सोमवार, ७ जानेवारी, २०१३

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बुरख्याखालील दिखाऊ सुरक्षा व्यवस्था

एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुण्यांना भेटायला जाण्याचा योग नुकताच आला. हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वाराशी माझी गाडी अडवून तिच्याखाली मागून एका चाकावर लावलेला आरसा दांडयाच्या आधाराने फिरवला गेला, डिकी उघडून पुन्हा लावली गेली आणि पुढे जाण्यासाठी गाडीवर थाप पडली. मी मागे वळून भोळसट भाव चेहर्‍यावर आणून विचारले, "काय पाहिलेस रे?", "साब बॉम्ब फिट किया है क्या देखनेकी आर्डर है". मी पुन्हा प्रश्न विचारला, "बॉम्ब कसा असतो रे"? सुरक्षा कर्मचारी ओशाळं हसला आणि मला पुढे जा म्हणाला तोवर माझ्या मागची वाहनं हॉर्न वाजवायला लागली होती. बॉम्बच लावून मला माझं वाहन आत न्यायचं असेल तर तो मी गाडीच्या मागेच लावला पाहिजे असं काही असतं का? अर्थात तेही मला माहीत नाहीये. कारण मी दहशतवादी नाहीये. पण अशा प्रकारच्या तपासण्या आजकाल जागोजाग केल्या जातात. 'भाबड्या' दशहतवाद्यांना वाटावं की आपला इथे काही पाड लागणार नाही असा हेतू असतो की काय न कळे!

स्थळ विमानतळ. इथे तर अनेक सुरक्षा 'सर्कशीतून' जावे लागते. इतर प्रवासात प्रवाशांची एवढी 'सुरक्षा चंगळ' केली जात नाही. विमान प्रवास करणारे सगळेच व्हीआयपी असतात असे अजूनही यंत्रणांना वाटते की काय न कळे. तरी शशी थरूरनी सांगून झालंय की इथेही 'कॅटल क्लास' असतो ते. असो. पहिला मुजरा घडतो तो वाहनातून विमानतळावर शिरण्याअगोदरच. आडव्या तिडव्या लावलेल्या बॅरिकेड्समधून वाहनाचा वेग कमी करत ते पुढे काढावे
लागते. पुढे लगेचच एक सुरक्षा आधिकारी असतो. वाहनाची काच ड्रायव्हरने किंचीतशीच खाली केली की तो आत एक दृष्टिक्षेप टाकून लगेच पुढे जायची खूण करतो. आणि आता येथपासून आपण खूपच सुरक्षित आहोत अशी समजूत करुन घ्यायला हरकत नसते.

नुकत्याच माझ्या वाचनात आलेल्या विमान प्रवास सुरक्षेवरील डेव्हिड पग यांच्या एका लेखात (साइंटिफिक अमेरिकन, जुलै २०१२) त्यांनी विमान प्रवासावेळी घेतल्या जाणार्‍या सुरक्षिततेबाबतची खिल्ली उडवली आहे. त्यांचं तंत्रज्ञानावर विविध नियतकालिकांमधून स्तंभलेखन चालू असतं. ते सदर लेखात म्हणतात, "हे कालबाह्य नियम विमान प्रवास सुरक्षित करण्यात मदत तर करीत नाहीतच पण त्याची परिणती विमानतळांवर मोठमोठ्या रांगा लागण्यात होतेय". ११ सप्टेंबर २००१ च्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर जनजीवनावर फार मोठे परिणाम झाले - विशेषतः विमान प्रवासावर. त्या दिवसापासून अमेरिकन सरकारने कोट्यावधी डॉलर्स खर्च केले, नव्या नियमांचा अंतर्भाव केला आणि विमानप्रवासच कोलमडवून टाकला म्हणा ना! हे कायदे/ नियम विज्ञान आणि कारणमीमांसेवर अवलंबून असते तर टीकाकारांनी याला 'सुरक्षिततेचे नाटक' असे नांव दिले नसतं. या नाटकाच्या अंकांमध्ये प्रवाशांना आम्ही सुरक्षिततेसाठी काहीतरी करीत आहोत हे पटवण्याचाच जास्त दिखाऊपणा दिसून येतो. पग उदाहरणादाखल इलेक्ट्रॉनिक उपकरणांविषयी लिहितात. त्यांचं लिखाण मुख्यत्वेकरून जेव्हा आपण 'सुरक्षा तपासणी' च्या दरवाज्यावर पोहोचतो तिथलं आहे. (या नांवावरून असं समजायला हरकत नाही की आतापावेतो आपण सुरक्षित आहोत हा आपला भ्रम होता किंवा यंत्रणेला आपल्या सुरक्षेविषयी काही पडलं नाहीये. त्यांना त्यांच्या विमान, विमानतळ, वगैरे मालमत्तेची काळजी आपल्यापेक्षा सुरक्षेपेक्षा जास्त आहे आणि आपण दहशतवाद्यांपैकी एक आहोत की काय म्हणून आपली तपासणी होत आहे).

