erosion लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
erosion लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

राजकन्येने भूप्रदेश गिळला तेव्हा... / Erosion due to River Princess shipwreck

निसर्गाचं आकर्षण कोणाला नसतं? उंच पर्वतराजी असोत की गर्द हिरवी जंगलं किंवा समुद्रकिनारे. तासनतास इथं शांतपणे बसा. आजिबात कंटाळा येत नाही. निसर्ग आपल्याला भरभरून आनंद देत असतो. मग त्याच्या सान्निध्यात कंटाळ्याचा प्रश्नच येतो कुठे? पण बर्‍याच जणांना निसर्गाचं सौंदर्य कसं आस्वादायचं हेच कळत नाही आणि त्याची परिणती ते ओरबाडण्यात होते आणि ते विद्रूप व्हायला सुरुवात होते. गोव्याचे अथांग, स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारे असेच सगळ्यांना भुरळ घालतात. विदेशी नागरिक तर महिनोनमहिने येथे मुक्काम ठोकून असतात. भारतातल्या इतर भागातले नागरिकही संधी मिळताच गोव्यात पुनःपुन्हा यायला एका पायावर तयार असतात. त्यांच्या स्वछंद आणि 'स्वतंत्र' वागण्याचे विपरीत परिणाम निसर्गावर होत असतातच. पर्यटनाव्यतिरिक्त इतर उद्योगही निसर्गावर मोठे परिणाम घडवत असतातच. ६ जून २००० या दिवशी असाच एक घाला गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावर पडला. 'एमव्ही रिव्हर प्रिंसेस' नावाचं प्रचंड मोठं, २५८ मीटर लांब आणि ३५ मीटर रुंदीचं, एक तेलवाहू जहाज वादळामुळे भरकटलं आणि कांदोळीच्या किनार्‍याजवळ ५ मीटर खोल पाण्यात येऊन रुतलं. जहाजाचा पुढचा भाग नैऋत्येला (दप) तोंड करून पुळणीपासून जवळच म्हणजे ३९० मीटर तर मागचा भाग १८७ मीटर अंतरावर होता. तेथून ते हलवण्यात अनेक मानवनिर्मित अडचणी येत गेल्या आणि एप्रिल २०१२ च्या अखेरीपर्यंत हे जहाज तेथेच मुक्काम ठोकून निसर्ग विद्रूप करण्यात आपला हातभार लावत उभं होतं. या दरम्यान तिथं घडलेल्या प्राकृतिक बदलांचा अभ्यास राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी करून नुकताच प्रसिध्द केला आहे (करंट सायन्स खंड १०५, वर्ष २०१३, पृष्ठ ९९०). अशी संकटं निसर्गावर कसा घाला घालतात याची माहिती वाचकांना आणि धोरणकर्त्यांना उद्बोधक ठरावी.