आम्ही आमच्या दूरचित्रवाणीसंचाला जेव्हा डीटीएचची जोडणी घेतली तेव्हा कार्यक्रम पहाताना सुरुवातीला मला थोडा त्रास झाला. मालिकेतील पात्रांच्या ओठांच्या हालचाली आणि येणारे शब्द जुळत नाहीयेत असे वाटत होतं आणि त्यामुळे मालिकेत काय चाललं आहे याचे आकलन पट्कन होत नव्हतं. नंतर हा त्रास कधी आणि कसा संपला ते मात्र आठवत नाही. पण याची आठवण व्हायचं कारण म्हणजे नुकताच ’साईंटिफिक अमेरिकन’ या मासिकात प्रसिध्द झालेला कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या लॉरेन्स रोसेनब्लम्यांचा ज्ञानेंद्रियांच्या कार्यपध्दतीवरील लेख.
आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय – कान, डोळे, जीभ, नाक आणि त्वचा – असतात त्यायोगे आपण अनुक्रमे शब्द, रुप, रस, गंध आणि स्पर्श यांचं आकलन करू शकतो हे शाळेत असताना सुरुवातीच्या वर्गातच शिकवलं जातं. पण असं काही आहे का की शब्द समजण्याचं काम फक्त कानच करू शकतात? किंवा इतर इंद्रियही फक्त त्यांचंच नेमून दिलेली कामं करतात? प्रश्न थोडा विचित्रच वाटतो ना? पण लॉरेन्स रोसेनब्लम यांनी त्यांच्या लेखात याचं छान उत्तर गेल्या काही वर्षात झालेल्या संशोधनाच्या आढाव्यातून दिलंय ते थोडक्यात असं:
कर्णबधिर लोकांच्या एका संस्थेनं १९७० च्या दशकात त्यांच्या सदस्यांना गुप्तचर विभागात बोटांच्या ठशांचे त्यांच्या रचनेनुसार त्यांना वर्गीकरण करायचं काम दिलं. परंतु एका सदस्याने त्या नीरस कामातल्या सातत्याला कंटाळून ते करायला नकार दिला. तिला इतर काही काम देता येईल का याचा विचार करताना त्यांनी तिला दोन गुन्हेगारांच्या संभाषणाची चित्रफीत दाखवली. त्यांच्या ओठाच्या हालचालींवरून त्यांच्यातील संभाषणाचा उलगडा तिने सराईतपणे केला आणि एका नव्या संशोधनाला विषय मिळाला! तिचे डोळे शब्द समजावून घेण्याचे काम करत होते. म्हणजे ही ज्ञानेंद्रियं एकमेकाची कामं करू शकतात तर!
अभ्यासाअंती आता चेतासंस्थेसंबंधी संशोधन करणारे वैज्ञानिक या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले आहेत की कर्णबधीरच काय पण आपण सगळेच कानानी ऐकण्याच्या क्रियेबरोबर शब्द समजावून घेण्यासाठी ओष्ठ वाचनाची क्रियाही कळत नकळत करत असतो आणि त्यासाठी आपल्या डोळ्यांना कामाला लावतो. आपलं यावरचं अवलंबन मोठ्या प्रमाणात वाढतं जेव्हा बोलणार्या व्यक्तीचे उच्चार स्पष्ट नसतात किंवा आसपास बराच गोंगाट चालू असतो तेव्हाही. थोडक्यात काय तर जेव्हा आपले कान त्यांचे काम पूर्णपणे करायला असमर्थ ठरतात तेव्हा दुसरं इंद्रियं त्याच्या मदतीला धावून येतं. दुसर्या एका प्रयोगात असं आढळून आलं आहे की जी मुलं अंधत्व घेऊन जन्माला येतात त्या बालकांचं बोलणं उशीरा सुरू होतं. कारण त्यांना शब्दज्ञान होण्यासाठी केवळ कानावरच अवलंबून रहावं लागतं.
जेव्हा केव्हा एखादं इंद्रिय त्याच्या मूलभूत कार्यासाठी वापरलं जात नाही तेव्हा ते इतर इंद्रियांच्या मदतीला धावतं. आपल्या मेंदूच्या मागच्या भागावर व्हिजुअल कॉर्टेक्स नावाचं एक आवरण असतं. याचं मूलभूत कार्य म्हणजे डोळ्यांनी बघितलेल्या प्रतिमांचं आकलन करणं. पण हा भाग इतर इंद्रियांकडून आलेल्या माहितीचाही उत्तम प्रकारे अर्थ लावू शकतो. सुमारे ९० मिनिटं डोळे बंद करून बसा. व्हिजुअल कॉर्टेक्स आपलं नियत काम सोडून स्पर्शेंद्रियाच्या मदतीला धावतो. आपली त्वचा डोळे मिटून बसल्यास अतिशय संवेदनशील होतं असं म्हणतात – म्हणूनच ध्यान करायला बसलेल्या साधकांभोवती नसलेले डास जरा जास्तच फिरायला लागतात की काय कोण जाणे! अंध व्यक्तींना त्यांच्या आसपास होणार्या सूक्ष्म हालचाली लगेच कळतात हे तर आपल्यापैकी बर्याच जणांनी अनुभवलं असेल. त्यांचं व्हिजुअल कॉर्टेक्स या कामासाठी जुंपलं जातं असं लक्षात आलं आहे. हे केवळ अंधांच्या बाबतीत लागू होतं असं नाही तर मायोपिया झालेल्या व्यक्तीच काय पण अगदी गॉगल घालून बसलेल्या व्यक्तींबाबतही असं घडतं म्हणे!
इंद्रियांच्या परस्परावलंबित्वाच्या संशोधनाचा फायदा नव्या पध्दतीचे कानाच्या आतील भागात बसवायचे श्रवणयंत्र (कॉकलियर इंप्लांट) बनवण्यासाठीही झाला आहे. अशा प्रकारची श्रवणयंत्र आता भारतातही बसवून मिळतात. कमी ऐकू येणार्या ते अजिबात ऐकू न येणार्यांसाठी ही उपलब्ध आहेत. अर्थात ते जरा जास्त खर्चिक असल्यानं त्याचा वापर सर्रास सुरू झालेला नाहीये. पण कर्णबधिरांसाठी ही एक मोठीच देणगी आहे असे म्हणावं लागेल.
अर्थात अशा श्रवणयंत्राच्या वापरापूर्वी आणि वर उल्लेखलेल्या संशोधनापूर्वीही अंध आणि कर्णबधिर पूर्वापार चालत आलेल्या ’टाडोमा’ पध्दतीचा वापर करून समोरच्याचे बोलणे समजून घेत असत हे आपल्याला हेलन केलरच्या गोष्टीवरून माहीत आहेच. या पध्दतीत ही दुर्दैवी माणसं बोलणार्याच्या ओठांवर अंगठा, घशावर करंगळी आणि उरलेली तीन बोटं गालावर ठेऊन त्यांचं बोलणं समजून घेतात. त्यांची बोटं ओठांची होणारी हालचाल, घशातून निर्माण होणारी कंपनं, जबड्याची गती तसंच, तोंडातून बाहेर पडणार्या हवेचा अंदाज घेत त्याला शब्दरुप देत. अर्थात यातही स्पर्शेंद्रियाचा वापर बोलणं समजून घेण्यात होत होता असं दिसतं.
१९७६ मध्ये हेनरी मॅकगर्क यांनी ’मॅकगर्क इफेक्ट’ या नांवानं प्रयोगांती एक सिध्दांत मांडला. एखाद्याला चित्रफितीवरील ‘ग’ म्हणत असलेल्या चेहर्याचे मूकदृश्य दाखवले आणि त्याच वेळी चित्रफितीवरील तीच व्यक्ती ‘ब’ म्हणत असल्याच्या आवाजाचे ध्वनिमुद्रण ऐकवले तर ऐकणार्याला ते अक्षर ‘ड‘ असं ऐकू येतं. कारण ऐकणार्याचा मेंदू ‘ग’ म्हणताना होणार्या हालचाली आणि ‘ब’ चा उच्चार याचं एकात्मीकरण ‘ड’ असं करतो.
११९७ साली ऑक्सफर्ड विद्यापीठातील गॅमा कालवर्ट नांवाच्या संशोधकाने ओष्ठ वाचनाचा अनुभव नसणारेही बोलणार्याच्या ओठावर बोट ठेवून एक ते नऊ अंक बरोबर ओळखू शकतात हे दाखवून दिलं आहे.
ही उदाहरणं असं सिद्ध करतात की संभाषण कळायला मेंदूला फक्त कान हे एकच ज्ञानेंद्रिय पुरेसं नसून स्पर्श आणि डोळ्यांनाही तो त्यासाठी सहभागी करून घेतो.
एकाच इंद्रियाद्वारे अनेकांचे कार्य
याउलट असंही होतं की अनेक इंद्रियांद्वारे जे आकलन होणं अपेक्षित आहे ते एकाच इंद्रियाचा वापर करून होऊ शकतं. उदाहरणार्थ अनेक वेळा फोनवर ज्या ओळखीच्या व्यक्तीचा आवाज आपण ऐकतो ती व्यक्ती कोण आहे हे तिला न पहाता किंवा तिने स्वत:चे नांव न सांगताही आपण तिला ओळखून आपल्या मन:श्चक्षूसमोर आणू शकतो. म्हणजे, ऐकण्याबरोबर डोळ्याचेही काम अशावेळी कर्णेंद्रियच करीत असतं.
