठ्ठपणा आणि कुपोषण याचे दुहेरी ओझे लादले जाते आणि त्यांच्या आरोग्याची नासाडी होते.

आजकाल व्हिडिओ आणि मोबाइलवरील खेळांचा मोठा प्रभाव मुलांवर आहे. अशा खेळातून चांगले आणि वाईट काय याची निवड करण्याची संधी मुलांना अप्रत्यक्षपणे देता येते. अशा संदेशांद्वारे त्यांच्या वागण्यात सकारात्मक बदल घडून येतो असे दिसते. मुलांना आकर्षक वाटतील, त्यांना ते खेळताना मजा येईल, त्यातून अप्रत्यक्षपणे दिला गेलेला संदेश ते आंतरिकरित्या प्रेरित होऊन अंगिकारतील, त्याचा त्यांच्या वागण्यावर प्रभाव पडेल अशा खेळांची आणि त्याचा परिणाम पुराव्यांद्वारे सिद्ध करता येईल अशा डिजिटल उपचार पद्धतींची गरज अधोरेखित केली गेली आहे. ल्युमोसिटी हे अशा खेळांचे उत्तम उदाहरण. या खेळाद्वारे खेळणार्‍याचे वागणे सुधारते आणि आकलनात फरक पडतो. अशा खेळांमध्ये मोठीच वाढ होत आहे कारण ते मुलांना खेळायला आवडतात. आहार आणि शारीरिक हालचालींच्या सवयी सुधारण्यासाठी प्रभावी पद्धतींचा वापर खेळातून सुचवण्याची गरज आजच्या काळात स्पष्टपणे जाणवते ती याकरताच. योग्य अशा अन्नाची निवड करण्यासाठी असे अनेक व्हिडीओ खेळ पाश्चिमात्य बाजारात उपलब्ध आहेत. पण असे खेळ खेळून मुलांवर किती परिणाम झाला याचा शास्त्रशुद्ध अभ्यास झालेला नाही.



याचा शास्त्रशुद्ध अभ्यास खेळणार्‍याने कुठल्या मार्गाची निवड केली, किती वेळ तो खेळात गुंतून पडला, खेळून झाल्यावर त्याचा वर्तणुकीत किती परिणाम झाला वगैरे बाबींचे विश्लेषण खेळणार्‍याच्या वर्तनाचा अंदाज करुन देते आणि त्यानुसार जे सुचवायचे आहे त्याकडे त्याचे लक्ष वेधण्याकरता त्यात योग्य असे बदल करता येतात. याचे आजमितीस एक मोठेच शास्त्र झाले आहे. या संशोधनादरम्यान संशोधकांनी 'फूया!' नावाच्या खेळाची निवड केली. हा खेळ मुलांना कुठले अन्न योग्य आहे ते सुचवतो. या खेळात उत्तम आरोग्यासाठी कसे खावे याची जाण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. उदा. अन्न खाल्ल्यावर एखाद्याचे शरीर कसे दिसेल, खाणारा चपळ होईल की नाही असे संकेत आहेत तर शेवटी प्रत्येक पातळीवर आहारात पोषक द्रव्य किती याचा तक्ता सादर केला आहे. खेळामध्ये याकडे मुलाचे योग्य आहाराकडे लक्ष कसे जाईल आणि तो त्याची नोंद करेल यावर भर दिला आहे. या खेळादरम्यान प्राथमिक बाबी खेळातच अंतर्भूत केल्या आहेत ज्या खेळणार्‍याला तयार उत्तरे न देता विचार करायला लावतात, धोरण ठरवायला लावतात. मग या दरम्यान त्याच्यातला 'अवतार' आरोग्यदायी नसलेल्या अन्नातील शत्रूंशी लढून काही नाणी जिंकू शकतो. या अभ्यासादरम्यान (१) मुलाने कुठल्या अन्नाची निवड करावी हे त्याला कितपत कळले, (२) मुलांच्या खेळ खेळण्याच्या विविध पद्धतींचे आकलन केले गेले, आणि (३) खेळून झाल्यावर त्याच्या खाण्याच्या सवयींमध्ये किती फरक पडला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. हे जाणून घेण्यासाठी अर्थातच मुलांची दोन गटात विभागणी केली गेली. एका गटाला 'फूया!' खेळायला दिले तर दुसर्‍या गटाला साधा 'उनो' सारखा खेळ दिला. 