सामानाच्या स्क्रीनिंगच्यावेळी लॅपटॉप बॅगेतून काढून प्लास्टिक ट्रे मध्ये उताणाच ठेवला पाहिजे या वेडगळ नियमावर पग बोट ठेवतात. हा नियम फक्त लॅपटॉपनाच लागू होतो. टॅबलेट संगणक, फोन्स, इलेक्ट्रॉनिक खेळण्यांचे मॉनिटर्स, कॅमेरे मात्र यातून वगळले आहेत. असं का बरं? तर म्हणे लॅपटॉपसारखी मोठी उपकरणं बॅगेतील सामानाचे एक्स-रे करताना अडथळे आणतात! त्या नियमातही गंमत आहे. ११ इंची लॅपटॉप बॅगेतून काढला नाही तरी चालतो पण १३ इंची लॅपटॉप मात्र काढावा लागतो! अर्थात ही परिस्थिती अमेरिकेतली आहे. भारतात मात्र सरधोपट सगळ्यांनाच सगळ्याच प्रकारचे लॅपटॉप बाहेर काढून ट्रेमध्ये ठेवावे लागतात हा भाग वेगळा. आम्ही पाश्चात्यांचं अनुकरण करण्यात एक पाऊल पुढे असतो ना!

अमेरिकेत विमानतळाच्या इमारतीत शिरण्यापूर्वी मेटल डिटेक्टरच्या चौकटीतून जे आतापावेतो जावे लागे त्याची जागा आता सूक्ष्मतरंग लहरींमधून जायची उपकरणं घेत आहेत. याचा उद्देश तस्करीचा माल आणि धातूपासून न बनलेल्या शस्त्रास्त्रांचा शोध घेण्यासाठी होतो. पण प्रवासी हे यंत्र त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला आणणारे (सुरक्षेचे अधिकारी त्यांच्या स्क्रीनवर प्रवाशांना नग्न बघू शकतात म्हणून), कर्करोगास निमंत्रण देणारे आणि महागडे (प्रत्येक मशीनची किंमत सुमारे ९० लाख रुपये) आहेत म्हणून त्याचा निषेध करतात. शिवाय हे उपकरण वापरायला दुप्पट कर्मचारी, प्रवाशांना करावी लागणारी पूर्वतयारी (खिशातल्या सगळ्या जिनसा काढून ठेवाव्या लागतात - अगदी पैशाचे पाकिट आणि बोर्डिंग पासही) आणि नंतर स्कॅन या सगळ्याला सुमारे एक मिनिट (म्हणजे मेटल डिटेक्टरपेक्षा ६० पट अधिक वेळ) लागतो. याचा परिणाम असा की ज्या ठिकाणी अशी मशीन्स बसवली आहेत तेथील विमानतळावर देशी उड्डाणांसाठीही प्रवाशांना दोन तास आधी बोलावलं जातं. या वेळात किती कोटी डॉलर्सची उत्पादन तूट होतेय याचा कोणी विचारच केला नाहीये असं पग महाशय म्हणतात!

