सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

सारे भारतीय माझे बांधव आहेत.... / Genetic evidence for recent population mixture in India

डीएनए किंवा डीऑक्सिरायबोन्युक्लिक अ‍ॅसिड हा अनुवंशिकता सांगणारा मानवाच्या किंवा प्रत्येक जीवाच्या पेशींमधील एक अविभाज्य घटक आहे. १९८०च्या दशकात डीएनए चा उपयोग गुन्हेगार ओळखणं, वंश संबंध सांगणं, वगैरे कामांसाठी व्हायला लागला आणि ही पध्दत आपल्या सगळ्यांनाच वर्तमानपत्रात 'असल्या' बातम्या वाचून ओळखीची झाली. आनुवंशिकता विज्ञानाची (जेनेटिक्स) समाजाला याद्वारे मोठीच देणगी मिळाली. आपल्याला आपले पूर्वज कोण याचं मोठंच कुतूहल असतं. धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी तेथील पुरोहित त्यांच्याकडील नोंदी पाहून आपल्या वंशावळीची माहिती पूर्वी देत असत. आता ती पध्दत आहे की नाही हे माहीत नाही. ख्रिस्ती समाजात त्यांच्या चर्चमध्ये अशा नोंदी ठेवलेल्या असतात त्यावरून माझ्या एका मित्राने त्यांच्या कुटूंबाचा कुलवृक्ष तयार केला होता. पण ही साधनं आपल्याला काही पिढ्यांपर्यंतच मागे घेऊन जाऊ शकतात. म्हणून डीएनए सारखी साधनं वापरून शास्त्रज्ञ एखाद्या देशाचे पूर्वज कोण, त्यांची संस्कृती कशी होती, पूर्वी स्थलांतरं कशी झाली, वगैरे समजावून घेण्यासाठी उपयोग न करतील तर नवलच. गेल्या दोन दशकात याचा वापर करून अनेक बाबींचा उलगडा त्यांनी केला आहे.

भारतीय उपखंड हा तर प्राचीन संस्कृतीचा प्रदेश. आम्ही कोण? आमचे पूर्वज कोण? ते कोठून आले. त्यांच्या चालिरिती कशा होत्या हे समजावून घ्यायला भारतीयांनाच काय पण इतर अनेकांना त्याच्या प्राचीनतेमुळे त्यात रस आहे. तसंच संपूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या १/६ लोकसंख्या असलेल्या या खंडप्राय देशात समाज इतके धर्म, जाती, जमाती, भाषा, चालिरितीत विभागला आहे की यांचे पूर्वज कसे होते हे कळलं तर ते सामांन्यानाही मनोरंजक होऊ शकते. २००९ साली झालेल्या एका अभ्यासाद्वारे असं लक्षात आलं की आम्ही भारतीय दोन लोकसमूहांचे वंशज आहोत: उत्तर भारतीय पूर्वज - जे या उपखंडात ८००० वर्ष किंवा त्यापूर्वीच मध्यपूर्वेतून, मध्य आशियातून आणि युरोपमधून स्थलांतरित झाले, आणि दक्षिण भारतीय पूर्वज - याच मातीतले आणि पूर्वीपासून तुलनेने बरीच वर्ष इथेच अधिवास करणारे. या दोघांमध्ये रोटीबेटीव्यवहार नेमके कधी सुरू झाले हे जरी अद्याप पूर्ण स्पष्ट झालेलं नसलं तरी नुकत्याच प्रकाशीत झालेल्या (अमेरिकन जर्नल ऑफ ह्युमन जेनेटिक्स, खंड ९३, २०१३) एका अनुवंशशास्त्राच्या अभ्यासातून असे व्यवहार अतिशय व्यापक प्रमाणात या दोन लोकसमूहात होते असे लक्षात आलं आहे. प्राचीन इतिहासाच्या अंतरंगावर या अभ्यासाद्वारे टाकलेला हा प्रकाश मोठाच रोचक आहे त्याचा हा वृत्तांत!

हैद्राबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी यांच्या सहकार्याने हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी आधुनिक भारतीयांच्या अनुवंशिकतेचा सखोल अभ्यास केला. ७३ वंश आणि भाषिक गटांतून ५७१ जणांच्या अनुवंशिकतेची माहिती गोळा केली. यातील दोन वंश पाकिस्तानमधील (जो भाग स्वातंत्र्यापूर्वी भारतातच होता) आहेत. सांख्यिकीशास्त्रातील पध्दती वापरून याचं पृथक्करण त्यांनी केलं आणि त्यांच्यातील अनुवंशिक भेद शोधून काढले. गोळा केलेल्या जनूकांतील सुमारे ५,००,००० अनुवंशिक चिन्हांचा या पृथक्करणात समावेश आहे. त्या क्लिष्ट अशा माहितीतून आजच्या भारतीय संस्कृतीशी पूर्ण फारकत घेणारे, पण इतर पुरातत्वीय आणि भाषाशास्त्रीय संशोधनाशी ताळमेळ साधणारे, असे निष्कर्ष त्यांच्या हाती आले आहेत. सुमारे १९०० वर्षांपूर्वी या दोन लोकसमूहात बेटीव्यवहार होत होते आणि याचा मागोवा ४२०० वर्षापूर्वीपर्यंत जातो असं हा अभ्यास सांगतो. आजच्या वर्णविभागणीनुसार बघितलं तर असं दिसतं की यात उच्च वर्णाचे वंश गटही आहेत तसेच अगदी लहान वंश गटही. या अभ्यासात पठाणांमध्ये (आता पाकिस्तानात) उत्तर भारतीय पूर्वजांचं प्रमाण सर्वाधिक (७१%) तर दक्षिण भारतातील 'पनिया' या अतिशय लहान लोकसमूहातील गटातही उत्तर भारतीय पूर्वजांचं प्रमाण सर्वात कमी (तरी १७%) आढळून आलं आहे. याचाच अर्थ असा की उत्तर आणि दक्षिण भारतीय पूर्वजांचे बेटीव्यवहार इतक्या व्यापक प्रमाणात होते की त्यातून आजच्या कुठल्याही जाती/समूहाचे वंशज किंवा गट सुटले नाहीत.

निष्कर्षाप्रत आलेल्या माहितीतून एक सूक्ष्म निरिक्षण असं दाखवतं की तुलनेनं दक्षिण भारतीय वंशजांमध्ये हे संबंध फार पूर्वीपासून आढळतात. आंध्र प्रदेशातील मध्य वर्णात मोडेल अशा वैश्य वर्णातील पिढ्यांमध्ये या दोन्ही वंशाची ४१७६ वर्षापूर्वीची (सुमारे १४४ पिढ्यांपूर्वीची) चिन्हे आढळतात तर उत्तर प्रदेशातील उच्चवर्णीय ब्राह्मणांमध्ये तसंच 'धरकर' या भटक्या जमातीतील वंशजांमध्येही हे संबंध अनुक्रमे १८५६ आणि १८८५ वर्षापूर्वी (६४-६५ पिढ्यांपूर्वी) असल्याचं दिसून आलं आहे. सर्वसाधारणपणे अर्वाचीन उत्तर भारतातील वंशजांमधील जनूकांमध्ये यापेक्षा फारसे मागे हे संबंध आपल्याला घेऊन जात नाहीत. याचं एक कारण असं सांगितलं जातंय की उत्तर भारतीय पूर्वजांमध्ये सतत पश्चिमेकडून येणार्‍या युरो-आशियाई पूर्वजांशी इतक्या मोठ्या प्रमाणात मिश्रण झालंय की त्याचा परिणाम उत्तर आणि दक्षिण भारताच्या पूर्वजांच्या संबंधांच्या टक्केवारीवर ते करतं.