छायाचित्र:‌ भारतीय शाळेत खेळात मग्न असलेले विद्यार्थी

सुरुवातीला यात भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना एक प्रश्नावली सादर केली गेली; ज्यात वय, लिंग, गेल्या आठवड्यात काय खाल्ले, काय खायला आवडते, व्हिडिओ गेम्स खेळायला आवडते का, किती खेळता वगैरे प्राथमिक बाबींची माहिती गोळा केली. मग त्यांच्या एका गटाला २० मिनिटासाठी 'फूया!' खेळायला दिला तर दुसर्‍या गटाला 'उनो' - ज्याचा खाण्यापिण्याबाबत माहिती देण्याचा कसलाही संबंध नव्हता. यानंतर या मुलांना सकस आणि अनारोग्यदायी खाद्यपदार्थांच्या ३ जोड्या दाखवल्या गेल्या. पहिल्या जोडीत साधे पाणी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक, दुसर्‍यात चविष्ट खाऊ (काजू आणि लेज बटाटा चिप्स), आणि गोड खाऊ (मनुका आणि ५-स्टार चॉकलेट बार). यातले २ पदार्थ त्याच्यासाठी निवडण्यास सांगितले. या वयाच्या मुलांमध्ये या पदार्थांचे आकर्षण असते. त्यांच्या निवडीच्या माहितीची नोंद केली. माहितीची नोंद करणार्‍यांपासून ते मूल कुठल्या गटातले आहे हे लपवून ठेवले होते. यानंतर त्यांना पुन्हा एकदा प्रश्नावली दिली ज्यात त्यांच्या पोषणविषयक ज्ञानाबाबत माहिती विचारली गेली. एका आठवड्यानंतर या गटांना पुन्हा २० मिनिटांसाठी खेळ खेळायला दिला. त्यांना ज्या ठिकाणी गेल्या आठवड्यात थांबावं लागलं त्या ठिकाणापासून पुढे खेळण्याची संधी दिली. आणि प्रश्नावलीतून त्यांच्या पोषणविषयक ज्ञानाबाबत माहिती गोळा केली. एकूण ३ पद्धतीने माहिती गोळा केली गेली - प्रश्नावलीतून, मुलांच्या पदार्थ निवडीतून आणि त्यांनी खेळताना एकूण सुमारे ६५००० वेळा निवडलेल्या कृतितून / क्लिक्स मधून.

या माहितीतून उद्दिष्टांची छाननी केली गेली. पहिल्या उद्दिष्टासाठी खायच्या पदार्थांमधून दोन्ही गटातील मुलांनी केलेली निवड, प्रश्नावलीतून कोणते पदार्थ सकस आहेत याची त्यांना कितपत जाण आली आहे हे तपासले गेले. दुसर्‍या उद्दिष्टाच्या छाननीसाठी मुलांनी खेळताना केलेल्या कृति तपासल्या गेल्या. त्यातून त्यांच्या खेळण्याचे प्रारुप तपासता आले. खेळात त्यांना ५ पर्याय दिले होते - (१) खेळातला 'अवतार' सकस आणि चांगल्या अन्नाची निवड करत निकृष्ट  अन्नाच्या रोबोंपासून स्वतःला जपतो, (२) निकृष्ट अन्नाच्या रोबोंना मारुन टाकतो, (३) निकृष्ट अन्नाच्या 'अम्मो'ला मारुन टाकतो (४) रोबोला निकृष्ट  अन्नाकडून मारुन टाकतो (५) रोबो निकृष्ट अन्नाचा मारा अवतारावर करतो.  तिसरे उद्दिष्ट, खेळणारा विद्यार्थी पदार्थांच्या निवडीत कितपत स्वारस्य दाखवतो याची तपासणी करण्याचा होता.  

संशोधकांनी प्रयोगानंतर दोन गटांची तुलना केली आणि त्यांना असे दिसून आले की हा खेळ खेळल्यावर मुलांच्या सकस पदार्थांबाबतच्या आकलनात चांगलाच फरक दिसून येतो. खेळ खेळल्यानंतर त्यांना कुठले पदार्थ सुदृढ बनवतात ते त्यांच्या लक्षात आले आणि त्याचा परिणाम त्यांनी चांगले पदार्थ निवडण्यात झाल्याचे दिसून आले. अर्थात दोन सत्रांमध्ये खेळल्यानंतर, तसेच खेळाच्या विविध पायर्‍या खेळून झाल्यावरही या आकलनात विशेष फरक पडला नसल्याचेही आढळून आल्याचे ते नमूद करतात. कदाचित एकूण खेळाचा वेळ केवळ ४० मिनिटांचाच असल्याने असे झाले असावे असे मत ते व्यक्त करतात. दुसर्‍या उद्दिष्टांची चाचणी करताना विद्यार्थ्यांच्या खेळण्याच्या पद्धतीत फार मोठा फरक असल्याचे जाणवले. काही विद्यार्थी खेळाच्या केवळ २ पातळ्याच पार करु शकले तर काही २३! तसेच त्यांनी खेळताना विविध पर्याय निवडले. त्यात कुठलाही एक आकृतीबंध होता असे दिसून आले नाही. काहींच्या खेळात अनपेक्षितपणे रोबो निकृष्ट अन्नाचा मारा अवतारावर करतानाही आढळून आला, तर अनेकांना पुढे कुठला पर्याय निवडावा याचे आकलन झाले नाही. तिसर्‍या उद्दिष्टाचा अभ्यास केला तेव्हा हा खेळ खेळणार्‍या मुलांना अप्रत्यक्षपणे कुठले पदार्थ सकस आणि कुठले निकस याचे उत्तम शिक्षण मिळाले आणि त्याचा परिणाम  त्यांच्या पदार्थ निवडीच्या सवयीवर झाला. हा अभ्यास भारतीय शाळांमधूनही केला गेला. 

विविध औषधांच्या गोळ्या देऊन मुलांचे आरोग्य सुधारण्याऐवजी पुढे चालून त्यांच्या जीवनपद्धतीत अप्रत्यक्षरित्या, खेळातून मुलांना असे शिक्षण दिले गेले तर ते जास्त परिणामकारक ठरु शकते आणि हाच पर्याय भविष्यात वापरला जाईल असा संशोधकांना विश्वास वाटतो. या पर्यायाला ते 'डिजीटल व्हॅक्सिन' म्हणजे संगणकीय लसीतून त्यांचे आरोग्य सुधारता येणे शक्य असल्याचे म्हणतात.

संदर्भ: Kato-Lin, et al. Impact of pediatric mobile gameplay on healthy eating behavior. JMIR mHealth and uHealth. 8(11); 2020; e15717. https://doi.org/10.2196/15717

-----------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या १९ ऑक्टोबर २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.






गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

असंसर्गजन्य विकारांतून पडणारा आर्थिक बोजा / Burden of Non-communicable Diseases

रोग आणि विकार हे शब्द सहसा एकमेकाला पूरक असे वापरले जातात, पण त्याला विशिष्ट अर्थ आहे. म्हणजे असे की बाह्य किंवा अंतर्गत घटकांना शरीराने दिलेल्या प्रतिसादाला रोग म्हणतात. यातले बरेचसे संसर्गजन्य असतात. पण इतरांपासून अथवा वातावरणाचा परिणाम न होताही शरीरात अशा काही व्याधी निर्माण होतात त्यांना 'विकार' असे म्हटले जाते. शरीराच्या सर्वसाधारण कार्यांमध्ये व्यत्यय आला की तो विकार समजला जातो. हे असंसर्गजन्य असतात. काही प्रमाणात जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तंबाखूचे सेवन, मद्यपानात वाढ आणि वाढते शहरीकरण यामुळे भारतात असंसर्गजन्य विकारांनी ग्रस्त अशा रोग्यांची संख्या वाढत असल्याचे एक निरीक्षण सांगते. अशा विकारांमुळे आलेले आजारपण दीर्घकाळ टिकते आणि त्यावरील उपचारांसाठी कौटुंबिक खर्चात भरीव वाढ होते आणि रुग्णांची काळजी घेण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच सेवा देण्याची सज्जता ठेवण्याचा भार आरोग्य सेवेवर पडतो. हे विकार शारीरिक, मानसिक किंवा अनुवांशिक कारणांमुळेही असू शकतात. जगभर या विकारांनी ग्रस्त होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते. भारतात या विकारांमुळे हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागणार्‍या रुग्णांचे प्रमाणही २९ टक्क्यांवरुन (२००४ साली) ३८ टक्क्यांपर्यंत (२०१४ साली) पोहोचले. यामुळे सार्वजनिक आरोग्य सुविधांवर ताण तर येतोच पण महत्त्वाचे म्हणजे असे विकार झालेल्या कुटुंबांच्या उत्पन्नातला मोठा भाग याच्या निवारणासाठी खर्च करावा लागतो. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या संशोधकांनी २०१७-१८ साली झालेल्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातून गोळा केलेल्या माहितीतील २२ राज्यांतील विकारांनी ग्रस्त असलेल्यांचे राज्यनिहाय विश्लेषण करुन एक लेख काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केला तो चिंतनीय आहे. या सर्वेक्षणादरम्यान एकूण १ लाख १४ हजार परिवारांतल्या ५ लाख ५५ हजार व्यक्तींची माहिती गोळा केली गेली. त्यात २४ हजार परिवारांमधून २८ हजार जणांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागलेल्यांच्या माहितीचा वापर केला. त्यांना झालेल्या विकारांमध्ये कर्करोग, रक्तदाब-हृदयविकार, पक्षाघात (लकवा), मधुमेह, श्वसन विकार, स्नायू आणि अस्थि विकार, अपस्मार, मनोविकृति, जननमूत्र संस्थेचे विकार, दृष्टी आणि इतर इंद्रिय विकार अशा १० विकारांचे प्राबल्य होते. 

सामाजिक स्तरावर याचे मोजमाप करायला जी एकके केली आहेत त्यातले एक म्हणजे आजारपणामुळे आयुष्याची गमावलेली वर्षे (इयर्स ऑफ लाईफ लॉस्ट - वायएलएल). या अकाली मृत्यूच्या मोजमापात विकारांमुळे एकूण मृत्यू पावलेल्यांची संख्या आणि त्यांचे वय या दोन्ही बाबी विचारात घेतल्या जातात. तर एखादी व्यक्ती अशा विकारामुळे येणार्‍या परावलंबनात किती काळ जगली (ईयर्स लिव्हड विथ डिसॅबिलिटी - वायएलडी) हे मोजण्याचे आणखी एक एकक. या दोन्हींची बेरीज म्हणजे परावलंबनामुळे वाया गेलेला काळ (डिसॅबिलिटी-अ‍ॅडजेस्टेड लाईफ ईयर्स - डीएएलवाय) आजारपण, अपंगत्व किंवा अकाली मृत्यूमुळे गमावलेल्या वर्षांची संख्या यातून व्यक्त केला जातो. 

२०१७ साली भारतात अशा विकारांनी ग्रस्त होऊन सुमारे ४७ लाख लोकांचा मृत्यू तर झालाच पण परावलंबनामुळे आणि मृत्यूंमुळे एकूण २ कोटी २६ लाख वर्षं वाया गेली. वर्षं वाया जाणार्‍यांत पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त होते तर स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक काळ परावलंबनात जगल्या. श्वसन विकाराचा अपवाद केला तर स्त्रियांचा क्रमांक इतर सगळ्या विकारांत पुरुषांपेक्षा आघाडीवर होता. कर्करोगात तर त्यांचे प्रमाण पुरुषांपेक्षा १२ पटीने अधिक होते. यात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे, जुनाट श्वसन रोग, कर्करोग आणि पक्षाघात ही प्रमुख कारणे होती आणि यापैकी ६५% मृत्यू ७० वर्षे वयाखालील लोकांचे आहेत. राज्यनिहाय विभागणी केली तेव्हा सर्वाधिक हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे विकार पंजाब आणि त्या खालोखाल कर्नाटकामध्ये आढळून आले. कर्करोगाने ग्रस्त व्यक्ती सर्वाधिक केरळात आणि त्यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये आढळून आल्या. 

