गुरुवार, ८ मे, २०१४

गोव्याच्या मठातला अवशेष जॉर्जियाची राणी केटेवानचाचः डीएनए वापरुन केली चाचणी/ DNA test confirms the relic of Georgian Queen

संत अगुस्तिनचा शिल्लक भाग
दगडी पेटीच्या झाकणाचा नमुना - अशा
पेटीत केटेवान राणीच्या हात जपला होता
राणीच्या हाताचं हाड
इ.स. १६१३ मध्ये इराणचा बादशहा शाह अब्बासनं जॉर्जियावर आक्रमण केलं आणि केटेवान राणीला बंदी बनवून आणलं. त्यानंतर सुमारे दहा वर्षांच्या बंदीकाळात तिला इस्लामची दिक्षा देऊन आपल्या जनानखान्यात सामावून घेण्याचे त्याने अथक प्रयत्न केले पण तिचा छळ करूनही राणी बधली नाही आणि अखेरीस १६२४ साली मृत्यू पावली. यादरम्यान दोन अगुस्तिनीयन साधू तिच्या सोबत राहात होते. तिच्या मृत्युनंतरही १६२४ ते १६२७ च्या दरम्यान तिथंच राहून त्यांनी राणीच्या देहाचे अवशेष तिच्या थडग्यातून मिळवले आणि त्यातील उजवा हात एका दगडी शवपेटीकेतून लपत छपत १६२७ साली गोव्यात आणून संत अगुस्तिनच्या मठातल्या चॅपेलच्या वेदीच्या उजव्या बाजूला दुसर्‍या खिडकीत ठेवला असं इतिहास सांगतो. जॉर्जियातील जनतेच्या मनातील केटेवान राणीच्या बाबतीत असलेली आदरभावना लक्षात घेऊन त्या देशाने भारत सरकारला हे अवशेष शोधण्याची १९८०च्या दशकात विनंती केली आणि तेव्हापासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने अनेक प्रयत्न केले. जुने गोवे येथील हा मठ १५७२ साली अगुस्तिनीयन साधूंनी बांधला होता. १८३५ मध्ये यातील चर्चची पडझड झाली तर १८४२ मध्ये त्याची कमान पडली आणि ही इमारत नंतर तिच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे उदध्वस्तच झाली होती. त्यातील महत्वाच्या चीजवस्तू गहाळ झाल्या होत्या. इतिहासातील पानात राणीच्या अवशेषांची नेमकी जागा नमूद केलेली असली तरी त्या इमारतीच्या स्थितीमुळे ते अवशेष शोधायला अथक प्रयत्न करावे लागले. अखेरीस २००४ साली पुरातत्ववेत्त्यांना हाताचं एक लांब हाड सापडलं. त्याच्या जवळच दगडी पेटीचं झाकणही सापडल्यामुळे ते राणीचंच असावं असं अनुमान करता येत होतं. या हाडाबरोबरच, आणखीही दोन दग़डी पेट्यात ठेवलेले हाडांचे अवशेष सापडले. लांब हाताचं हाड केटेवान राणीचेच अवशेष आहेत याबाबत पुरातत्ववेत्त्यांमध्ये दुमत नव्हतं पण याची खात्री कशी करणार?