लिझ स्कली नावाच्या आयरीश स्त्रीनं  भारतात भटकताना बरीचश्या गंमतशीर पाट्यांची छायाचित्रं तिच्या ब्लॉगवर (http://www.madamletmetellyouonething.com/) संकलीत केली आहेत. त्यातील असंच एक छायाचित्र विमानतळावरील सूचनेसंबंधी आहे. "सुरक्षेच्या तपासणीनंतर आपण आपलाच मोबाईल न्या" (जणू काही सुरक्षा अधिकारी असं सुचवतायत की इथं तुमचे मोबाईल असुरक्षित आहेत आणि त्याला ते जबाबदार नाहीत)!

पग त्यांच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्राबाहेर जाऊन इतरही काही हास्यास्पद नियमांची उदाहरणे देतात. १०० मिली ग्रॅम पेक्षा जास्त द्रव पदार्थ प्रवाशाला सोबत न्यायला बंदी आहे. पण गंमत म्हणजे जर बाटली १०० मिली ग्रॅम पेक्षा मोठी असेल आणि त्यातील बरेचसे पेय संपलेले असेल तरी ती न्यायला परवानगी नसते! मात्र १०० मिली ग्रॅम पेक्षा कमी पण एकापेक्षा जास्त बाटल्या भरून असे अनेक प्रवासी गट एकच पदार्थ तो नेऊ शकतात. किंवा बाळाचे १०० ग्रॅम पेक्षा जास्त असे अन्न असेल (आणि तुमच्याबरोबर बाळ असेल) तरीही परवानगी आहे!

आणखी एका वेडगळ नियमाचे पालन काही वेळा करावं लागतं. गेल्या वर्षी युरोपला जाताना दुबईच्या विमानतळावर पायातले बूट काढून एक्स-रे स्कॅनर मधून तपासावे लागले. पण १२ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या प्रवाशांना मात्र या तपासणीतून सूट दिली होती!

२६/११ नंतर मी एकदा असाच आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करीत होतो. माझ्या बॅगेतून नेत असलेला नेलकटर मला सुरक्षिततेच्या कारणास्तव तपासणीवेळी टाकून द्यावा लागला. अनेक देशांतून एकत्र आलेले आम्ही असेच या सुरक्षिततेविषयी गप्पा मारत होतो. विनोदाने माझी एक सहाध्यायी म्हणाली की कदाचित पुढील प्रवासात तिची नखंही तपासली जातील आणि ती वाढलेली असल्यास प्रवासापूर्वी कापायला लावतील!

अशीच आणखी एक वेडगळ संकल्पना. विमानोड्डाणाच्या आणि उतरण्याच्या वेळी प्रवाशांनी त्यांच्याकडची इलेक्ट्रॉनिक उपकरणं अगदी हेडफोन्स, इ-बुक रीडर्सही बंद करण्याचा आग्रह. का तर म्हणे ही विमानाच्या नेव्हिगेशन मध्ये ती व्यत्यय आणतात. खरं पहाता यास ठोस शास्त्राधार नाहीये. तात्विक दृष्ट्या असे अनुमान केलं आहे की ही उपकरणं विमानाच्या इलेक्ट्रॉनिक्सवर परिणाम घडवून आणू शकतात पण आतापावेतो या कारणामुळे एकही अपघात झालेला नाहीये. म्हणजे विज्ञानाद्वारे पडताळणी न केलेल्या अशा अंधश्रद्धांद्वारे केलेला नियम प्रवाशांना वेठीस धरत असल्याचं दिसतं. भारतात मात्र गेल्या वर्षापासून या नियमात थोडी सूट देण्यात आल्याचे दिसतंय. विमान जमिनीला टेकल्याबरोबर आता मोबाईल चालू करण्याची परवानगी देण्यात येते. कारण कदाचित आता प्रवाशांनीच हा नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली आहे!

सुमारे बारा वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या प्रवास करायची संधी मिळाली होती. परतताना माझ्याबरोबरच्या एका सहाध्यायीने टॅक्सी ड्रायव्हरला विचारुन लंकेत मिळणारी रामबुटान नावाची फळं विकत घेतली. त्यावेळी एलटीटीईचा दहशतवाद जोरात होता. केसाळ आवरण असणार्‍या या फळाची चव बघायला आम्ही सगळेच उत्सुक होतो. टॅक्सीत आणि नंतर तिथल्या विमानतळावर इतक्या वेळा आमची आणि आमच्या सामानाची झडती झाली की ते फळ चाखायला वेळच मिळाला नव्हता. विमानात बसल्यावरच काय ती उसंत मिळाली मग माझ्या सहाध्यायीने तिच्या पर्समधील फळं कापायचा चाकू रामबुटान कापायला काढला. अनेकदा सामान एक्सरेतून गेलं, दोनदा झडती झाली आणि कुठेही आणि कुणालाही हा सापडला नव्हता! 'वा रे सुरक्षा व्यवस्था' असे एका बाजूला वाटलं आणि आता विमानात या बाईने हा चाकू काढला आहे तो कुणी बघीतला तर त्याचे परिणाम काय होतील या विचाराने मी मात्र सर्दच झालो.

२००९ मध्ये स्वाईन फ्लूच्या साथीने जोर धरला होता. भारतात येणार्‍या प्रवाशांना तो झाला आहे काय याची खात्री करून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर डॉक्टर्सची नियुक्ती केली गेली. अर्थात आमचे नेहमीच वरातीमागून घोडं असतं त्या पध्दतीनं. स्वाईन फ्लूचे किती तरी प्रवासी भारतात आले असण्याची शक्यता वर्तवल्यावर! किती रोगी या डॉक्टर्सना विमानतळांवर मिळाले याचा कुठे तपशील मिळत नाही. पण विमानतळावरील गर्दी वाढवायला मात्र हे एक निमित्त त्या दिवसात झालं असणार आहे.

तर असे हे दिखाउपणाचे नमुने. अमेरिकेत उघडपणे निषेध करण्याचा स्वभाव असणार्‍या प्रवाशांच्या वैतागण्याची सुरक्षारक्षकांना कल्पना आहे. याचा कधी तरी स्फोट होईल याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच आता ते नवे स्कॅनर्स प्रवाशांचे नग्न चित्र स्क्रीनवर पाठवले जात नाही तर यंत्रच त्याचे पृथक्करण करतात असे पटवून सांगत आहेत. काही विमानतळांवर ज्यांच्याबाबत फारशी शंका नाही अशा प्रवाशांची वेगळी रांग लावून त्यांचे कोट, बूट न काढता तपासणी केली जात आहे. तरी असे नियम फक्त विमान प्रवासासाठीच का? रेल्वे प्रवासासाठी का नाहीत (तेथे खरे पहाता प्रवाशांची संख्या शेकड्यांनी जास्त असते) असा प्रश्न पग महाशयांना पडतो हे सहाजिकच आहे. हे नियम निष्पापांना अतिरेक्यांपासून कितपत संरक्षण देऊ शकतात हा प्रश्नच आहे पण वैतागवाणे मात्र ठरतात हे मात्र नक्की.

विमानतळाच्या प्रवेशद्वारात विमानप्रवासात बरोबर कुठल्या-कुठल्या वस्तू वर्ज्य आहेत याची एक चित्ररुपात यादी आणि प्रत्येक वस्तूच्या चित्रावर लाल फुली मारलेली असते. या यादीत आपली अक्कलही (common sense) प्रवाशांनी बरोबर नेऊ नये याचा अंतर्भाव करावा आणि 'आल्या नियमास असावे सादर' याची प्रवाशांनी तयारी ठेवावी असं पग सुचवतात.

आभार: या लेखात वापरलेले छायाचित्र  लिझ स्कली यांच्या http://www.madamletmetellyouonething.com/ ब्लॉगवरून घेतलेले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हा लेख इत्यर्थ च्या ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा