सुधारित वाणांचा वापर करून भुकेवर मात करायची की उपाशी मरायचं यावर दोन्ही अंगानी केलेला उहापोह
वनस्पतींचं नवं लाभदायक वाण तयार करण्याचं तंत्र माणसानं आत्मसात करून शेकडो वर्ष झाली. दोन जाती/प्रजातींतून त्यांच्यातल्या चांगल्या गुणांसाठी त्यांचं प्रजनन करुन नवं वाण निर्माण करत माणसानं प्रगती साधली. अधिक धान्य देणारं, किडीला समर्थपणे तोंड देणारं सुधारित वाण संशोधनातून निर्माण होत राहिलं. तसं पाहिलं तर अशा प्रजननामुळे आता इतके नवे वाण वापरात आहेत की मूळ वाणाचं बियाणंच कुठे मिळू नये! वनस्पतीतील जनुकंच विशिष्ट गुणधर्म ठरवतात हे यातून मानवाला कळलं होतं.