इथं विज्ञानातील प्रगती कामी आली आणि ही त्याचीच कुमारसामी थंगराज आणि त्यांच्या सहाध्यायांनी नुकत्याच लिहिलेल्या शोधनिबंधाची कथा. मिळालेल्या अवशेषाच्या डीएनए ची चाचणी करून हे अवशेष कोणाचे, हे शोधता येतं. डिऑक्सिरायबोन्युक्लिक अ‍ॅसिड (डीएनए) हा एक सगळ्या जीवात आढळणारा रेणू. जीवाच्या विकास आणि कार्यपद्धतीच्या आनुवांशिक सूचना त्यात नोंदवलेल्या असतात. मानवाच्या प्रत्येक डीएनए मध्ये त्याच्याबाबतची व्यक्तीगत नोंद तर असतेच, याशिवाय आपल्या उत्क्रांतीचा एक सामायिक इतिहास आणि व्यक्तिच्या भविष्यातील आरोग्याविषयी अंदाज करता येईल असे ठोकताळे असतात. याचं विश्लेषण भूतकाळातल्या कूट प्रश्नांवर प्रकाश पाडत योग्य असे न्यायदान करण्यासाठीही उपयोगी पडतं. डीएनएच्या रुपरेखेवरुन, त्याच्या 'ठशावरुन' (fingerprinting - हा शब्द बोटाच्या ठशांचा जसा उपयोग व्यक्ती ओळखण्यासाठी केला जातो तशा पारंपारिक अर्थानं वापरला जातो) व्यक्तीचे गुणधर्म ओळखण्याचं तंत्र विकसित केलं गेलं आहे. डीएनएचे ठसे आज प्रसूतीशास्त्रात, पितृत्वचाचणी वगैरेत सर्रास वापरले जातात. त्यातून मिळणारे निष्कर्ष कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय पुरावे म्हणून उपयोगात आणले जातात. डीएनएची रुपरेखा किंवा ठसा बनवायला केवळ त्या व्यक्तीचा डीएनए लागतो. तो मिळवायला जिवंत अथवा मृत शरीराचे अवयव किंवा कुठलाही भाग जसं त्वचा, शरीरातील द्रव्य (उदा. लाळ), किंवा अगदी समूळ केसही पुरतो. पॉलिमरेज शृंखला प्रतिक्रियेद्वारे (polymerase chain reaction - PCR) डीएनएचा अगदी छोटासा तुकडा (एका ग्रॅम डीएनए चा दहा हजार कोटीवा भाग - ट्रीलियन) वापरुन संपूर्ण डीएनए तयार करण्याचं तंत्र विकसित झाल्यापासून तर या विषयीच्या अभ्यासाला मोठीच चालना मिळाली आहे. कौटुंबिक संबंध सिध्द करायला, एखादा गुन्हा किंवा निरापराधीपणा सिध्द करायलाही याचा वापर केला जातो. मानवी आरोग्याची चिकित्सा करण्यासाठीही डीएनए विज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. किंबहुना एकूणच चिकित्सा पध्दतीत यामुळे आमूलाग्र बदल झाला आहे म्हणा ना! कर्करोगाच्या उत्पत्तीचं मूळ शोधण्यासाठी, त्यातून उद्भवलेले इतर विकार, त्यावर उपाय आणि आनुवंशिक दोषांचं निर्मूलन करण्यासाठी आता या पध्दतीचा वापर केला जातो. मानवाचं अस्तित्व या विश्वाच्या उत्पत्तीपासून विचार केला तर फार जुनं नाहीये. डीएनएचा वापर करुन आपण २००,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत असणार्‍या आपल्या पूर्वजांचा शोध घेण्यात यशस्वी ठरलो आहोत. तेव्हापासून आपला वंश शोधणं, आपल्या पूर्वजांच्या शरीराची ठेवण कशी होती, ते कसे वागत होते याचा अंदाज बांधता येणं शक्य झालं आहे. आपले पूर्वज कसे होते, ते कुठून आणि केव्हा स्थलांतरीत झाले याच्या अभ्यासाला मोठीच चालना मिळाली आहे. यामुळे पुरातत्वशास्त्रातही डीएनए विश्लेषण हा एक अंतिम पुरावा मानला जातो. अशा प्रकारच्या डीएनएच्या चाचणीला अवशेषांचा 'वंश शोधण्यासाठी घेतलेली डीएनए चाचणी' असं म्हणतात. तिचे तीन प्रकार आहेतः अलिंगी गुणसूत्र डीएनए (autosomal DNA - atDNA), सूत्रकणिका डीएनए (mitochondrial DNA - mtDNA), आणि रंगसूत्र डीएनए (Chromosome DNA - Y-DNA). अलिंगी गुणसूत्राचा उपयोग पूर्वज शोधून काढण्यासाठी केला जातो, तर सूत्रकणिका डीएनएचा उपयोग स्त्री-पुरुषाच्या मातृपंक्तीची बाजू दर्शवते आणि रंगसूत्र डीएनए पुरुषाची पितृपंक्ती दर्शवते.
तयारीची खोली
नमुने बनवण्याची खोली
डीएनए श्रुंखला करायची खोली

भारतात यावर हैद्राबाद येथील सीएसआयआरच्या 'सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी' या संशोधन संस्थेनं या विषयात मुलभूत संशोधन करुन बरीच मोठी आघाडी मारली आहे. शिवाय या संशोधनाच्या आधारावर भारतीयांची कूळकथाही लिहिली आहे. या प्रयोगशाळेत अतिशय आधुनिक अशी प्राचीन अवशेषापासून मिळवलेल्या डीएनए च्या श्रुंखला बनवण्यासाठी प्रयोगशाळा आहे. अशा प्रकारच्या प्रयोगशाळेत विशेष पध्दतीनं शुध्द केलेली हवा, अनन्यसाधारण असा पाण्याचा पुरवठा आणि गर्द जांभळ्या रंगाखाली विद्युतलोह चुंबकाने किरणोत्सर्गी चिकित्सा (ultra-violet irradiation) करण्याची सोय असते. अशा वातावरणात अत्याधुनिक उपकरणं वापरुन डीएनएचं विश्लेषण केलं जातं. सोबतच्या आकृतीवरुन येथील वातावरणाची काळजी कशी घेतली जाते याची कल्पना यावी. या प्रयोगासाठी एकूण ३ खोल्या असतात. पहिल्या खोलीत वैज्ञानिक आतल्या खोलीत जायची तयारी (मास्क, हातमोजे, डोक्याला, पायाला आवरणं) करतात. दुसर्‍या खोलीत विश्लेषणासाठी नमुने तयार करायची सोय आहे. इथंच अवशेषातून तो स्वच्छ करुन, दळून त्याची पावडर करायची वगैरे उपकरणं असतात. यासाठी आयनीकरण केलेलं पाणी वापरलं जातं. तर तिसर्‍या खोलीत डीएनए च्या श्रुंखला बनवण्याची सोय असते. भारतात या विषयावर संशोधन सुरु असल्यानं यासाठी परकीय मदत घ्यावी लागली नाही. मिळालेले अवशेष जॉर्जियाच्या राणीचेच होते की आणखी कुणाचे याचा छडा लावण्यासाठी सूत्रकणिका डीएनए (mtDNA) पध्दतीचा उपयोग करायचं संशोधकांनी ठरवलं.

येथील वैज्ञानिकांना या अवशेषाचे तुकडे २००५ सालींच मिळाले आणि तेव्हापासून त्यांचे त्यातून डीएनए मिळवण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. नमुन्यावर केलेलं विश्लेषण वादातीत असावं म्हणून या प्रयोगादरम्यान खूप काळजी घेतली गेली. प्रत्येक हाडातून त्यातील डीएनएचे तीन-तीन नमुने दोन वेगवेगळ्या संशोधकांकरवी घेतले गेले. हेतू हाच की या नमुन्यांवर केलेल्या चाचण्या एकाच निष्कर्षाप्रत आल्या म्हणजे त्या प्रयोगात काही उणीव राहिली नाही हे सिध्द व्हावं. तसंच त्या नमुन्यांचा अर्वाचीन डीएनएशी संबंध येऊन ते दूषित होऊ नयेत असंही चाचणीच्या प्रत्येक पायरीवर (हाडाची साफसफाई, कापणं, पावडर मिळवण्यासाठी छिद्र पाडणं, डीएनए वेगळं करणं, वगैरे) पाहिलं गेलं. प्रत्येक हाडाचा एक तुकडा काढून तो घासून मग त्यातून १ ग्रॅम पावडर मिळवली गेली. या पावडर वर प्रक्रिया करून त्यातून  पेशीतील न्युक्लिओटाईड्स, प्रथिने आणि क्षार वगळून योग्य आकाराचे डीएनए मिळवले गेले. पण जरी ते त्यातून डीएनए मिळवू शकले तरी त्याची उपलब्ध पध्दतींनुसार श्रुंखला (PCR) तयार करण्यात त्यातील काही निरोधी घटकांमुळे (inhibitors) त्यांना यश येत नव्हतं. गोव्याच्या आर्द्र आणि उच्च तापमानामुळे त्या हाडातून मिळालेला डीएनए पृथःकरणासाठी अगदीच निष्कृष्ट होता. अखेरीस २०११ साली या प्रयत्नात असताना अशा प्रकारच्या अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या अवशेषातून डीएनए मिळवून त्याच्या श्रुंखला तयार करण्याची एक नवी पध्दतच त्यांनी विकसित केली आणि मग यश दृष्टिपथात आलं. सूत्रकणिका डीएनएतील (mtDNA) प्रजोत्पत्तिविषयक गुणधर्माचा (genotyping) अभ्यास करुन त्यांनी त्याची पुनरुत्पत्ती (cloning) केली. आता पुढची पायरी म्हणजे हे डीएनए जगातल्या कोणत्या वंशांमध्ये आढळतात याची पडताळणी आणि नंतर वंशसंबंध सिध्द झाल्यावर ते नमुने जॉर्जियाच्या राणीचेच आहेत, हे ठरवणं. तुलना करण्यासाठी डीएनए मधील वेगवेगळी १०८ सूत्रं निवडली गेली. नमुन्यांचा ऐतिहासिक पुराव्यांशी संबंध जोडता यावा म्हणून मातृपंक्तीतील वंश ओळखण्याचा प्रयत्न केला गेला. हे अवशेष आशियातीलच कुणा व्यक्तीचे नाहीत ना ही शक्यता आजमावण्यासाठी अवशेषांच्या डीएनएची पडताळणी उपलब्ध असलेल्या आशियाई वंशातील व्यक्तींच्या नमुन्यांशी केली गेली. भारतात संशोधन होत असल्यानं भारतीय उपखंडातील सुमारे २२००० नमुने हाताशी होतेच त्यांच्याशी तुलना करणं सोपं गेलं. पहिल्या अवशेषाचा, लांब हाडातील डीएनए भारतातल्या कुठल्याही वंशाशी जुळत नसल्याचं आढळलं. तर अशा प्रकारचे डीएनए फक्त युरोपीय, कॉकेशिय प्रांतातील वंशांच्या व्यक्तींमध्येच आढळत असल्यानं ऐतिहासिक पुरावा योग्यच दिशा दाखवतो हे सिध्द करता आलं. हे अवशेष जॉर्जियातील व्यक्तीचे तरी आहेत का हे पहाण्यासाठी तेथील लोकांत असलेले डीएनए मिळवणं आणि त्याची तुलना या अवशेषातून मिळवलेल्या डीएनएशी करणं आवश्यक ठरत होतं. म्हणून मग जॉर्जियाच्या पूर्वेकडील भागातल्या नागरिकांच्या लाळेचे नमुने गोळा केले. त्यातून डीएनए वेगळे करुन तुलना केली गेली आणि त्यांना यात साधर्म्य आढळून आलं. यामुळे हाताचं हाड असणारी व्यक्ती जॉर्जियातीलच आहे या निष्कर्षाला पुष्टी मिळाली. तसंच डीएनए वरून तो अवशेष स्त्रीचाच आहे हे ही ठरवलं गेलं आणि त्यामुळे ते जॉर्जियाच्या राणीचं असावं या निर्णयाप्रत येता आलं.

