निसर्गाचं आकर्षण कोणाला नसतं? उंच पर्वतराजी असोत की गर्द हिरवी जंगलं किंवा समुद्रकिनारे. तासनतास इथं शांतपणे बसा. आजिबात कंटाळा येत नाही. निसर्ग आपल्याला भरभरून आनंद देत असतो. मग त्याच्या सान्निध्यात कंटाळ्याचा प्रश्नच येतो कुठे? पण बर्याच जणांना निसर्गाचं सौंदर्य कसं आस्वादायचं हेच कळत नाही आणि त्याची परिणती ते ओरबाडण्यात होते आणि ते विद्रूप व्हायला सुरुवात होते. गोव्याचे अथांग, स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारे असेच सगळ्यांना भुरळ घालतात. विदेशी नागरिक तर महिनोनमहिने येथे मुक्काम ठोकून असतात. भारतातल्या इतर भागातले नागरिकही संधी मिळताच गोव्यात पुनःपुन्हा यायला एका पायावर तयार असतात. त्यांच्या स्वछंद आणि 'स्वतंत्र' वागण्याचे विपरीत परिणाम निसर्गावर होत असतातच. पर्यटनाव्यतिरिक्त इतर उद्योगही निसर्गावर मोठे परिणाम घडवत असतातच. ६ जून २००० या दिवशी असाच एक घाला गोव्याच्या समुद्रकिनार्यावर पडला. 'एमव्ही रिव्हर प्रिंसेस' नावाचं प्रचंड मोठं, २५८ मीटर लांब आणि ३५ मीटर रुंदीचं, एक तेलवाहू जहाज वादळामुळे भरकटलं आणि कांदोळीच्या किनार्याजवळ ५ मीटर खोल पाण्यात येऊन रुतलं. जहाजाचा पुढचा भाग नैऋत्येला (दप) तोंड करून पुळणीपासून जवळच म्हणजे ३९० मीटर तर मागचा भाग १८७ मीटर अंतरावर होता. तेथून ते हलवण्यात अनेक मानवनिर्मित अडचणी येत गेल्या आणि एप्रिल २०१२ च्या अखेरीपर्यंत हे जहाज तेथेच मुक्काम ठोकून निसर्ग विद्रूप करण्यात आपला हातभार लावत उभं होतं. या दरम्यान तिथं घडलेल्या प्राकृतिक बदलांचा अभ्यास राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी करून नुकताच प्रसिध्द केला आहे (करंट सायन्स खंड १०५, वर्ष २०१३, पृष्ठ ९९०). अशी संकटं निसर्गावर कसा घाला घालतात याची माहिती वाचकांना आणि धोरणकर्त्यांना उद्बोधक ठरावी.
या वैज्ञानिकांनी या ठिकाणी वर्षभर वाहणार्या वार्यांचा, लाटांचा (wave) आणि त्यांच्या उंचीचा अभ्यास केला. प्रत्येक ऋतुनुसार वार्याची दिशा बदलत जाते हे आपल्याला माहीत आहेच, तर या ठिकाणच्या लाटांची उंची वर्षा ऋतुच्या दरम्यान (विशेषतः जुलैमध्ये) जेव्हा वारे दक्षिणेकडून पश्चिमेकडे वाहतात तेव्हा सर्वाधिक म्हणजे २.६ मीटर इतकी तर कमीत कमी उंची शिशिरात (फेब्रुवारीत) असते. जहाज ज्या भागात रुतलं तिथं तटीय प्रवाहही (littoral currents) मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. या सगळ्याचं विश्लेषण केलं तेव्हा असं दिसून आलं की हे महाकाय जहाज किनार्यावर येऊन आदळणार्या लाटांना आडवं येऊन अडथळे निर्माण करतंय. पश्चिमेकडून समुद्रावरुन किनार्याकडे येणार्या लाटा या जहाजावरच आपटून फुटतायंत. यामुळे या लाटा जेव्हा जहाजाने निर्माण केलेल्या आडोशाच्या भागात (जहाज आणि समुद्रकिनार्या दरम्यान) पोहोचतात तेव्हा त्या क्षीण होतात आणि त्यांच्यातली उर्जा कमी झाल्यामुळे तटीय प्रवाहही अतिशय अशक्त होतात. परिणामी त्या ठिकाणी तेथील वाळूची हालचाल न झाल्यामुळं आणि उत्तरेकडून तिथं वाळू येतच राहिल्यामुळं वाळूचा पट्टा (sand bar) निर्माण होऊन किनारा आणि जहाजादरम्यान एक उथळ मार्गच तयार झाला. ओहोटीच्या वेळी यावरून जा-ये करणं सुध्दा शक्य झालं होतं. तसंच जहाजाचा मागचा भाग किनार्याजवळ असल्यानं त्या भागात जास्तच वाळू साठत चालली.
किनार्यावरची अशी सागरतटीय प्रवाहाला अडथळे निर्माण करणारी घडण किनार्याच्या जवळच्या भागाची धूप होण्यासही कारणीभूत ठरते. याचाच परिणाम इथंही दिसायला लागला. जहाजाच्या आडोशाला वाळूची वाढ होत गेल्यामुळे तिचं दक्षिणेकडे होणारं विस्थापन थांबलं आणि जहाजाच्या दक्षिणेकडील सिकेरीच्या किनार्यावर होणारी धूप दिवसेंदिवस दृष्टीपथात यायला लागली. जहाज वेळेत न काढल्यामुळं हे परिणाम दिवसेंदिवस कसे वाढतात याचा एक धडाच यामुळे मिळाला म्हणा ना! आकृती १ मध्ये सिकेरीच्या किनार्यावर १९९९ ते २०११ च्या दरम्यान धूप कशी वाढत गेली ते उपग्रहाने पाठवलेल्या छायाचित्रातून स्पष्ट दिसतंय. (१९९९ चे छायाचित्र जहाज रुतण्यापूर्वीचा किनारा जो बर्यापैकी सरळ असल्याचं, तर २०११ च्या छायाचित्रात जहाजाच्या मागच्या टोकाजवळ झालेली वाळूची वाढ आणि पश्चिमेला किनार्याची झालेली धूप).
तर आकृती २ मध्ये २०११ च्या अखेरीस घेतलेल्या छायाचित्रात आवश्यक रंग भरून किनार्याची नेमकी किती धूप आणि जहाजाजवळ वाळूची किती वाढ झाली ते दाखवलंय. धूप झालेल्या किनार्याचा बारकाईने अभ्यास केला तेव्हा असं दिसून आलं की एका ठिकाणी एकूण ८५ मीटर जमीन पूर्वीच्या किनार्यापासून आत आली (म्हणजे कमी झाली - पाणी वाढलं). शिवाय या परिणामाची व्याप्ती कांदोळी-सिकेरी किनार्यावर लांबवर - सुमारे १५०० मीटर - दिसून आली. धूप झालेल्या भागातल्या वाळूच्या टेकड्या नष्ट झाल्या, त्या भागातली वृक्षसंपदा नष्ट झाली, तटीय बांधकामं - तेथे बांधलेल्या सुमारे ३०० मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीसकट - समुद्रार्पण झाली. विशेषतः ही पडझड पावसाळ्यातल्या वार्यांमुळे आणि त्याबरोबर येणार्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात होत होती. या १२ वर्षात नेमकी किती धूप झाली याचं गणितही शास्त्रज्ञांनी मांडलं आणि असं दिसून आलं की झालेल्या धूपेमुळे किनार्यावरील १ लाख चौ.मी. भूभाग पाण्याखाली गेला. सतत बारा वर्ष ही धूप होत राहिल्यामुळे येथील किनारा आता ठिसूळ झाला आहे आणि त्यामुळे त्याची क्षुल्लक कारणामुळंही धूपप्रवणता वाढली आहे.
एप्रिल २०१२ साली अखेरीस रिव्हर प्रिंसेसचे तुकडे करून तेथून ती हलवली गेली आहे आणि आता पाण्यावर तरी त्याचे कुठलेही भाग दिसत नाहीयेत. गेली बारा वर्ष झालेली धूप आता निसर्ग भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. चौपाटीची वाढ, कळत न कळत प्रमाणात का होईना, होतेय. गेल्या पावसाळ्यात आणखी धूप झाल्याची चिन्ह दिसत नाहीयेत. मानवातील बेशरमांचा घाला विरुन नैसर्गिक बेशरमाच्या (Ipomoea) झुडुपांचं (त्यांना असं नांव का दिलं असावं बरं?) या भागातील डोलणं आणि फुलणं याचा पुरावा आहे. साठलेल्या वाळूचं बेट/पट्टे विरळ होऊन किनारा आता पुन्हा सरळ रेषेत दिसू लागलाय, धूप झाल्यामुळं किनार्यावरील जे खडक २००६-२००८ च्या दरम्यान उघडे-नागडे झाले होते त्यांनी पुन्हा आता वाळूची चादर पांघरली आहे. हे सगळं पाहून खूप छान वाटतं. मानवानं निसर्गावर कितीही अत्याचार केले तरी निसर्ग ते सगळं सहन करून आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करीत असतो पण त्यालाही मर्यादा आहेत. आपल्या कृतींचा निसर्गावर परिणाम कमीत कमी होवो याची जाण आपल्याला जितक्या लवकर येईल तो दिवस आनंदाचा म्हणता येईल.
हा लेख 'लोकमत' च्या गोवा आवृत्तीत १४ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिध्द झाला.
आभार: या लेखातील आकृती करंट सायन्स खंड १०५, वर्ष २०१३, पृष्ठ ९९०-९९६ या लेखातून पुनर्मुद्रित केल्या आहेत. परवानगीबद्दल आभार.
या वैज्ञानिकांनी या ठिकाणी वर्षभर वाहणार्या वार्यांचा, लाटांचा (wave) आणि त्यांच्या उंचीचा अभ्यास केला. प्रत्येक ऋतुनुसार वार्याची दिशा बदलत जाते हे आपल्याला माहीत आहेच, तर या ठिकाणच्या लाटांची उंची वर्षा ऋतुच्या दरम्यान (विशेषतः जुलैमध्ये) जेव्हा वारे दक्षिणेकडून पश्चिमेकडे वाहतात तेव्हा सर्वाधिक म्हणजे २.६ मीटर इतकी तर कमीत कमी उंची शिशिरात (फेब्रुवारीत) असते. जहाज ज्या भागात रुतलं तिथं तटीय प्रवाहही (littoral currents) मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. या सगळ्याचं विश्लेषण केलं तेव्हा असं दिसून आलं की हे महाकाय जहाज किनार्यावर येऊन आदळणार्या लाटांना आडवं येऊन अडथळे निर्माण करतंय. पश्चिमेकडून समुद्रावरुन किनार्याकडे येणार्या लाटा या जहाजावरच आपटून फुटतायंत. यामुळे या लाटा जेव्हा जहाजाने निर्माण केलेल्या आडोशाच्या भागात (जहाज आणि समुद्रकिनार्या दरम्यान) पोहोचतात तेव्हा त्या क्षीण होतात आणि त्यांच्यातली उर्जा कमी झाल्यामुळे तटीय प्रवाहही अतिशय अशक्त होतात. परिणामी त्या ठिकाणी तेथील वाळूची हालचाल न झाल्यामुळं आणि उत्तरेकडून तिथं वाळू येतच राहिल्यामुळं वाळूचा पट्टा (sand bar) निर्माण होऊन किनारा आणि जहाजादरम्यान एक उथळ मार्गच तयार झाला. ओहोटीच्या वेळी यावरून जा-ये करणं सुध्दा शक्य झालं होतं. तसंच जहाजाचा मागचा भाग किनार्याजवळ असल्यानं त्या भागात जास्तच वाळू साठत चालली.
आकृती १: १९९९, २००६, २०११ साली उपग्रहाद्वारे घेतलेली सिकेरी-कांदोळी किनार्याची छायाचित्रं |
आकृती २: जहाजाजवळ जमलेली वाळू (शेंदरी रंगात) आणि दक्षिणेला झालेली किनार्याची धूप (हिरव्या रंगात) |
एप्रिल २०१२ साली अखेरीस रिव्हर प्रिंसेसचे तुकडे करून तेथून ती हलवली गेली आहे आणि आता पाण्यावर तरी त्याचे कुठलेही भाग दिसत नाहीयेत. गेली बारा वर्ष झालेली धूप आता निसर्ग भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. चौपाटीची वाढ, कळत न कळत प्रमाणात का होईना, होतेय. गेल्या पावसाळ्यात आणखी धूप झाल्याची चिन्ह दिसत नाहीयेत. मानवातील बेशरमांचा घाला विरुन नैसर्गिक बेशरमाच्या (Ipomoea) झुडुपांचं (त्यांना असं नांव का दिलं असावं बरं?) या भागातील डोलणं आणि फुलणं याचा पुरावा आहे. साठलेल्या वाळूचं बेट/पट्टे विरळ होऊन किनारा आता पुन्हा सरळ रेषेत दिसू लागलाय, धूप झाल्यामुळं किनार्यावरील जे खडक २००६-२००८ च्या दरम्यान उघडे-नागडे झाले होते त्यांनी पुन्हा आता वाळूची चादर पांघरली आहे. हे सगळं पाहून खूप छान वाटतं. मानवानं निसर्गावर कितीही अत्याचार केले तरी निसर्ग ते सगळं सहन करून आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करीत असतो पण त्यालाही मर्यादा आहेत. आपल्या कृतींचा निसर्गावर परिणाम कमीत कमी होवो याची जाण आपल्याला जितक्या लवकर येईल तो दिवस आनंदाचा म्हणता येईल.
हा लेख 'लोकमत' च्या गोवा आवृत्तीत १४ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिध्द झाला.
आभार: या लेखातील आकृती करंट सायन्स खंड १०५, वर्ष २०१३, पृष्ठ ९९०-९९६ या लेखातून पुनर्मुद्रित केल्या आहेत. परवानगीबद्दल आभार.
Sir this article is very informative &nice
उत्तर द्याहटवाThank you Shri Deshmukh for your encouraging feedback
हटवा