एका प्रयोगात ओळखीच्या व्यक्तींच्या बोलतानाच्या चित्रफिती घेतल्या गेल्या. त्या चित्रफितीतील चेहर्यात त्या व्यक्ती ओळखू न येण्याइतपत फेरफार केले. फक्त गाल आणि ओठ मात्र तसेच ठेवले. अशा आवाज/शब्द विरहित चित्रफिती त्यांच्या मित्रांना दाखवल्या गेल्या. मित्रांनी चित्रफितीतील व्यक्तीला सहज ओळखलं. आणखी एका प्रयोगात व्यक्तीचं बोलणं ध्वनिमुद्रित करून घेतलं आणि त्यात संगणकाद्वारे बनवल्या गेलेल्या चित्रफितींमधील पात्रांचा आवाज जसा असतो तसे फेरफार केले. ते त्यांच्या मित्रांना ऐकवले गेले आणि गंमत म्हणजे असे आवाजही कोणाचे हे त्यांच्या मित्रांनी ओळखलं. याचा अर्थ असा की असे बदल केलेले शब्द आणि चेहरेही मेंदूला ओळखता येतात. ओळखीच्या माणसांचा आवाज मेंदूच्या फ्यूसिफोर्म गायरस मध्ये कार्यरत होतो आणि मेंदू त्या व्यक्तीला ओळखण्याचं काम करतो.
ज्यांना ओष्ठवाचनाचा अनुभव नव्हता अशा व्यक्तींना तासभर आवाज नसलेली चित्रफित दाखवली. त्यानंतरच्या फेरीत त्यांना चित्रफितीत जे बोललं गेलं होतं तेच संभाषण अर्ध्या गटाला त्याच व्यक्तीच्या आवाजात गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ऐकवलं गेलं तर उरलेल्या अर्ध्या गटाला तेच संभाषण दुसर्या व्यक्तीच्या आवाजात ऐकवलं गेलं. ज्या व्यक्तीची चित्रफित दाखवली गेली त्याच्याच आवाजातलं संभाषण ऐकणारा गट त्यातील वाक्य समजून घेण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला! असं का? तर आपला मेंदू अनेक इंद्रियांकडून येणार्या संदेशांचा योग्य प्रकारे मेळ घालून त्यातील अर्थ योग्य प्रकारे समजू शकतो.

बुद्धिभ्रम
गंध आणि चव यांचा जवळचा संबंध आहे. पण अभ्यासांती असं लक्षात आलंय की दृष्टी आणि आवाजही चवीवर परिणाम घडवून आणतात. संत्र्याचे सरबत जर लाल रंग घालून दिलं तर ते चेरीचं आहे असं पिणारा म्हणतो! याउलट चेरीचं सरबत पिवळा रंग घालून दिलं तर ते संत्र्यासारखं लागतं म्हणे!
बटाट्याच्या चिप्स, कुरकुरीत पापड खाताना जर ते मऊ लागले तर ते बेचव लागतात आणि खाल्ल्याचंही समाधान मिळत नाही.
धबधब्यासारखे सतत घरंगळणार्या पदार्थाकडे / वस्तूकडे सतत बघत राहिलं तर आपले हात खाली घसरताहेत असा भास होतो. सरळ उभं राहून जवळच्या वस्तुवर खिळवलेलं लक्ष एकदम दुसरीकडे लांबवर नेलं तर अशा अचानक बदलामुळे बघणार्याच्या अंगाची ठेवण (body posture) बदलते म्हणे!
अशी ही आपली इंद्रिय आणि त्याद्वारे होणारे आकलन.
आपली ज्ञानेंद्रिये पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. जसे कानाने आकाशाचा गुण जो शब्द, त्याचे ग्रहण होते, त्वचेने वायुचा जो गुण स्पर्श, तो अनुभवता येतो. डोळे तेजाच्या गुणाशी म्हणजे रुपाशी निगडीत आहेत तर जीभ पाण्याशी म्हणजे रसाशी संबंधित आहे आणि शेवटचे नाक त्याचा संबंध गंधाशी म्हणजे पृथ्वीशी असतो. हे सर्व आपण प्रत्यही अनुभवतो. ह्याचबरोबर भारतीय तत्वज्ञान हे ही सांगते की प्रत्येक महाभूतामध्ये इतर चौघांचाही समावेश असतो आणि हेच वरील अनुभवांचे प्रमुख कारण आहे. म्हणजे या इंद्रियांचे कार्य त्यांच्या मुख्य कार्यापुरतंच सीमित करणे हे मूलत: चुकीचेच म्हणावे लागेल हे आपल्या पूर्वसूरींना माहीत असावं असं वाटतं.

हा लेख दैनिक हेराल्डच्या २४ फेब्रुवारी २०१३ च्या अंकात (रविवारचे विचारधन) प्रसिध्द झाला आहे.
sarva mahiti khupach chan paddhatini sangitali ahe.Dhanyawad.
उत्तर द्याहटवा