इतर दोन हाडांच्या नमुन्यातील डीएनए ची रचना मात्र दक्षिण आशियातील - विशेषतः भारतातल्या अनेक कुळातल्या डीएनए च्या रचनेशी साधर्म्य दाखवत होती. दुसर्‍या क्रमांकाच्या हाडातल्या डीएनएचं भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील अनेक वंशांच्या डीएनएशी साधर्म्य दिसून आलं तर तिसर्‍या हाडाच्या नमुन्यातील डीएनएचं साधर्म्य पश्चिम आणि उत्तर भारतीय कुळातील डीएनएशी आढळलं. गोव्यातील विशेषतः गवळ्यांचा वंश तर या नमुन्याशी अत्यंत जवळीक दर्शवितो. पुरातत्ववेत्त्यांचे निष्कर्षही यालाच पुष्टी देतात. यामुळे ही दोन्ही हाडं स्थानिक वंशातील व्यक्तींचीच असावीत असं म्हणायला आधार आहे. ऐतिहासिक पुराव्यांवरुन ते गल्हेर्म द सांत अगुस्तिन (Guilherme de Sto. Agostinho) आणि हैरॉनिमो द क्रुझ (Hyeronimo da Cruz) या अगुस्तिनीयन पंथातील महंतांचे असावेत असा निष्कर्ष पुरातत्ववेत्त्यांनी काढलेला आहे त्यालाही यामुळे पुष्टी मिळते.

आंतरराष्ट्रीय संबंधात इतर देशांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना फार महत्व आहे. असे संबंध निर्माण करायला सगळेच देश कारणं शोधत असतात. या संबंधांतूनच मग पुढे व्यापार आणि इतर व्यवहारांना पुष्टी मिळते. आपल्या देशाच्या यासारख्या क्लिष्ट विषयावर संशोधन करण्याच्या क्षमतेमुळे आणि त्याचा योग्य तर्‍हेने उपयोग करुन घेण्याच्या आलेल्या संधीमुळे, भारताला पुढे चालून असे संबंध वृध्दींगत करण्यास नक्कीच उपयोग होईल असं वाटतं. विज्ञानाचा असाही एक उपयोग! 

आभारः  संत अगुस्तिन अणि अवशेषांची सगळी छायाचित्रं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या चित्रफितीतली (http://www.ccmb.res.in/sct_videos/) आणि प्रयोगशाळेची छायाचित्रं लेखकाने पाठवली आहेत.
हा लेख दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत दिनांक ४ मे २०१४ रोजी प्रसिध्द झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा