वाढत्या कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये सरासरी तपमानात वाढ, पावसाच्या नित्यतेवर त्याचे होणारे परिणाम, अति उष्ण आणि अति शीत लाटा, दुष्काळ, पूर असा हवामानाचा अतिरेकी लहरीपणा दिसून येणार आहे. अशा घडामोडी फक्त भविष्यातच वाढून ठेवल्या नाहीत तर आताच याची झलक आपण बर्याच वेळेला अनुभवत आहोतच. या सगळ्याचा परिणाम साहजिकच शेतीवर, शेती उत्पादनांवर होणार आहे. याला तोंड द्यायला नव्या धान्यांची वाणं, बदललेल्या व्यवस्थापन पद्धती, यावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. धान्यांच्या शेतीला महत्व असतेच पण बागायती उत्पादनंही तितकीच महत्वाची असतात. कारण एकदा का त्याची लागवड केली की वर्षानुवर्ष, बारमाही उत्पादन त्यातून घेता येऊ शकतं. नारळाच्या झाडाचं उदाहरण घ्या ना! एकदा का ते झाड लावलं की सुमारे ५० वर्ष ते फळ देत रहातं.