सर्वेक्षणातून असे दिसून येते की या विकारांसाठी ५०-७०% व्यक्ती उपचारांकरता खाजगी आरोग्य सुविधांकडे धाव घेतात. विशेषतः महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि पंजाबातल्या ७०-८०% रोग्यांनी खाजगी आरोग्य सुविधांचा आसरा घेतला. पूर्वोत्तर राज्यांमध्ये मात्र, विशेषतः अरुणाचल प्रदेशात, सार्वजनिक आरोग्य सुविधांचा वापर करण्याकडे कल दिसून आला (आकृती).

आकृती: राज्यनिहाय आरोग्य सुविधांचा वापर: AN =  अंदमान आणि निकोबार द्विप, AP = आंध्र प्रदेश, AR = अरुणाचल प्रदेश, AS = आसाम, BR= बिहार, CN= चंदीगड, CG= छत्तीसगड, DA = दादरा नगर हवेली, DD = दमण आणि दीव, GO = गोवा, GJ = गुजरात, HR= हरयाणा, HP= हिमाचल प्रदेश, JK = जम्मू आणि काश्मीर, JH = झारखंड, KT= कर्नाटक, KL=  केरळ, LD = लक्षद्विप, MP = मध्य प्रदेश, MH = महाराष्ट्र, MN = मणिपूर, MH = मेघालय, MZ = मिझोराम, NL= नागालँड,  DL = दिल्ली, PN= पुदुच्चेरी, PB=  पंजाब, RJ = राजस्तान, SK= सिक्कीम, TN = तामिळ नाडू, TG = तेलंगण, TP = त्रिपुरा, UP= उत्तर प्रदेश, UK= उत्तराखंड, WB= पश्चिम बंगाल, OD= ओडिशा 

हे विकार सामान्यांच्या खिशाला मोठेच छिद्र पाडतात. यावर होणारा खर्च जर त्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नापैकी १० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च या विकारांच्या निवारणाकरता होत असेल तर तो त्यांच्यासाठी 'आपत्तीजनक' च / न पेलवणारा समजला जातो. या खर्चात थेट वैद्यकीय खर्च (हॉस्पिटलचे शुल्क, औषधे, डॉक्टरांची फी इत्यादी) आणि अनुषंगिक वैद्यकीय खर्च (हॉस्पिटलमध्ये जाण्या-येण्याकरता केलेली वाहन सेवा, रुग्णाबरोबर सोबत करणार्‍यावर केलेला खर्च इत्यादी) याचा अंतर्भाव होतो. आरोग्य विमा उतरवलेला असेल तर त्यातून मिळणारा परतावा एकूण खर्चातून वजा केला जातो. या अभ्यासादरम्यान असे दिसून आले की भारतात खाजगी आरोग्य सुविधांवर होणारा खर्च हा सार्वजनिक आरोग्य सुविधा वापरणार्‍यांच्या खर्चापेक्षा सुमारे पाच पट अधिक आहे (तक्ता). कर्करोगावर होणारा खर्च हा सर्वाधिक आहे. त्याखालोखाल अनुक्रमे श्वसन विकार, जननमूत्र संस्थेचे विकार, दृष्टी दोष, स्नायू आणि अस्थि विकारांचा क्रमांक लागतो. सुमारे ७५% परिवारांना, विशेषतः पूर्वेकडील आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये, हा भार पेलवण्यापलिकडचा होता. त्यातल्या त्यात कर्नाटक, आंध्र आणि गुजरातेत परिस्थिती बरी होती. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये पक्षाघाताने ग्रस्त असलेले रुग्ण सर्वाधिक आढळून आले. पण पंजाब सोडला तर इतर राज्यांमध्ये पक्षाघाताने होणार्‍या विकारावरील खर्चाचा भार सुसह्य असल्याचे आढळले. 

तक्ता: विकारानुसार सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवेवर होणारा खर्च 

संशोधकांनी कुठल्या विकारामुळे आयुष्याची सर्वाधिक वर्षे गमावली जातात आणि वाया गेलेल्या काळाचाही अभ्यास केला. रक्तदाब-हृदयविकारामुळे सर्वाधिक वर्षंं भारतात गमावल्याचे आढळून आले. कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूंचा क्रमांक हृदयरोगामुळे होणार्‍या मृत्यूंनंतर लागतो पण त्यावर सर्वाधिक खर्च होतो. स्नायू आणि अस्थि विकारांच्या वैद्यकीय उपचारांना होणार्‍या खर्चावर विमा कंपन्यांना सर्वाधिक परतावा द्यावा लागत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. 

हा अभ्यास भारतीयांच्या सामाजिक परिस्थितीवर झगझगीत प्रकाश पाडतो. तसेच यातून विविध राज्यांमध्ये असलेल्या सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधांच्या उपलब्धतेचे दर्शनही काही प्रमाणात घडते. या विकारांमुळे आरोग्य सुविधांवर होणारा खर्च अनेकांना न परवडणारा असल्याचे दिग्दर्शनही त्यातून होते. भारतात आरोग्य सुविधांवर होणारी शासकीय गुंतवणूक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या केवळ १% आहे. इतर देशांशी तुलना (अमेरिका ८.६%, ब्राझिल ४%, चीन २.९%) केली तर ती अतिशय तोकडी वाटते. यामुळे भारतात खाजगी आरोग्य सुविधांनी पाय पसरल्याचे दिसून येते पण त्यामुळे नागरिकांच्या खिशाला फार मोठा भार सहन करावा लागतो. अशा विकारांवर उपाय करणे एवढेच देशाचे ध्येय नसावे तर विकारांचे प्रमाण अल्प असावे या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दिसून येते. या विकारांचे त्यांच्या सुरुवातीच्या काळातच निदान करता आले तर यावर होणार्‍या खर्चाला आळा बसू शकतो त्याकरता यासंबंधी जागरुकता वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. मोबाईल फोन्सवर मधुमेह, तंबाखू सेवन मुक्ती, तणाव मुक्तीसाठी अनेक  अ‍ॅप्स उपलब्ध आहेत त्याचा वापर करायला नागरिकांना उद्युक्त करायला हवे. सार्वजनिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा आणि विमा योजनांचा प्रसार आयुष्मान भारत योजनेखाली मोठ्या प्रमाणात झाला तर त्याचाही काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो असे संशोधक म्हणतात.  

संदर्भ: Menon, G.R., et al. Burden of non-communicable diseases and its associated economic costs in India. Social Sciences & Humanities Open. 5(1); 2022; Article ID 100256. https://doi.org/10.1016/j.ssaho.2022.100256 

-----------------------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या १२ ऑक्टोबर २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.






शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

'एमआरआय' मध्ये आत्मनिर्भरता / Self-reliance in making MRI

कुठल्याही कारणाने शरीराच्या आतल्या भागांना दुखापत झाली तर आजकाल डॉक्टर्स प्रथम एक्स-रे काढायला सांगतात. क्ष-किरणांचा वापर करुन आपल्या शरीरातील हाडांच्या ठेवणीचे छायाचित्र काढता येते ज्यामुळे दुखापतीचे निदान करणे सोपे जाते. एक्स-रे चा शोध १८९५ साली लागला आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठीच क्रांती झाली. त्यामुळे अस्थिभंग (हाड तुटणे), हाड त्याच्या जागेवरुन सरकणे, त्याच्या रचनेत बदल होणे या बाबींना समजणे सोपे गेले आणि त्यावर उपचार करायला डॉक्टरांना एक निश्चित दिशा मिळाली. यानंतर सुमारे पंचाहत्तर वर्षांनी आणखी एक उपकरण वैद्यकीय निदानासाठी उपलब्ध झाले त्याला 'सीटी-स्कॅन' या नावाने ओळखले जाते. या उपकरणात संगणक नियंत्रित किरणांचाच वापर करुन शरीराच्या अंतर्भागाचे चित्रण लंबच्छेदाने केले जाते (म्हणून याला काँप्यूटराइझड टोमोग्राफी - लघुरुपात 'सीटी' म्हणतात, टोमोग्राफी - माध्यम भेदून आतले चित्रण). या उपकरणाने काढलेले छायाचित्र शरीराच्या सर्व बाजूंनी (३६० अंश कोनातून) घेतले जाते आणि त्यामुळे अधिक बारकाईने हाडांचे निरीक्षण करता येते. या चित्रणात रक्ताच्या गुठळ्या किंवा इतर अवयवांना झालेली इजाही काही प्रमाणात दिसू शकते. यानंतर लगेचच, म्हणजे १९७७ साली, आणखी एका उपकरणाचा शोध लागला, लघुरुपात त्याचे नाव  'एमआरआय' (मॅग्नेटीक रेझोनन्स इमेजींग). यामध्ये क्ष-किरणांऐवजी चुंबकीय अनुकंपनाचा वापर करुन शरीरातील अवयवांचे चित्रण करण्यात येते. चुंबकीय अनुकंपनातून निघालेल्या लहरी शरीरातील प्रोटॉन्सवर आदळतात आणि त्यांचे अतिशय तपशीलवार चित्रण करतात. या चित्रणामध्ये उती, नसा, रक्तवाहिन्याही दिसू शकतात. कुर्चांची (कार्टिलेज) झीज, जोडांमध्ये आलेली सूज, दाबलेल्या नसा, फाटलेले किंवा वेगळे झालेले अस्थिबंध (लिगामेंट्स) आणि स्नायूबंध (टेंडॉन्स), शरीराच्या कण्यातील दोष बारकाव्यांसहित या चित्रणातून नजरेस येतात. एमआरआयची दोन यंत्रे सध्या अस्तित्वात आहेत, एक दीड टेस्ला तर दुसरे तीन टेस्ला शक्तीचे. चुंबकीय शक्ती मोजायला 'टेस्ला' या एककाचा वापर केला जातो. एक टेस्ला पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी गुरुत्वाकर्षणापेक्षा अंदाजे ३०,००० पटीने अधिक असते. म्हणजे एमआरआयमध्ये किती मोठ्या प्रमाणात चुंबकीय शक्ती वापरली जाते याची कल्पना यावी. तरीही ३ टेस्ला शक्तीचे एमआरआय १.५ टेस्ला पेक्षा अधिक बारकाव्याने चित्रण करते म्हणून ते चांगले असेच म्हणता येणार नाही. कारण एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हाडाला जोडणार्‍या धातूच्या प्लेट्स, स्क्रू, हृदयाचे ठोके व्यवस्थित पडावेत म्हणून बसवलेला पेसमेकर, कृत्रिम गुडघे, अशी बाह्य आरोपणे बसवलेली असतील तर या अधिक मात्रेने देण्यात येणार्‍या चुंबकीय अनुकंपनाचा विपरित परिणाम त्या आरोपणांवर होऊ शकतो शिवाय ते समग्र चित्रणाला अडथळाही निर्माण करते. म्हणून सर्वसाधारणपणे १.५ टेस्ला शक्तीचे एमआरआय वापरात आहेत.

छायाचित्र स्रोतः https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/2/24/MRI_1.5_Tesla.jpg

एमआरआय यंत्रामधले चुंबक हा त्याचा महत्वाचा भाग. भारतात एमआरआयला लागणार्‍या अतिसंवाहक (सुपरकंडक्टिंग) चुंबकांची आयात करावी लागते. या आयातीवर सुमारे १८०० कोटी रुपये दरवर्षी खर्च होतो. या किमतीमुळे एमआरआय उपकरणांची संख्या भारतात मर्यादित आहे. विकसित देशात दहा लाख लोकसंख्येमागे सुमारे ३० उपकरणे उपलब्ध आहेत तर भारतात दोन उपकरणेही नाहीत अशी परिस्थिती आहे. यांची संख्या वाढवायची असेल तर 'आत्मनिर्भर'तेला पर्याय नाही. यादृष्टीने गेली काही वर्षे यावर अनेक संस्थांच्या सहभागाने संशोधन चालले होते आणि त्याला आता यश येत असल्याची चिन्हे दिसत आहेत त्याचा हा आढावा. या संशोधनात दिल्लीतले अंतर-विद्यापीठीय त्वरक (अ‍ॅक्सलरेटर) केंद्र, मु़ंबईची प्रायोगिक सूक्ष्मतरंग इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था (समीर), कोलकाता आणि थिरुवनंतपूरम येथील प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) शाखा, बंगळूरुतील ज्ञानदा सागर संस्थेचा प्रामुख्याने सहभाग आहे. यातील दिल्लीतल्या अंतर-विद्यापीठीय त्वरक (अ‍ॅक्सलरेटर) केंद्रावर एमआरआयला लागणारे चुंबक बनवण्याची जबाबदारी सोपवली गेली होती ती त्यांनी नुकतीच पार पाडली आहे.

त्यांनी द्रवरुपातील हेलियम वापरुन १.५ टेस्ला क्षमतेचे अतिसंवाहक चुंबक तयार केले. चुंबकीय क्षेत्र निर्माण करताना त्या परिसरात प्रचंड उष्णता निर्माण होते त्याचा परिणाम रुग्णावर होऊ नये म्हणून खूप कमी तापमान राखण्याची सोयही त्यात करण्यात त्यांना यश आले आहे. यात विद्युतचुंबकीय, विद्युत, औष्णिक, संरचनात्मक, निम्नताप अभियांत्रिकी ज्ञानाचा कस लागला आहे. या चुंबकात ४.२ केल्वीन पर्यंत तापमान राखले जाईल यासाठी तांबे, निओबियम-टिटॅनियम धातूंच्या मिश्रणातून बनवलेल्या आठ अतिसंवाहक वेटोळ्यांचा (कॉइल्स) वापर केला आहे. रुग्णाला झोपवायला सुमारे ६५ सें.मी. व्यासाची नळी, ज्याला बोअर म्हणतात, आहे तर एकूण नळीचा व्यास ९० सें.मी. एवढा आहे. या सुमारे ५ फूट लांबीच्या नळीभोवतीचा भाग चुंबकीय क्षेत्राखाली येतो ज्यायोगे रुग्णाच्या शरीराच्या कुठल्याही भागाचे चित्रण करता येणे शक्य होते. ६५ ते ९० सें.मी. दरम्यानच्या भागात तापमान नियंत्रित केले जाते.

वस्तुतः असे चुंबक तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचे मालकी हक्क बोटावर मोजता येतील इतक्याच परदेशी उत्पादकांकडे आहेत त्यामुळे त्यांच्या किमती आवाक्याबाहेर पोहोचल्या आहेत. या संशोधनामुळे आता याचे देशी उत्पादन घेऊन त्या स्वस्तात उपलब्ध करुन देण्याची सोय होणार आहे आणि त्यामुळे आरोग्यसेवा सामान्यांच्या आटोक्यात येतील. काही वर्षांपूर्वी मोजक्या देशांची मक्तेदारी मोडून भारताने क्रायोजेनिक इंजिन बनवणार्‍या देशांच्या पंगतीत आपले स्थान निश्चित केले तेव्हा जगातील संशोधक अचंबित झाले होते. त्याच प्रकारे हे संशोधनही तितकेच महत्त्वाचे गणले जाते. याचे व्यावसायिक उत्पादन भारताला परदेशी चलनही मिळवून देईल असा संशोधकांना विश्वास वाटतो. या चुंबकावर अखेरचा हात फिरवून सगळ्या चाचण्या पूर्ण केल्यावर ते समीर, मुंबईच्या संशोधकांकडे एमआरआय च्या इतर भागांशी जोडून कार्यान्वित करण्यासाठी सोपवले जाईल. हा प्रकल्प २०२३ मध्ये पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे.

संदर्भः (पहिल्या संदर्भाखाली या संशोधनानिमित्त प्रकाशित झालेल्या अनेक लेखांची यादी दिलेली आहे).

  1. Development of a 1.5 T Actively-shielded Superconducting MRI Magnet System ( MeitY-funded IMRI project) https://www.iuac.res.in/imri
  2. Uttar Pradesh: India's 1st indigenous MRI machine is here..thanks to Allahabad University professor and team. http://timesofindia.indiatimes.com/articleshow/94080675.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

------------------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या ५ ऑक्टोबर २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.