परंतू गेल्या १९०० वर्षाचं चित्र मात्र पूर्ण वेगळं आहे. उत्तर आणि दक्षिण भारताच्या पूर्वजांच्या बेटीव्यवहारात नाट्यमयरित्या बदल झालेला दिसून येतो. दोन मुख्य पूर्वजांच्याच काय पण अर्वाचीन भारतातल्या वेगळ्या वर्णातील पूर्वजांमध्येही बेटीव्यवहार झालेले दिसून येत नाहीत. यापुढील विवाह पूर्वीच्या पध्दतीना संपूर्ण फारकत देत केवळ स्थानिक समाजातच झालेले दिसून येतात. एकाच मानववंशातील आणि सामाजिक गटातील होणार्‍या अशा विवाहांना 'अंतर्विवाह' (एंडोगॅमी) असं संबोधलं जातं. व्यापक प्रमाणात पूर्वी होणारे बेटीव्यवहार ते आता एकाच वर्णातील, समाजातील असे व्यवहार इथपर्यंतचा प्रवास हे भारतीय उपखंडात जनसांख्यिकी रुपांतरण घडवून आणताना दिसतात.

याप्रकारचा मोठा बदलणारा आकृतीबंध दिसण्याचं कारण काय? भारतात १९०० ते ४२०० वर्षापूर्वीचा काळ हा अतिशय मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणणारा होता. क्रांतीच घडून येत होती म्हणा ना! १९०० ते २६०० वर्षापूर्वीच्या काळात भरभराटीत असलेल्या सिंधू संस्कृतीचा अस्त, गंगा नदीच्या मध्य आणि उताराच्या भागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्यावाढ, मृतांना मुठमाती देण्याच्या पध्दतीत बदल, वेदसंस्कृतीचा उदय, भारत-युरोपीय भाषाकुलाचा उदय, इत्यादि. ऋग्वेदात त्या काळी चार वर्णांचा उल्लेख जरी असला तरी जातीव्यवस्था आणि अंतर्विवाहाला त्यात स्थान नव्हतं. ते पुढील वाङमयात सापडतं. तसंच, पुरातत्वशास्त्र आणि भाषाशास्त्रातील अभ्यासही या पूर्वजांच्या रोटीबेटीव्यवहारांना पुष्टी देतात. सुमारे ८००० ते ९००० वर्षांपूर्वी उत्तर भारतात जव आणि गव्हाच्या लागवडीला सुरुवात झाली होती. ही पिकं पश्चिम आशियातून भारतात आली. तर दक्षिण भारतात मूग, हरभरा, भरड धान्याची (ज्वारी, बाजरी) पिकं घेण्याची कला अस्तित्वात असल्याचा सर्वात प्राचीन पुरावा सुमारे ४६०० वर्षांपूर्वीचा असल्याचं आढळतं. भाषाशास्त्रीय अभ्यासही संस्कृत, हिन्दी भाषांचा पश्चिम आशिया-युरोपीय भाषांशी साम्य दाखवतो. तर दक्षिणेतील भाषा मात्र कुठल्याही अभारतीय भाषांशी नातं जोडत नाहीत. पण या भाषांतील काही शब्द वेद वाङमयात (उदा. ऋग्वेद) मात्र दिसतात आणि ते उत्तर आणि दक्षिण भारतीय वंशजांच्या विचारांच्या आदान-प्रदानाचा सेतू बांधतात. पश्चिम आशिया, युरोपमधून भारतीय उपखंडात होणारं स्थलांतर, ८००० ते ९००० वर्षापूर्वीच्या शेतीत घेतली जाणारी पिकं, ४६०० वर्षापूर्वी बहरलेली सिंधू संस्कृती हेच दर्शवते की उत्तर भारतीय वंशजात स्थलांतरितांचाच फार मोठ्या प्रमाणात भरणा असणार. रोटी-बेटीव्यवहार हे स्थलांतरानंतर लगेचच होत नसतात. त्या संस्कृतींना आलेल्या स्थिरतेनंतरच हे शक्य आहे. अनुवंशशास्त्रानुसार वरील अभ्यासात उत्तर आणि दक्षिण भारतीय पूर्वजांच्या मिश्रणास अनुकूल असा काळ हा या स्थिरतेनंतरचाच आहे.

आम्ही भारतीय आज इतके धर्म, जाती, जमाती, भाषा, चालिरितीत जरी विभागले गेलो असलो तरी एक कसे याचे काहीसे उत्तर वरील विवेचनावरून मिळते असे वाटते. शेवटी आमचे रक्त एकच आहे. 



हा लेख लोकसत्तेच्या 'Sci इट' पुरवणीत ८ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रसिध्द झाला.

२ टिप्पण्या: